मार्कोवित्झ, हॅरी एम. : (२४ ऑगस्ट १९२७ – २२ जून २०२३). अमेरिकन वित्त आणि अर्थशास्त्रज्ञ. रोखे-बाजारामधील जोखीम व बक्षिसांचे मूल्यमापन आणि निगम रोखे व बंधपत्र यांच्या मापनाच्या सिद्धांताकरिता १९९० चे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मर्टन एच. मिलर आणि विल्यम एफ. शार्पे यांच्यासमवेत देण्यात आले.
मार्कोवित्झ यांचा जन्म शिकागो, इलिनॉय येथे ज्यू कुटुंबात झाला. त्यांनी शिकागो विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयातील पदवी (१९४७), एम.ए. (१९५०) आणि पीएच.डी (१९५४) पदव्या संपादन केल्यात. या अभ्यासक्रमादरम्यान त्यांनी अर्थशास्त्रात संशोधनासाठी कार्यरत असलेल्या कोवलेस कमिशनमध्ये (Cowles Commission for Research in Economics) संशोधन केले. ते अर्थशास्त्राचे द्वीपदवीधर झालेत (१९५०). त्यांनी आपल्या प्रबंधिकेसाठी रोखे बाजाराचे गणितीय विश्लेषण हा विषय निवडला. त्याच विषयात आणखी संशोधन करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शक जेकब मार्सचॅक यांनी प्रोत्साहन दिले. रोखे बाजारासंबंधी त्यावेळी प्रचलित असलेल्या प्रारूपात केवळ वर्तमान मूल्याचा (Present Value) विचार केलेला होता, मात्र त्यांत जोखमीच्या आघातांचे (Impact of risks) विश्लेषण नाही, असे मार्कोवित्झ यांच्या लक्षात आले. याच विचारांतून त्यांनी आपला पहिला अनिश्चितता आधारित रोखेसंग्रहाचे वितरण (port folio distribution) करणारा सिद्धांत मांडला. तो वित्त जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. याच सिद्धांतावर आधारित प्रबंधांसाठी त्यांना शिकागो विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळाली . त्यानंतर ते खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये संशोधन विभागात काम करू लागले. त्यांनी रँड (RAND) निगममध्ये नोकरी स्वीकारली (१९५२–६०; १९६१–६३). तेथे कार्यरत असणारे जॉर्ज डँटझिग यांच्या मदतीने इष्टतम तंत्रांत (optimisation methods) संशोधन करून क्रांतिक रेषा रितीचा (critical line algorithm) विकास केला, ज्याच्यामुळे रोखेसंग्रहांचा इष्टतम मध्य व प्रचरण शोधणे सोपे झाले. हेच पुढे मार्कोवित्झ इष्टतम सीमान्तक (Optimal Frontier) म्हणून प्रसिद्धीस आले. रोखे संग्रहाचे वाटप या विषयावर मार्कोवित्झ यांनी लिहिलेले पोर्टफोलिओ सिलेक्शन (Portfolio Selection) पुस्तक प्रथम प्रसिद्ध झाले व नंतर त्याचीच सुधारित आवृत्ती इफिशिएंट डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट्स; १९५९ (Efficient Diversification of Investments; 1959) या नावाने प्रसिद्ध झाली.
मार्कोवित्झ यांनी पुढे हर्ब कार यांच्या मदतीने कॅलिफोर्निया विश्लेषण केंद्र (California Analysis Center – CACI) स्थापन केले. तेथे वितीय विश्लेषणाशिवाय त्यांनी रँड निगममध्ये काम करत असताना संगणक आधारित सादृशीकरण (simulation) निर्माण केलेल्या सिमस्क्रिप्ट (SIMSCRIPT) भाषेचे प्रशिक्षणही लोकांना देण्यास सुरुवात केली. त्यांनी सॅन डिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील रॅडी (Rady) स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे वित्त शाखेचे प्राध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला. न्यूयॉर्क येथील बारुख कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी येथे वित्त विभागात प्राध्यापक पदावर अध्यापन केले (१९९०). त्यानंतर ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे अर्थशास्त्र विषयाचे संशोधक-प्राघ्यापक या पदावर रुजू झालेत (१९९४).
