पर्वतकर, खाप्रूमामा : (? १८८०–३ सप्टेंबर १९५३). प्रख्यात तबलावादक. खाप्रूमामा (खाप्रूजी) उर्फ लक्ष्मणराव पर्वतकर यांचा जन्म गोव्यामधील पर्वती या गावी संगीतकलेचा पिढीजाद वारसा लाभलेल्या घराण्यात झाला. त्यांचे मामा रधुवीर यांच्याकडे सारंगीवादन व चुलते हरिश्चंद्र यांच्याकडे ते तबलावादन शिकले. एक धृपदीये अनंतबुवा धवळीकर यांच्याकडे त्यांनी धृपद-धमाराची तालीम घेतली. सुरुवातीस त्यांनी तबल्यावर व सारंगीवर अनेक प्रसिद्ध गायक-गयिकांची साथ केली.

खाप्रूमामांना उपजतच लयकारीची उत्तम समज होती. ते सदैव मात्रा-आवर्तनांच्या गणितात मग्न झालेले असत. अल्पावधीतच त्यांनी लयकारीत अद्वितीय प्रावीण्य संपादन केले. गोव्यातील लोकप्रिय तालवाद्य ‘घुमट’ ते अत्यंत कौशल्याने वाजवत. त्यांनी लयकारीमध्ये विविध, नावीन्यपूर्ण व आश्चर्यजनक प्रयोग केले आणि तालाच्या जाणकारांमध्ये लौकिक संपादन केला. दिलेल्या मूळच्या लयीत कोणतीही पट ते लीलया करीत असत. त्याचप्रमाणे ते एकाच वेळी एका पायाने त्रिताल, दुसऱ्‍या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्‍या हाताने चौताल धरून तोंडाने सवारीचा ठेका म्हणत असत. तोंडाने विशिष्ट बोलांची तीन आवर्तने करत असतानाच ते त्याच वेळी तबल्यावर पाच वेळा तोच बोल वाजवून दोन्हींची सम अचूक साधत असत आणि हे करताना लयीची यत्किंचितही ओढाताण झालेली दिसून येत नसे. एखादी परण तोंडातून उलटी म्हणत असतानाच तबल्यावर सुलटी वाजवून ते समेवर बरोबर येत. त्यांनी पावणेसोळा मात्रांचा ‘परब्रह्म’ ताल रचून त्यात पाव मात्रेचे १२५ ‘धा’ असलेली ‘महासुदर्शन’ नामक परण बांधली. या त्यांच्या अद‌्भुत व अद्वितीय लयसिद्धीमुळेच त्यांना ख्यातनाम गायक अल्लादियाखाँ यांनी ‘लयब्रह्मभास्कर’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

‘यंग इंडिया’ कंपनीने पर्वतकरांच्या वादनाची एक ध्वनिमुद्रिका काढली होती. पर्वती या गावी त्यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र रामकृष्ण यांच्याव्यतिरिक्त बाळकृष्ण पर्वतकर व दत्ताराम पर्वतकर हेही त्यांचे प्रमुख शिष्य होत.