(स्थापना : सन १८८३). भारतातील एक जुनी विज्ञान संस्था. मुंबईतील काही हौसी निसर्गप्रेमींनी भटकंती अंती एकत्र येऊन जमा केलेली माहिती एकमेकांना सांगण्यासाठी व्हिक्टोरिया आणि आल्बर्ट पदार्थ संग्रहालयाची वास्तू निवडली. सध्या या संग्रहालयाचे नाव डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई सिटी म्यूझीयम असे आहे.
सध्या सोसायटीच्या संग्रहालयात स्तनी प्राण्यांचे २०,००० जातींचे नमुने, पक्ष्यांचे ६३ कपाटांच्या खणांत भरलेले ३०,००० जातींचे नमुने, पक्ष्यांच्या अंड्यांचे ५,५०० प्रकार , सरीसृप जातींचे ६,००० आणि उभयचर प्राण्यांचे ४,००० नमुने, माशांचे ६०० तर कीटकांचे ६,४५,०००, विंचू, कोळी नमुना प्रकार २०० असे विविधता आणि संख्या यांच्या दृष्टीने भव्य संग्रह आहे.
निसर्गसंवर्धन हा प्रमुख हेतू समोर ठेऊन वैज्ञानिक संशोधन करणे, विज्ञानसिद्ध माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविणे आदी कामे सोसायटीच्या माध्यमातून केले जाते. निसर्गसहली काढणे, निसर्गशिबिरे आयोजित करणे, नैसर्गिक इतिहासासंबंधीच्या विषयाला वाहिलेले ‘हॉर्नबिल’ नावाचे वैज्ञानिक नियतकालिक (जर्नल) प्रकाशित करणे असे उपक्रमही राबविले जातात.
एन्व्हीस (Environmental Information System) हा सोसायटीचा एक विभाग आहे. तो पक्ष्यांच्या परिसंस्थांवर लक्ष केंद्रित करतो. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वनविभाग आणि हवामान बदल खाते एन्व्हीसला साहाय्य पुरविते. या विभागाने सन २०१५ मध्ये गोवा पक्षी उत्सवात भाग घेतला. या उपक्रमाला गोवा वनविभागानेही साथ दिली. पक्ष्यांच्या अभ्यासासाठी, रक्षणासाठी, संवर्धनासाठी कोणते प्रयत्न चालू आहेत आणि पुढे करता येतील हे लोकांपुढे मांडणे त्यामुळे त्यांना शक्य झाले. त्यांच्या इंटरनेट ऑफ बर्ड्स (https://internetofbirds.com/) या दुव्यावरून भारतभरच्या पक्षीप्रेमींना एखादा पक्षी कोणत्या प्रजातीचा वा जातीचा आहे हे त्या पक्ष्यांच्या प्रतिमेवरून लगेच ओळखता येणे शक्य झाले आहे. सोसायटीचा एक बाल विभागही आहे. सामान्य लोकांना शास्त्रीय माहितीची देवाणघेवाण करण्यात अडचण येऊ नये म्हणून भारतीय भाषांमध्ये लिहिलेले लेखही आपल्या नियतकालिकांत समाविष्ट करते.
सन १९९३ साली सोसायटीला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून शासनाने गोरेगाव उपनगरात जमीन दिली. सोसायटीच्या वतीने निसर्गसंवर्धन शिक्षण अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमात फुलपाखरे, पक्षी, जैविक विविधता, सागरी जीवांचे संवर्धन, सरीसृप, वनस्पतिशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणालाही हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. शाळकरी मुलांसाठी ऑनलाईन चित्रकला, रंगकाम स्पर्धा असे उपक्रमही राबविले जातात.
सोसायटीचा यशस्वीपणे राबवलेला एक निसर्गसंवर्धन प्रकल्प म्हणजे पांढऱ्या पुठ्ठयाच्या गिधाडांचा सर्वनाश टाळणे. पाठीवर आणि बुडाशी पांढरी पिसे असणारी व्हाइट रम्प्ड गिधाडांची संख्या अतिचिंताजनक प्रमाणात घटली होती. १९८० च्या सुमारास पांढऱ्या पुठ्ठयाची चार कोटी गिधाडे भारतात होती. सन २००० मध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कॉनझर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने ही गिधाडे जवळजवळ नष्ट झाली आहेत अशी धोक्याची घंटा वाजवली होती. २००७ मध्ये भारतातील ९९% गिधाडे मेली आहेत असे नोंदले होते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी बर्ड-लाईफ या संस्थेबरोबर सोसायटीने पावले उचलली. विविध देशांत गिधाडे पैदास केंद्रे स्थापन केली. भारतात जटायू गिधाड पैदास केंद्र हरयाणात स्थापन केले. गिधाडांच्या तीन जाती टिकवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न या दोन संस्था करत आहेत. पश्चिम बंगालमधील बक्सा व्याघ्र प्रकल्पाच्या भूभागात बंगाल राज्य शासन आणि सोसायटीनने २००५ पासून गिधाडांच्या पैदाशीचा प्रयत्न चालविला आहे.
सोसायटीच्या वृक्ष-राजदूत (ट्री अम्बॅसॅडर) योजनेखाली वर्षाकाठी ठरावीक रक्कम घेऊन निसर्गप्रेमी देणगीदाराचे वा त्यांनी सुचवलेल्या प्रियजनाचा नामफलक झाडाला लावला जातो. सोसायटीतर्फे झाडाची काळजी घेतली जाते.
संदर्भ :
- https://www.bnhs.org/who-we-are
- https://www.bnhs.org/public/authorData/Stalwartissue(1)-EHAitken.pdf
- https://www.bnhs.org/content-details/mumbai-cec
- http://bnhsenvis.nic.in/
- https://internetofbirds.com/
- http://www.bnhsjournal.in/
- https://www.atlasobscura.com/articles/the-hidden-natural-history-museum-of-mumbai-india
समीक्षक : मोहन मद्वाण्णा