हिंदुस्तानी शास्त्रीय कंठसंगीतातील एक महत्त्वपूर्ण घराणे. मूलत: धृपदगायकीचे हे घराणे असून ‘नौहार बाणी’ या शैलीचे गायन म्हणजेच बोलांचे मधूर गायन करणे हे या गायकीचे वैशिष्ट्य. आग्रा घराण्याची परंपरा तेराव्या शतकातील प्रसिद्ध गायक गोपाल नायक यांच्यापासून सांगितली जाते. गोपाल नायक यांच्या परंपरेतील हाजी सुजानखाँ हे दिल्ली येथे अकबराच्या दरबारातील गायक असून ते तानसेनांचे समकालीन होते. त्यांचे वंशज औरंगजेबाच्या राजवटीत आग्रा येथे स्थायिक झाले. तेव्हापासून या घराण्याचा आग्र्याशी संबंध आला. या घराण्याचे एक पूर्वज घग्गे खुदाबक्ष यांना ग्वाल्हेर घराण्यातील नथ्थन पीरबक्ष यांची चांगली तालीम मिळालेली होती. त्यामुळे ग्वाल्हेर घराण्यातील अनेक ख्यालरचना व गायकीची काही अंगे आग्रा घराण्यात समाविष्ट झाली; तथापि त्या ख्यालगायनावर धृपदगायकीचा प्रभाव टिकून राहिला. त्यामुळे या घराण्याला धृपद व ख्याल या गायनप्रकारांच्या सीमेवरील घराणे म्हणता येईल. घग्गे खुदाबक्ष यांचे पुत्र गुलाम अब्बासखाँ यांनी बंधू कल्लनखाँ, पुतणे नथ्थनखाँ व नातू फैय्याजखाँ यांना तालीम दिली, ज्यांच्यामुळे या घराण्याला खूप जास्त लोकप्रियता मिळाली.

या घराण्यातील गायकांचा स्वर प्राय: ढाला (बऱ्याच कमी उंचीचा व घनगंभीर) असतो; पण धृपदाच्या चांगल्या तालमीमुळे आणि स्वरसाधनेमुळे तो कसदार आणि खर्जातही श्रवणीय होतो. प्रत्यक्ष चीज सुरू करण्यापूर्वी परंपरेनुसार ‘नोम्‌तोम्’ गायकीने रागविस्तार केला जातो. नोमतोमीमध्ये चिजेची अक्षरे नसतात, तर स्वरांच्या केवळ आधारासाठी ‘रीदनन नोम्, ता रन, री, नू…’ इत्यादी अक्षरे असतात. तंतअंगाने हे गायन होते. बीनेच्या जोडकामाप्रमाणे वाटणाऱ्या अशा गंभीर नोमतोमीत रागाची बढत दमदारपणे होते. या घराण्यात ताल-लयींचा पक्केपणा व विविधता हे एक खास वैशिष्ट्य आहे. यानंतर धमारचे अथवा ख्यालाचे गायन केले जाते. आग्रा घराण्यातील ख्यालामध्ये लालित्यापेक्षा गांभीर्य व जोरकसपणा यांचाच प्रयत्य अधिक येतो. ख्याल मध्यलयीतच गायला जातो. चुस्त ख्यालरचना हे या घराण्याचे वैशिष्ट्य आहे. ख्यालगायनासाठी उपयोगात येणाऱ्या एकताल, त्रिताल, झूमरा, तिलवाडा, आडाचौताल, झपताल अशा विविध तालांमध्ये गायन केले जाते. बोलआलाप, बोलबनाव, बोलउपज, बोलतान याद्वारे रागाची बढत केली जाते. स्वरसंगतींमधील वैधम्याचा आविष्कार, छोट्या-छोट्या बोलउपजा आणि ‘अचरक’ ताना या आग्रा घराण्यात विशेषत्वाने दिसतात. चिजेमधील काही अक्षरबंधांवर रमून, उपजा घेऊन जोरदार हिशेबी तिहायांनी समेवर येणे, हे या गायकीचे खास वैशिष्ट्य आहे.

द्रुत बंदिश सादर करण्याची आग्रा घराण्याची खास शैली असून त्यावर बोलबाँटच्या ठुमरीचा प्रभाव दिसून येतो. बंदिशीच्या वेगवेगळ्या पंक्तींवर लयीच्या वेगवेगळ्या वजनांनी बोल बनवणे, विविध मात्रांपासून तिहाया घेणे अशी लयक्रीडा यामध्ये केली जाते. या घराण्यातील गायकांचा स्वर ढाला असल्याने दरबारी कानडा, मलुहाकेदार, हेमकल्याण, खेमकल्याण यांसारखे मंद्रसप्तकातील राग या घराण्यात विशेषत्वाने गायले जातात. तसेच तोडी, देसी, रामकली, बिहाग, जयजयवंती, सोहनी, झिंझोटी, खमाज, देस यांसारख्या प्रचलित रागांबरोबरच पंचम, लाचारी तोडी, भीम, गारा, नटबिहाग, धनाश्री, परजीकलिंगडा यांसरखे अनवट रागही गायले जातात. सादरीकरणात ख्याल, धमार, ठुमरी या गीतप्रकारांचा विशेषकरून वापर असतो.

आकर्षक व ढंगदार बंदिश बनवणे हे आग्रा घराण्याचे खास वैशिष्ट्य आहे. फैयाजखाँ, विलायत हुसेनखाँ, श्रीकृष्ण रातंजनकर, खादिम हुसैनखाँ, जगन्नाथबुवा पुरोहित इत्यादींनी उत्तमोत्तम बंदिशी रचल्या, ज्या आज अन्य घराण्याचे गायकही आवर्जून गातात. विलायत हुसेनखाँ, खादिम हुसेनखाँ व जगन्नाथबुवा पुरोहित यांनी मुंबई येथे आग्रा घराण्याचा खूप प्रसार केला. म्हैसूर, बडोदा व कोलकाता येथेही या घराण्याचे अनेक कलाकार आजही वास्तव्यास आहेत.

भास्करबुवा बखले, शराफत हुसेन, लताफत हुसेन, अता हुसेन, युनूस हुसेन, दिलीपचंद्र वेदी, मास्टर कृष्णा, राम मराठे, कृष्णराव गुंडोपंत गिंडे, एस. सी. आर. भट, दिनकर कायकिणी, चिदानंद नगरकर, चिन्मय नगरकर, चिन्मय लाहिरी, कुमार मुखर्जी, वि. रा. आठवले, रत्नकांत रामनाथकर, रामराव नायक, सी. आर. व्यास, जितेंद्र अभिषेकी, बबनराव हळदणकर, यशवंतबुवा जोशी, दत्तात्रय काणे, वसंतराव कुलकर्णी, इंदूधर निरोडी, यशपाल, विजय किचलु, अरुण कशाळकर, राजा मियाँ यांनी अनेक मैफलींद्वारे आणि शिष्यांद्वारे आग्रा घराण्याचा प्रसार आणि प्रचार केला. गजाननबुवा जोशी, माणिक वर्मा, व्ही. जी. जोग इत्यादी दिग्गजांनीही या घराण्याची तालीम घेतली आहे. ही गायकी धीरगंभीर व भारदस्त असल्यामुळे या घराण्यात स्त्री कलाकार कमी आढळतात. बाबलीबाई, जोहराबाई आग्रेवाली, सुमती मुटाटकर, दिपाली नाग, ज्योत्स्ना भोळे, अंजनीबाई लोयलेकर, ललित राव या त्यापैंकी काही होत.

संदर्भ :

  • देशपांडे आ. ह., घरंदाज गायकी, मुंबई १९६१.
  • मारूलकर, ना. र., संगीतातील घराणी, पुणे, १९६२.
  • मेहता, रमणलाल, आग्रा घराना : परंपरा, गायकी और चीजें, बडोदा, १९६९.