मार्कोवित्झ यांच्या मते, गुंतवणूकदारांकडे जेव्हा विविध गुंतवणुकीचा रोखेसंग्रह असतो व त्याला / तिला त्यापासून कमाल परतावा व कमीतकमी जोखीम हवी असते, त्या वेळी गुंतवणूकदारांनी शून्य किंवा उणे सहसंबंध असलेल्या मत्तांमध्ये गुंतवणूक करायला हवी. म्हणजेच रोखेसंग्रहातील मत्तांच्या किंमतीमधील बदल हे एकमेकांशी संबधित नसावेत आणि प्रामुख्याने ते वेगळ्या दिशेने जाणारे असावेत. या कल्पनेतूनच पुढे जटील गणितीय सिद्धांत (Complex Mathematical theory) तयार झाला. संगणक व विशिष्ट आज्ञाप्रणाली वापरून जोखीम व परतावा यावर आधारित इष्टतम रोखेसंग्रह निवडणे त्यामुळे शक्य झाले.
रोखेसंग्रह सिद्धांत हे मार्कोवित्झ यांचे मूलभूत योगदान आहे. रोखेसंग्रह निवडीतील कळीचा मुद्दा म्हणजे विवेकी आर्थिक अभिकर्त्याद्वारा इष्टतम गुंतवणूक संच निवडीचा. इष्टतम रोखेसंग्रहासाठी त्यांनी मध्य आणि प्रचरण यावर आधारित प्रारूपाची व्याख्या केली. त्यांची अशी शिफारस आहे की, जोखमीच्या मत्तांमध्ये निवड करतांना नफा-तोटा मेळ हा परताव्याच्या वितरणांच्या अपेक्षित लाभामध्ये मोजला जावा आणि जोखीम ही लाभाच्या प्रमाण विचलनात मोजली जावी. मार्कोवित्झ यांनी भविष्यातील लाभांशाचाही विचार केला होता. त्यांचा मते भविष्यातील लाभांश हे अनिश्चित असल्याने रोखेसंग्रहाचे मूल्य ही भविष्यातील लाभांशाचे अपेक्षित मूल्य असावे. जोखीम व परतावा दोन्ही महत्त्वाचे वाटत असल्याने गुंतवणूकदार गुंतवणुकीत विविधता करतात. म्हणूनच मार्कोवित्झ यांनी असे गृहीत धरले की, गुंतवणूकदार रोखेसंग्रह निवडतांना पॅरेटो (Pareto) इष्टतम जोखीम-परतावा संयोग संचातूनच निवड करतील. त्यांचे रोखे संग्रह सिद्धांत (portfolio theory), विरळ सारणी पद्धती (sparse matrix methods) आणि सिमस्क्रीप्ट भाषा निर्मिती या तीन क्षेत्रात सखोल योगदान आहे.
मार्कोवित्झ यांना नोबेल पारितोषिकाशिवाय इन्फॉर्मस (Institute for Operations Research and the Management Sciences – INFORMS) या संस्थेकडून जॉन फोन न्यूमन सिद्धांत पारितोषिक (John von Neumann Theory Prize; १९८९) देण्यात आले. सखोल ज्ञान आणि अनुभवामुळे त्यांची अनेक वित्तीय कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. ते AESTIMATIO या वित्तीय क्षेत्राला वाहिलेल्या जर्नलच्या संपादक मंडळाचे सदस्य होते. मार्कोवित्झ इन्फॉर्मस (INFORMS) या संस्थेत अधिछात्र म्हणून निवडून आले. त्यांना सी. एम. ई. चा फ्रेड आर्टीटी इनोव्हेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला (२००९).
मार्कोवित्झ यांचे सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #रोखेसंग्रह #इष्टतम परतावा, #मार्कोवित्झइष्टतमसीमान्तक #सिमस्क्रीप्ट(SIMSCRIPT)
संदर्भ :
- en.wikipedia.org/wiki/Harry_Markowitz
- www.infoplease.com/…/harry-max-markowitz
- www.nbs.sk/_img/Documents/BIATEC/BIA07_02/26_29.pdf
- www.sunsigns.org/…/d/profile/harry-max-markowit
- www.researchgate.net/publication/249596643…
समीक्षक : विवेक पाटकर