मालती ही सुगंधी वनस्पती मिर्टेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मिर्टस कॉम्युनिस आहे. मिर्टस प्रजातीत केवळ दोन जाती असून त्यांपैकी ही जाती भारतात आढळते. मालती ही वनस्पती मूळची भूमध्य सागरी प्रदेशांतील सार्डिनिया आणि कॉर्सिका बेटांवरील असून तिचा प्रसार अनेक देशांमध्ये झालेला आहे. सुवासिक पाने आणि पांढरी सुगंधी फुले यांसाठी तिची लागवड बागांमध्ये केली जाते.

मालती (मिर्टस कॉम्युनिस) : (१) पाने व फुले, (२) फळे

मालती हे सदापर्णी झुडूप ५ मी.पर्यंत उंच वाढते. पाने साधी, ३-४ सेंमी. लांब, समोरासमोर, गुळगुळीत, सुवासिक आणि अंडाकृती किंवा भाल्यासारखी असतात. फुले पांढरी, तारकाकृती, लहान, २ सेंमी. व्यासाची व सुगंधी असतात. फुलांच्या तळाशी सूक्ष्म उपांगे म्हणजेच दोन सहपत्रके असतात. फुलात ५ पाकळ्या असून पाकळ्यांखाली पाच निदले असतात. पुंकेसर सुटे व अनेक असतात. फुलांचे परागण कीटकांमार्फत होते. मृदुफळ लांबट आणि गोलसर, सु. ५ सेंमी. व्यासाचे, मांसल व जांभळट काळे असून त्यात अनेक, कठीण व वृक्काकृती बिया असतात.

मालतीच्या पानांचे व फुलांचे हार करतात. पाने आणि फुले यांतून बाष्पनशील तेल काढतात; त्याला मिर्टल ऑइल म्हणतात. ते पिवळे असून त्याला विशिष्ट उत्तेजक वास असतो. खाद्यपदार्थांना स्वाद आणण्यासाठी तसेच अत्तरे, साबण, कोलोन वॉटर व सुगंधी द्रव्ये यांत ते मिसळतात. ते जंतुनाशक व पूतिरोधक असते. फळांमध्येही बाष्पनशील तेल, सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, रेझीन आणि टॅनीन असते. मालती वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख हिपॉक्राटीझ, प्लिनी व गेलेन या प्राचीन ग्रीक/रोमन तसेच प्राचीन अरबी विद्वानांनी केला आहे. सार्डिनिया आणि कॉर्सिका या प्रदेशांमध्ये मिर्टो नावाचे विशिष्ट चवीचे अल्कोहॉलयुक्त पेय तयार करण्यासाठी मालती वनस्पती वापरली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा