कृष्ण बलदेव वैद : (२७ जुलै १९२७ – ६ फेब्रुवारी २०२०). आधुनिक हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध कथा आणि कादंबरीकार. नाटक आणि अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.लेखनातील नाविन्यपूर्ण रचनाशैली, आशय आणि पात्र योजनेतील निर्भीडपणा यासाठी ते आधुनिक हिंदी साहित्यात विशेषत्वाने ओळखले जातात. त्यांचा जन्म डिंगा (पंजाब, पाकिस्तान) येथे झाला.पंजाब विद्यापीठातून त्यांनी इंग्रजीमध्ये एम.ए.आणि हार्वर्ड विद्यापीठातून आचार्य पदवी मिळवली. ते १९५०  ते १९६६ दरम्यान हंसराज कॉलेज, दिल्ली आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे इंग्रजी साहित्याचे शिक्षक होते. १९६६  ते १९८५ दरम्यान त्यांनी न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे आणि १९६८-६९ मध्ये ब्रँडीस विद्यापीठ येथे इंग्रजी आणि अमेरिकन साहित्याचे अध्यापन केले.

कृष्ण बलदेव वैद यांची साहित्य संपदा : उसका बचपन (१९५७) ही वैद यांची पहिली कादंबरी होय. पाश्चात्त्य साहित्याचा त्यांच्या एकूण जीवनशैलीवर प्रभाव आहे. पाश्चात्त्य अनुभवविश्व आणि वाचन यातून त्यांची लेखन परंपरा निर्माण झाली आहे. त्यामुळेच रचनेच्या आणि आशयाच्या दृष्टीने त्यांना आधुनिक हिंदी साहित्यात लगेच स्थान मिळाले. त्यांची साहित्य संपदा पुढीलप्रमाणे :- कथासंग्रहबीच का दरवाजा (१९६३), दुसरे किनारे से (१९७०), लापता (१९७३), मेरी प्रिय कहानिया (१९७८),वो और मै (१९७९),खुली किताब का जादू, प्रवास गंगा; कादंबरीविमल उर्फ जायें तो जायें कहा (१९७४),नसरीन (१९७५),दुसरा ना कोई (१९७८),दर्द ला दवा (१९८०),गुजरा हुआ जमाना (१९८१),काला कोलाज (१९८९),नर नारी (१९९६); अनुवादगोडो के इंतजार में (बेकेट,१९७०), आखिरी खेल (बेकेट,१९७१)इत्यादी. याशिवाय त्यांनी इंग्रजी भाषेमधून साहित्य आणि समीक्षाविषयक कार्य केले आहे.

कृष्ण बलदेव वैद यांचे कथालेखन

आधुनिक हिंदी साहित्यात बाह्य वास्तवाचे चित्रण अभावाने आढळत होते. जो लेखक त्याच्या अपूर्व प्रतिभा आणि अनुभवविश्वातून हे धाडसी बाह्य चित्रण करीत असे त्याला लगोलग प्रसिद्धी मिळत असे. अशा काळात वैद यांनी बहुतलस्पर्शी लेखन करून अल्पावधीत साहित्यविश्वात मान्यता मिळविली.स्थूलतेऐवजी सूक्ष्मतेवर भर देवून त्यांनी मानवी अस्तित्वाशी निगडित प्रश्नांना आपल्या कथेतून अभिव्यक्त केले. त्यांच्या कथांमध्ये कोणतेही नियोजनबद्ध वर्णन दिसत नाही, पण जेथे कथन उपस्थित आहे, ते विडंबनाचे रूप धारण करते. ‘कलिंगसेन आणि सोमप्रभा यांची विचित्र मैत्री’ ही त्यांची कथा कथासरितसागरमधील कथेचे पुनर्लेखन आहे.या कथेतील रचनाशैली बघता त्यांनी कथन  परंपरेचे विडंबन केले आहे असे जाणवते.  हिंदी कथांचा वर्णनपर मुख्य प्रवाह ज्याला म्हणतात त्याला स्पष्ट नकार त्यांच्या कथांतून दिसून येतो. तथाकथित सामाजिक वास्तववाद त्यांनी आपल्या लेखनातून सातत्याने नाकारला आहे; परंतु त्यांच्या लेखनात सामाजिकता नाही असे नाही.ते आपल्या काळातील आणि समाजाच्या प्रश्नांवर कथेतून आपले मत मांडताना दिसतात.

कृष्ण बलदेव वैद यांचे कादंबरीलेखन

पाश्चात्त्य लेखनाचा व्यासंग आणि अभ्यास यातून वैद यांना  एक आधुनिक दृष्टी अल्पावधीतच लाभली.त्यांच्या रचनातंत्रावर या लेखन परंपरेचा मोठा प्रभाव आहे. लेखकाने  लेखनगर्भ आत्मनिष्ठा जोपासावी ही त्यांची मुख्य भूमिका आहे. यातून लेखकाला त्याच्या खऱ्या अनुभवविश्वाला शब्दबद्ध करता येते हा त्यांचा अनुभव आहे. कादंबरी लेखन करताना त्यांना हिंदी आणि त्यातही भारतीय निष्ठांना सामोरे जावे लागले. कादंबरीत अश्लील आशय आहे म्हणून त्यांची कादंबरी कित्येकदा प्रकाशकांनी नाकारली आहे. तरीही ते त्या आशयात कुठलाही बदल न करता आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे वैद यांचे कादंबरीलेखन हे आधुनिक हिंदी साहित्याला एक नवे आयाम देणारे लेखन ठरले आहे. आशय आणि कथनशैली यातील एकसंधता त्यांनी प्राणपणाने आपल्या कादंबरी लेखनात जपली आहे.  विनोद आणि बुद्धी, निरर्थकता आणि आधुनिकता,भय ,हतबलता हे विषय प्रामुख्याने त्यांच्या कथेत येतात.

परदेशात राहूनही त्यांनी हिंदी भाषा आणि भारतीय संस्कृती यामधील एक सांस्कृतिक बाज आपल्या लेखनातून ढळू दिला नाही.  एक भारतीय म्हणून त्यांचे मन अजूनही शाबूत आहे. एकटेपणाच्या, उदासीनतेच्या, असुरक्षिततेच्या भावनेतून उद्भवलेल्या नैसर्गिक निराशेच्या, नातेसंबंधांतील गुंतागुंतीच्या आणि त्यासाठी झुंजणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या, कंटाळवाण्या आणि बौद्धिक विश्लेषणाच्या या काळात ते त्यांच्या कादंबऱ्यातून वास्तववादी आशय मांडतात. वैद यांची भाषा ओघवती आहे. काही वेळा ती नाटकी आणि आक्रस्ताळी होते.

कृष्ण बलदेव वैद यांना मिळालेले मानसन्मान

पाकिस्तानमधून स्थलांतर केल्यानंतर समोर आलेल्या अनंत अडचणीवर मात करून वैद यांनी साहित्य विश्वात आपले नाव केले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  छत्तीसगढ़ राज्याचा  पंडित सुंदरलाल शर्मा सम्मान  (२००२), हिंदी अकादमी, दिल्लीचा का शलाका सम्मान, भाषा विभाग, पंजाब द्वारा साहित्य शिरोमणी पुरस्कार(१९९३)इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

अल्पशा आजाराने त्यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.

संदर्भ : साहित्य अकादेमी ,संकेतस्थळ .