मणी अय्यर, पालघाट टी. एस. : (१२ जून १९१२ – ३० मे १९८१). स्वत:ची वेगळी वादन शैली निर्माण करून मृदंग वादनामध्ये ठळक योगदान दिलेले कर्नाटक संगीतातील एक महत्त्वपूर्ण कलाकार. कर्नाटक संगीतातील मृदंगवादकांच्या पवित्र त्रिमूर्तीमध्ये पालघाट टी. एस. मणी अय्यर, पलानी सुब्रमण्यम् पिल्लई आणि रामनाथपुरम् सी. एस. मुरुगभूपति या तिघांचा समावेश आहे.

मणी अय्यर यांचा जन्म केरळ राज्यातील पझायनूर येथे संगीतप्रेमी परिवारात झाला. त्यांचे मूळ नाव थिरुविलवामलई रामस्वामी असे आहे. त्यांचे आजोबा हे ही प्रसिद्ध गायक होते. वडील शेष भागवतर आणि आई आनंदाम्बा यांच्याकडून मणी अय्यर यांना प्रारंभीचे संगीत शिक्षण मिळाले. इयत्ता ५ वी पर्यंत त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते; मात्र त्यांची आवड मृदंगवादनाची होती. शेष भागवतर हरिकथा प्रवचनात कीर्तनकारांसोबत प्रमुख गायक म्हणून कार्यक्रम करीत असत आणि मणी यांना हरिकथा प्रवचनामध्ये उपयोगी पडणाऱ्या साकी, दण्डी यांसारख्या पारंपरिक वाद्यांचे शिक्षणही देत असत. याचवेळी मणी अय्यर त्यांचे शेजारी विश्वनाथ अय्यर यांच्याकडून मृदंगवादनाचेही धडे घेत होते. ते दहा वर्षांचे असताना त्यांना श्रीरामकृष्ण भागवतर यांच्या कीर्तनात मुख्य मृदंगवादक नसल्याने त्यांच्या ठिकाणी मृदंगवादन करण्याची संधी मिळाली. याला उपस्थित सर्वांचीच खूप पसंती मिळाली. त्यानंतर ते श्रीरामकृष्ण भागवतर व त्यांचे वडील शेष भागवतर यांच्या गायनात मृदंगाची साथसंगत करू लागले. यानंतर त्यांनी काही काळ पालघाट राम भागवतर आणि एन्नाप्पदम् वेंकटराम भागवतर या संगीतकारांनाही साथसंगत केली.

मणी अय्यर चौदा वर्षांचे असताना त्यांनी तत्कालीन लोकप्रिय कीर्तनकार चेम्बई वैद्यनाथ भागवतर यांच्याबरोबर कोलकाता, चेन्नई, बनारस इत्यादी ठिकाणी अनेक कार्यक्रम केले. यामुळे ते रसिक श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध झाले. तंजावर येथील कार्यक्रमात त्यांची भेट प्रसिद्ध मृदंगवादक टी. वैद्यनाथ अय्यर यांच्याशी झाली आणि मणी अय्यर यांनी त्यांच्याकडून मृदंगवादनाचे पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांना त्यामुळे मृदंगवादनातील अनेक बारकावे कळले. पुढे अथक मेहनतीने आणि डोळस रियाजाने त्यांनी वादनाची निराळी पद्धत शोधून काढली. कर्नाटक संगीतपद्धतीचे ख्यातनाम गायक अरियकुडि रामानुज अयंगार यांची व मणींची ओळख झाली. पुढे पाच दशके मणींनी त्यांना मृदंगाची साथ केली. मणी अय्यर यांनी एकल वादनाचेही कार्यक्रम केले. त्यांनी देशपरदेशात अनेक गायक व वादकांसोबतही कार्यक्रम केले. मृदंगवादनातील त्यांचे हस्तकौशल्य, गायकाचे गाणे समजून घेऊन ते समंजसपणे वादन करीत त्यामुळे अनेक गायकांबरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केले. मणी अय्यर यांनी नयना पिल्लई, मुसिरी सुब्रमणियम् अय्यर, सेम्मनगुडी श्रीनिवास अय्यर, अलाथूर ब्रदर्स आणि मदुराई मणी अय्यर यांसारख्या त्या काळातील जवळजवळ प्रत्येक आघाडीच्या कलाकारांना साथ दिली आहे. एम. एल. वसंतकुमारी, डी. के. पट्टम्मल यांसारख्या अनेक नामवंत महिला कलाकारांसाठीही त्यांनी मृदंगवादन केले.

संपूर्ण भारतातील आणि परदेशातील अनेक शिष्यांना त्यांनी शिकवले, ज्यांपैकी अनेक प्रसिद्ध आहेत. १९५६ मध्ये त्यांना कर्नाटक वाद्य संगीतासाठी राष्ट्रपती पुरस्कार आणि नंतर संगीत अकादमीचे अध्यक्षपद देण्यात आले. सप्टेंबर १९६५ मध्ये त्यांना लंडनमधील कॉमनवेल्थ म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्याचवेळी एडिनबर्ग महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या युनायटेड किंग्डमच्या दौऱ्यात त्यांच्या जादूई लयीने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांना येहुदी मेन्युहिन सारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संगीतकारांकडूनही दाद मिळाली.

मणी अय्यर यांच्या कलेकरिता त्यांना अनेक मानसन्मानांनी  गौरविण्यात आले. मणी अय्यर हे पहिले मृदंगवादक आहेत, ज्यांना मद्रास म्युझिक अकादमीकडून ‘संगीत कलानिधी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले (१९६६). याच वर्षी त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

मणी अय्यर यांचे कोची येथे निधन झाले. पालघाट राजू, एम. वेलूकुट्टी नायर, कमलाकर राव इत्यादी त्यांचे शिष्य होत. पुत्र टी. आर. राजमणी (मृदंगवादक), कन्या ललिता शिवकुमार (गायन) आणि पुत्र टी. आर. राजाराम (व्हायोलिन वादक) यांनी त्यांची संगीताची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.