भांडवल बाजारातील गुंतवणुकीमागील प्रेरणा विशद करणारे एक तत्त्व. या तत्त्वाची मांडणी प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांनी केली. त्यांच्या या विवेचनाबद्दल त्यांना १९९० चा नोबेल स्मृती पुरस्कार विभागून देण्यात आला.

मार्कोवित्झ यांनी वित्तीय अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या उपशाखेत गुंतवणूकपर सिद्धांत या तत्त्वाद्वारे मांडला. जास्त परतावा मिळविण्यासाठी जास्त धोका स्वीकारण्याची तयारी असावी, असा गुंतवणुकीचा पारंपरिक दृष्टिकोण आहे; परंतु गुंतवणुकीतील धोका आणि परतावा यांचे मूल्यमापन करणारी प्रमाणित चौकट त्यांनी १९५२ मध्ये सर्वप्रथम मांडली. त्यांच्या मते, व्यक्तीगत समभागामध्ये खूप चंचलता असते. त्यामुळे गुंतवणूकपटातील चंचलता कमी करण्यासाठी एकमेकांशी निगडित नसणाऱ्या समभागात गुंतवणूक करणे योग्य असते. जर गुंतवणुकीमध्ये योग्य प्रकारे वैविध्य ठेवण्यात आले, तर कमी धोका पत्करून जास्त परतावा मिळविणे शक्य असते.

गृहीतके ꞉

 • बाजारपेठ कार्यक्षम आहे आणि गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारे सर्व ज्ञान सर्व गुंतवणूकदारांना असते.
 • सिद्धांत जास्त प्रमाणातील नमुन्यांवर आधारित आहे आणि केंद्रीय मर्यादा सिद्धांत येथे लागू पडतो.
 • अनिश्चितता, चंचलता आणि जोखीम हे सर्व समान आहेत आणि ते प्रमाणित विचलनाद्वारे मोजता येतात.
 • गुंतवणूकदार बाजारातून जास्तीत जास्त परतावा मिळविण्याचा प्रयत्न करतात.
 • गुंतवणूकदार वास्तववादी असून जोखीम विरोधक आहेत. ते त्यांच्या गुंतवणूकपटातील चंचलतेबाबत सजग आहेत.
 • कर आणि दलाली नाममात्र आहे.
 • गुंतवणूकदारांची संख्या किमतीवर प्रभाव पडण्याइतपत मोठी नाही.
 • जोखीमरहीत दराने गुंतवणूकदार कितीही प्रमाणात कर्ज घेऊ किंवा देऊ शकतात.

आकृतीमध्ये जोखीम आडव्या अक्षावर आणि परतावा उभ्या अक्षावर दर्शविण्यात आले आहे. रोखे आणि समभाग असे गुंतवणुकीसाठी दोन पर्याय आहेत. यामध्ये जोखीम कमी असून तुलनेने परतावा कमी आहे. समभागात जोखीम जास्त असून परतावा जास्त आहे. आकृतीमध्ये या दोन प्रकारच्या गुंतवणुकीचे चित्र दर्शविले आहे. जास्तीत जास्त जोखीम आणि जास्तीत जास्त परतावा अशा पद्धतीने गुंतवणूक केली जाईल, असे परंपरागत दृष्टिकोण स्पष्ट केले आहेत.

आणि या गुंतवणुकीतील एकूण जोखीम किती हे यातील प्रत्येक गुंतवणुकीतील जोखीम व त्यातील परस्परसंबंध यांवर अवलंबून असते, असे मार्कोवित्झ आणि त्यांच्या अनुयायांचे मत होते. हा संबंध पुढील समीकरणामध्ये दर्शविला आहे.

अ आणि ब यांच्या गुंतवणूक पटातील जोखीम = मधील जोखीम + मधील जोखीम + आणि मधील परस्परसंबंध

जर हा परस्परसंबंध ऋण असेल, तर या दोन गुंतवणुकीतील एकूण जोखमीपेक्षा गुंतवणूकपटातील जोखीम कमी असते. गुंतवणुकीमध्ये विविधता ठेवण्यामुळे या दोन गुतवणुकीतील जोखीम कमी किंवा ऋण राहू शकते. कर्जरोखे आणि समभाग यांना जोडणाऱ्या रेषेवरून गुंतवणुकीतील विविधता दर्शविता येते. या वक्रास कार्यक्षम सीमा किंवा मर्यादा वक्र असे म्हणतात.

मर्यादा ꞉

 • सिद्धांतामध्ये बाजारपेठा कार्यक्षम आहेत, असे गृहीत धरले आहे; तथापि प्रत्यक्षात हे गृहीतक शक्य नसते.
 • सर्व गुंतवणूकदार काही किंवा सर्व माहितींबाबत अज्ञानी असतात.
 • गुंतवणूकदारांना पर्याप्त गुंतवणूकपटापेक्षा त्यांना समाधानकारक वाटणारा गुंतवणूकपट ते शोधत असतात.
 • परताव्यामध्ये सर्वसाधारण वितरण असतेच असे नाही.
 • अपेक्षित सरासरी परताव्याच्या जवळ जाणारा बाजारातील परतावा असतोच असे नाही. सिद्धांताने सूचविल्यापेक्षा प्रत्यक्ष परतावा कमी किंवा अधिक असू शकतो, अशा घटना वारंवार एकत्रितपणे होतात.
 • सर्व गुंतवणूकदार सारखेच नसतात. बाजाराविषयी असलेले भय आणि वाढावा मिळविण्याची हाव यांची भूमिका गुंतवणूक वर्तणुकीत मोठी असते.
 • बाजाराच्या लहरीपणापेक्षा पैसा बुडण्याची काळजी गुंतवणूकदारांना असते.

संदर्भ ꞉

 • Bodie, Zvi; Kane, Ales Alan; Marcus, Alan J., Investments, New York, 2011.
 • The Journal of Finance, vol, 7, 1952.

समीक्षक ꞉ संतोष दास्ताने

भाषातरकार ꞉ सुनील ढेकाणे