पिचू सांबमूर्ती : (१४ फेब्रुवारी १९०१ — २३ ऑक्टोबर १९७३). ज्येष्ठ संगीततज्ज्ञ, लेखक, संगीताचे प्राध्यापक आणि कर्नाटक संगीताबरोबरच पाश्चात्य संगीताची माहिती असलेले निपुण समीक्षक. पिचू सांबमूर्ती यांचा जन्म तत्कालीन मद्रास प्रांतातील व सध्याच्या आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील बीटरगुंटा येथे झाला. त्यांचे संगीतातील गायनाचे व व्हायोलिनवादनाचे शिक्षण बी. कृष्णय्या, एम. दोरायस्वामी अय्यर, एस. ए. रामस्वामी अय्यर, कृष्णास्वामी भागवतर यांचेकडे झाले होते. १९२८ मध्ये त्यांनी क्वीन मेरी कॉलेज येथे संगीताचे अध्यापन सुरू केले होते; पण १९३१ साली जर्मनी येथील ड्यूश अकादमीची पाश्चात्त्य संगीताचे अध्ययन करण्यासाठीची शिष्यवृत्ती त्यांना मिळाल्याने ते तिकडे गेले. तिथून परत आल्यावर ते मद्रास विश्वविद्यालयात संगीताचे व्याख्याता म्हणून १९६१ पर्यंत कार्यरत राहिले. त्यानंतर ते संगीत विद्यालय, चेन्नई येथे संचालकपदी रुजू झाले. १९६४-६६ यादरम्यान ते तिरुपती येथील व्यंकटेश्वरा विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. काही कालावधीनंतर ते पुन्हा मद्रास विद्यापीठामध्ये रुजू झाले.

पिचू सांबमूर्ती यांचा त्यांच्या कामाच्या निमित्ताने भारतातील अनेक विद्यापीठांशी जवळून संबंध आला. विद्यापीठ अनुदान आयोगाशीही (यू.जी.सी.) ते जोडले गेले. संगीताच्या ओढीने आणि त्यातील चिकित्सेने त्यांनी भरपूर प्रवास केला. त्यामुळे त्यांना दाक्षिणात्य संगीताचे राजदूत असे म्हटले गेले. त्यांनी कर्नाटक संगीताचा प्रचार व प्रसार देशविदेशात करण्यासाठी ऑर्केस्ट्राही काढला होता. या अनेक कार्यादरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रंथ निर्मिती करून सर्व संगीत विद्यार्थी, शिक्षक यांची मोठी सोय करून ठेवली. कर्नाटक संगीतामधील तत्त्वे, कलाकार, सूची, शिक्षण विचार आदी विषयांवरील त्यांचे लेखन आधारभूत मानले जाते. चेन्नईमधील सरकारी संग्रहालयातील वाद्ययंत्रांची सूची त्यांनी तयार करून ठेवली. सर्वत्र मान्यता पावलेले त्यांचे काही ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत. South Indian Music, 6 Volumes Series (१९२९), The Melakarta jany Raga Scheme (१९३३), South Indian Music System (१९३३), Shyaamashastry and other famous figures of South Indian Music (१९३५), A Dictionary of South Indian Music and Musicians (१९५२), Laya Vadyas (१९६३), Thyagaraja (१९६७), Catologue of Musical Instruments (१९७६), Aids to teaching OF Music (१९८४), Elements of Western Music for Students of Indian Music (With Notation), (२००६)  इत्यादी त्यांचे सुमारे पन्नास ग्रंथ आहेत.

पिचू सांबमूर्ती यांना संगीत नाटक अकादमीची अधिछात्रवृत्ती मिळाली होती (१९६३). तसेच भारत सरकारने ‘पद्मभूषण’ (१९७१) पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाकरिता मद्रास म्युझिक अकादमीचा ‘संगीत कलानिधी पुरस्कार’ (१९७२) त्यांना देण्यात आला.

पिचू सांबमूर्ती यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. मद्रास म्युझिक अकादमीने त्यांचे चरित्र Prof. Sambamoorthy, the Visionary Musicologist या नावाने प्रकाशित केले आहे (२००१).