उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील एक जुना गायनप्रकार. बाराव्या शतकापासून तो रूढ असल्याचे दिसते. ‘चतुर्मुख’ या नावाने त्याचा निर्देश सोमेश्वरलिखित मानसोल्लास वा अभिलषितार्थचिंतामणि (११२७) या ग्रंथात आढळतो. हा प्रकार जरी ख्याल, ठुमरी इ. गीत प्रकारासारखा प्रसिद्ध नसला तरी हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये आपले वेगळे स्थान राखून आहे. मैफिलीमध्ये आपल्या अंगभूत वैशिष्ट्यामुळे रसिकांना आकर्षित करून घेणारा हा प्रकार. नावाप्रमाणेच याच्या रचनेत चार विविध अंगांचा अंतर्भाव आहे. ह्या गायनप्रकारात अस्ताई व अंतरा हे दोन विभाग धृपद या शास्त्रीय गायनप्रकारासारखे बंदिस्त व सार्थ शब्दांत रचलेले असतात. पहिल्या भागात ख्यालाप्रमाणे शब्द्युक्त बंदिश, दुसऱ्या भागात तराण्याचे बोल, तिसऱ्या भागात त्या रागातील सरगम (स्वरनामे) म्हणजेच ‘सा, रे, ग, म’ आदी स्वरनामांनी गुंफलेले असते आणि शेवटच्या भागामध्ये मृदंग अथवा पखवाज या तालवाद्यांची छोटी परण अथवा बोल असे या गायन प्रकाराचे स्वरूप असते. रागसंगीताचे नियम पाळून रचलेल्या ह्या गायनप्रकाराची विस्तारक्षमता देखील मर्यादितच आहे. विविधता हेच त्याचे वैशिष्ट्य होय. आजकाल हा फारसा गायला जात नाही.
समीक्षण : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.