ओहलीन, बर्टिल जी. : (२३ एप्रिल १८९९ – ३ ऑगस्ट १९७९). स्विडीश अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी व नोबेल स्मृती पुरस्काराचा सहमानकरी. बर्टिल यांना आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल चलनवलन यांबाबतच्या असामान्य संशोधनाबद्दल १९७७ मध्ये ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जेम्स एडवर्ड मीड (James Edward Meade) यांच्या बरोबरीने अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

ओहलीन यांचा जन्म स्विडनमधील क्लिप्पान, स्केन येथे झाला. त्यांनी १९१७ मध्ये लूंड विद्यापीठातून बी. ए., १९१९ मध्ये स्टॉकहोम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएस. सी., तर १९२३ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातून एम. ए. या पदव्या मिळविल्या. १९२५ मध्ये स्टॉकहोम विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. प्रदान केली. त्यानंतर १९२५ – १९३० या काळात कोपनहेगन विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९२९ पासून स्टॉकहोम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचे शिक्षक-प्राध्यापक असलेल्या इली हेक्सचेर यांच्यानंतर त्या पदावर बर्टिल यांची नियुक्ती झाली. १९२९ – १९६५ या काळात स्टॉकहोम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. १९३३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापारावरील पुस्तकामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. पुरोगामी व सुधारणावादी आर्थिक विचार व सार्वजनिक धोरण यांविषयावरील संशोधन व परिसंवाद व्हावेत, यासाठी १९३३ मध्ये त्यांनी रिफ्टेस्लन बर्टिल ओहलीन इन्स्टीट्यूट ही संस्था स्थापन केली. हेक्सचेर यांनी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारप्रणालीत ओहलीन यांनी महत्त्वपूर्ण बदल सूचविले, तसेच त्यात भर घातली.

ओहलीन यांनी आपल्या प्राध्यापकाचा विकसित केलेला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत हेक्सचेर-ओहलीन प्रतिमान (Model) म्हणून वाणिज्य क्षेत्रात प्रमाण मानण्यात येतो. त्यांच्या या प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तौलनिक फायद्यांचा तसेच भांडवल व श्रम या संसाधनावर कसा सकारात्मक परिणाम संभवतो, हे दाखवून दिले. आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा कार्यक्षम वापर करून देशांनी किमान वस्तूंच्या उत्पादनाचे विशेषीकरण करावे. जादा उत्पादनाची निर्यात करावी व इतरांकडून त्यांची चांगली उत्पादने आयात करावीत, जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. विशेषीकरणामुळे देशातील श्रमिकांना मिळणाऱ्या वास्तव मोबदल्याचे रक्षण होईल. स्थूल अर्थशास्त्र धोरणासंदर्भातील प्रणालीही त्यांनी विकसित केली.

ओहलीन यांना उल्लेखनीय संशोधन व सामाजिक कार्यामुळे इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाने मार्शल लेबचर्स देण्यासाठी १९३६ मध्ये निमंत्रित केले. त्यांनी १९४४ – १९६७ या काळात स्विडनमधील पीपल्स पार्टी या विरोधी पक्षाचे नेतृत्व केले. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात तेथील संयुक्त आघाडी सरकारमध्ये वाणिज्य मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. अध्यापनकार्याबरोबरच स्विडीश पीपल्स पार्टीचे नेतृत्व करताना त्यांनी १९१९ – १९७७ या काळात लिहिलेल्या आपल्या सुमारे बाराशे वृत्तपत्रीय लेखांद्वारे सुधारणावादी विचार लोकांपुढे मांडले. वेतन, आर्थिक समस्या, किंमत पातळी, रोजगार स्थैर्य, आंतर प्रांतीय व आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांवरील विचारांचा त्यांत समावेश होता.

ओहलीन यांनी पुढील ग्रंथ व लेख लिहिले : दि कोर्स ॲण्ड फेजेस ऑफ दि वर्ल्ड इकॉनॉमिक डिप्रेशन : रिपोर्ट प्रेझेन्टेड टू दि असेंब्ली ऑफ दि लीग ऑफ नेशन्स (१९३१), इंटररिजनल ॲण्ड इंटरनॅशनल ट्रेड (१९३३), सम नोट्स ऑन दि स्टॉकहोम थिअरी ऑफ सेव्हिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेन्ट (१९३७), दि प्रॉब्लेम ऑफ एम्प्लॉयमेन्ट स्टॅबिलायझेशन (१९४९). तसेच दि इक्विलिब्रियम ऑफ एक्सचेंज (१९२१), टेन्डन्शीज इन स्विडिश इकॉनॉमी (१९२७), इक्वीलीब्रियम इन इंटरनॅशनल ट्रेड (१९२८), दि जर्मन रिपरेशन्स प्रॉब्लेम (१९३०) व मेकॅनिक्स ॲण्ड आब्जेक्टिव्हज ऑफ एक्सचेंज कंट्रोल (१९३७) हे लेख.

ओहलीन याचे स्विडनमधील अरे मुनिसिपॉलिटी येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा