संगीतातील बंदिस्त नियमबद्ध रचनेचे गान म्हणजे प्रबंध गायन होय. संगीत कला स्वभावतः प्रगमनशील असल्यामुळे आजच्या संगीताचे स्वरूप शंभर वर्षांपूर्वीच्या संगीतापेक्षा वेगळे आहे. वैदिक ऋचांपासून छंद गायन, छंद गायनापासून प्रबंध गायन आणि प्रबंध गायनापासून धृपद गायन अशी शृंखला ऐतिहासिक पुराव्यानुसार दिसून येते. गुरुवर्य श्री. ना. रातंजनकर, ठाकूर जयदेव सिंह व भरत व्यास इत्यादी संगीतज्ज्ञ, व्यासंगी आणि शोधकांच्या मतानुसार धृपदाचा आविष्कार हा प्राचीन संस्कृत धृव-प्रबंधातूनच झाला आहे. ‘प्रबंध’ या शब्दाची फोड म्हणजे ‘प्रबध्यते इति प्रबंध’ अशी आहे. कोणत्याही बंदिस्त नियमबद्ध रचनेस प्रबंध म्हटले जाते. मध्ययुगीन वाङ्मयात प्रबंध ही संज्ञा दोन वेगवेगळ्या संदर्भात योजण्यात येत असे. एक काव्यक्षेत्रात व दुसरी संगीतक्षेत्रात. काव्यक्षेत्रात ओवी, श्लोक, अनुष्टुभ वगैरे छंदांना प्रबंध म्हणत. या छंदात रचलेल्या धवळे, मंगले, अष्टपद, विष्णुपदे इत्यादी गीतांना व महाकाव्य, खंडकाव्य नाटके इत्यादी संपूर्ण ग्रंथांनादेखील प्रबंध म्हणण्याची परंपरा आहे. छंद, गीत व ग्रंथ या तीन प्रबंध प्रकारांपैकी गीत-प्रबंध हे संगीताच्या बैठकीत गायले जात. हे प्रबंध गाण्याची जी शैली ती प्रबंध गायकी.

प्रबंध गायनाचा प्रचार मध्यकालीन युगात होता. त्या काळातला सर्वांत महत्त्वाचा आधार ग्रंथ म्हणजे शारंगदेवलिखित संगीत रत्नाकर. या ग्रंथकाराचा काळ इ.स. १२१०–१२४०. संगीत रत्नाकराचा चौथा अध्याय हा प्रबंधाध्याय आहे. या ग्रंथात प्रबंधाचे शेकडो प्रकार सांगितले आहेत. सर्वप्रथम ग्रंथकाराने प्रबंधाचे तीन मुख्य भाग केले आहे. १) सूद प्रबंध, २) आलिक्रम प्रबंध आणि ३) विप्रकीर्ण प्रबंध. पुढे सूद प्रबंधाचे दोन प्रकार केले आहेत – १) शुद्ध सूद, २) सालग सूद. यापुढे धृव-प्रबंध हा सालग सूदचा एक प्रकार मानून धृव-प्रबंधाचे सोळा प्रकार दिले आहेत. त्याचे रस व तालही सांगितले आहेत. हे सोळा धृव-प्रबंध पुढीलप्रमाणे जयंत, शेखर, उत्साह, मधुर, निर्मल, कुन्तल, कोमल, चार, नंदन, चन्द्रशेखर, कामोद, विजय, कंदर्प, जयमंगला, तिलक व ललित या नावांनी दिले आहेत. त्यांतील काही नावे आज रागांची नावे म्हणून प्रचलित आहेत. प्रबंध गायकीत हे जे धृव-प्रबंध गायले जात, त्यावरूनच त्या गायकीला धृवपद गायकी हे नाव पडले असावे. प्रबंधगीताचे धृवपदात रूपांतर/ परिवर्तन झालेले दिसून येते.

प्रबंध या संज्ञेचा संगीत क्षेत्रातील अर्थ विख्यात संगीततज्ञ ‘पार्श्र्वदेव’ यांनी केलेल्या त्याच्या व्याख्येतून अभ्यासता येतो.

चतुर्भिर्धातुभिः षद्भिश्चाङ्गैर्यस्मात् प्रबध्यते। तस्मात् प्रबन्धः कथितो गीतलक्षणकोविदैः।।

अर्थात, चार धातूंनी व सहा अवयवांनी बांधलेला तो प्रबंध. प्रबंधाचे चार धातू म्हणजे उद्ग्राह, मेलापक, धृव व आभोग आणि सहा अवयव म्हणजे – तेन, पद, बिरुद, पाट, ताल व स्वर. धातू हे प्रबंधरचनेच्या आणि अवयव हे प्रबंधगायनाच्या दृष्टीने मानले गेले आहेत. उद्ग्राह, मेलापक, धृव व आभोग हे प्रबंधाचे धातू शरीराप्रमाणे प्राणभूत घटक मानले आहेत. काही प्रबंधात ध्रुव व आभोग यांच्यामध्ये अंतरा नावाचा आणखी एक धातू असतो. असे सांगीतले आहे. म्हणून प्रबंधाचे एकूण पाच धातू म्हणजे उद्ग्राह, मेलापक, ध्रुव, अंतरा व आभोग; मात्र प्रबंध हा चार धातूंचाच असायला हवा, असे शारंगदेवांनी म्हटले आहे.

