देवडीकर, गोविंद बाळकृष्ण : (१५ नोव्हेंबर १९१६ – १३ मार्च १९८६). भारतीय कृषिसंशोधक आणि शास्त्रज्ञ.
देवडीकर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या देवडी गावात झाला. त्यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण पंढरपूर येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी संपादन केली. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन तेथूनच त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय ‘सायटोजेनेटिक सर्व्हे ऑफ द जीनस कॉमेलिना इन इंडिया अँड सायटोजेनेटिक्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन कॉक्सिनिथा इंडिका’ (आता कॉक्सिनिका ग्रॅन्डिस – मराठी नाव तोंडली) हा होता. पुढे त्यांनी विविध कृषी पिकांवर जनुकीय व प्रजननशास्त्रीय प्रयोग केले. याच दरम्यान त्यांनी कायद्याची एल.एल.बी. ही पदवी मिळविली. १९४१साली त्यांनी मुंबई राज्याच्या कृषी विभागात नोकरी सुरू केली.
देवडीकर यांच्या कृषी विभागातील सेवाकाळात सिट्रस डायबॅक – (संत्री, मोसंबी यासारख्या लिंबू वर्गीय फळझाडावर ताण पडल्याने काड्या वाळून होणारी झाडाची मर), त्याबरोबर पपई, तांदूळ, कडधान्ये, तृणधान्ये व तेलबिया यांचा त्यांनी अभ्यास केला.परंतु या कामात स्वायत्ता नसल्याने त्यांनी तेथून राजीनामा दिला आणि १ जानेवारी १९४६ मध्ये पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी या संस्थेत मानद वैज्ञानिक म्हणून कामास सुरुवात केली. ही संस्था नव्यानेच सुरू झाल्याने तिचे स्थिरिकरण व संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यासाठी निधी, संशोधन साहित्य व सुविधा, इमारत अशा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. ते त्यांनी योजनापूर्वक पेलले. निवृत्त संशोधक आणि युवा संशोधक यांचा शोध घेऊन विविध संशोधन विभागांची त्यांनी उभारणी केली. १९६० मध्ये संस्थापक शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या निधनानतर देवडीकर महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीचे संचालक झाले. कृषीविषयक प्रयोग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन मिळवणे आवश्यक होते, त्यासाठी बारामतीजवळ होळ या गावी ती त्यांनी मिळवली. १९५४ मध्ये ‘इंटर स्पेसिफिक अँड इंटरजेनेटिक हायब्रिडायझेशन इन टेट्राप्लॉइड व्हीट’ (सरबती गहू) (गव्हाच्या या प्रकारात गुणसूत्रांचे चार संच असतात म्हणून याला टेट्राप्लॉइड असे म्हटले आहे) आणि ‘जेनेटिक्स अँड ब्रिडिंग ऑफ एमर व्हिटस’ (खपली गहू ) असे दोन प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केले. भारतीय कृषी संशोधन मंडळाचे (ICAR) सोयाबीन व द्राक्ष संशोधन प्रकल्प त्यांनी हाती घेतले. त्यामुळे महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीला अखिल समन्वित संशोधन कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले.
देवडीकर यांच्याकडे १९५४ मध्ये महाबळेश्वर येथील महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मधुमक्षिका संशोधन प्रयोगशाळेच्या मानद संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे मधमाशांवरील सर्वंकष संशोधनाची पायाभरणी येथे झाली. महाराष्ट्रापुरत्या व्याप्तीचा विस्तार नंतर अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या,’ केंद्रिय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या १९६०१९५४ मध्ये पुणे येथील स्थापनेतून राष्ट्रीय पातळीवर झाला. मधमाशांचे जैवशास्त्र, रोगशास्त्र, मोहोळाचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, जनुकशास्त्र व त्यावर आधारित गुणसंवर्धित राण्यांची निवड पद्धतीने पैदास, मधुमक्षिका पालनसाठीच्या उपकरणे व साधने यांचे भारतीय प्रमाणिकरण व निर्मिती, मधमाशा उत्पादित मध, मेण व अन्य पदार्थांचे संशोधन, गुणवर्धन आणि दर्जाचे प्रमाणिकरण, त्यांच्या पीक परागीकरणाच्या भूमिकेवर संशोधन आणि त्यासाठी मधमाशांचा प्रत्यक्ष उपयोग, मधुमक्षिका पालन प्रशिणासाठी श्रेणीय अभ्याक्रमाची आखणी अशा विविध अंगांनी चालणाऱ्या कार्यास त्यांनी मार्गदशन केले. त्यामुळे केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेस जागतिक पातळीवर मान्यता मिळाली.
देवडीकरांनी रेशीम उद्योगासाठी महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व हवामान योग्य नाही हा ब्रिटीशकालीन समज चुकीचा ठरवला. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या रेशीम संशोधन संस्थेचे ते १९५८मध्ये मानद संचालक झाले. भारतीय रेशीम कीटक व त्यांचा खाद्यवनस्पती यावर त्यांनी संशोधन केले. या त्यांच्या संशोधनातून रेशीम निर्मितीपासून वस्त्र निर्मितीपर्यंतचे सर्व घटक विकसित झाले.
देवडीकर यांना भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म, संगीत, कला या क्षेत्रात रस होता. विश्वाची उत्पत्ती कशी झाली असावी यावर त्यांनी केलेले सोपे प्रयोग शोध निबंधाद्वारे त्यांनी नेचर या नियतकालिकातून प्रसिद्ध केले होते.
कळीचे शब्द : #महाराष्ट्रविज्ञानवर्धिनी #मध #मेण #मोहोळ
संदर्भ :
- The Search – Maharashtra Association for the Cultivation of Science, Pune
- शिल्पकार चरित्र कोश –१जुलै, २०१५, खंड ५, कृषी आणि पशुसंवर्धन, साप्ताहिक विवेक मुंबई.
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.