प्रबंधाचे तीन भेद आहेत आणि याच तत्त्वाने आज अधिकतर जी धृवपदे गायिली जातात त्यात स्थायी व अंतरा असे दोनच धातू दिसून येतात. स्थायी म्हणजे उद्ग्राह आणि ध्रुव म्हणजे अंतरा असे दोनच धातू असलेला हा द्विधातुप्रबंध. अंतऱ्यानेच त्या प्रबंधाला पूर्णता येते म्हणून तोच त्याचा आभोग आणि स्थायीने सुरुवात होते म्हणून तो त्याचा उद्ग्राह. याचा अर्थ, द्विधातू प्रबंधातील स्थायीत म्हणजे ध्रुवात उद्ग्राह आणि अंतऱ्यात आभोग समाविष्ट आहे. तेन, पद, बिरुद, पाट, ताल व स्वर अशी प्रबंध गायनाची सहा अंगे संगीत रत्नाकरात सांगितली आहेत. ‘तेन’ अंग हे आजच्या ‘नोम् तोम्’ आलापाचेच पूर्वरूप होते; कारण त्याने प्रबंध गायनाला सुरुवात केली जात असे आणि म्हणून ते मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे. आता हे मांगल्याचे प्रतीक का ? याचा उलगडा शारंगदेवांनी ‘ते’ हे गौरीचे आणि ‘न’ हे शंकराचे प्रतीक आहे. असा केला आहे.

आजच्या धृपद गायनात नोम् तोम् मध्येही ‘त्’ व ‘न्’ हे वर्ण नियमित वापरलेले दिसतात. त्यानंतर ‘बिरुद’ म्हणजे देवतांची वा राजाची स्तुती, कारण संस्कृतमध्ये ‘बिरुद’ असा स्तुतिगीत या अर्थी शब्द आहे. बिरुदात मुख्यतः देवतांच्या व राजांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले असते.

उदाहरणादाखल खाली एक प्रबंध/ धृवपदे दिली आहेत. त्यात देवतांची व राजांची स्तुती कशी केली आहे हे दिसून येते.
१) स्थायी : परब्रह्म परमेश्वर परमात्मा परमपुरुष । नंदनंदन आनंदकंद जसोदानंद श्रीगोविंद ।।

अंतरा : दीनानाथ दुःखभंजन पद्मनाभ जगवंदन । वासुदेव बनवारी जगत्पति प्रभु नंदनंदन ।।

‘पाट’ ही संज्ञा वाद्यांच्या बोलासंबंधी आहे. गायकाने वाद्याच्या साथीने म्हटलेले मृदंग किंवा बीन यांसारख्या वाद्याचे बोल म्हणजे ‘पाट’. प्रबंध गायकीत जे विविध प्रबंध गायले जात, त्यात ‘धृवप्रबंधा’ नावाचा प्रबंध विशेष महत्त्वाचा आहे. कारण त्याचेच रूपांतर धृपदात झाले आहे. प्रबंध गायकीत धृवपद हे महत्त्वाचे अंग होते. शारंगदेवानी संगीत रत्नाकरात ‘धृवत्वाच्च धृव’ असे स्पष्ट म्हटले आहे आणि त्यावर कल्लिनाथाची टीका पुढीलप्रमाणे आहे – उद्‌ग्राह, मेलापक, धृव व आभोग या चार धातूंपैकी मेलापक गाळला तर त्रिधातुप्रबंध आणि मेलापक व आभोग हे दोन वगळले तर द्विधातुप्रबंध होतो. उद्‌ग्राहानेच प्रबंधाला सुरुवात होत असल्यामुळे तो गाळता येत नाही.

आज जी धृवपदे गायिली जातात त्यात अधिकतर स्थायी व अंतरा असे दोनच धातू दिसून येतात, कारण उद्‌ग्राह व धृव मिळून स्थायी झाली आणि अंतरा व आभोग मिळून अंतरा झाला. मग धृव-प्रबंधाचेच रूपांतर धृपदात झाले आणि धृपदाने प्रबंधाचीच वैशिष्ट्ये व तत्त्वे आत्मसात केली. परंतु हा प्रवास केव्हा सुरू झाला हे जाणून घेणे आवश्यक आहे. धृवगीताचे सर्वांत प्राचीन सविस्तर विवरण भरत नाट्यशास्त्राच्या बत्तीसाव्या अध्यायात मिळते. प्रत्यक्ष नाट्य-प्रयोगात आणि त्याही पूर्वी धृवगीतांचे महत्त्वपूर्ण स्थान असण्याचा संकेत नाट्यशास्त्रात पावलोपावली वर्णिला आहे.

धृवगीतांमध्ये स्वर, पद व ताल अशा तिन्ही अवयवांचे सामंजस्य असण्याचा ग्रंथोक्त पुरावा उपलब्ध आहे. वर्ण, अलंकार, लय, यती, पाणी या अंगांचे पारस्परिक ‘धृव’ अर्थात ‘नियत संबंध’ असल्याकारणाने त्यांना ‘धृवा’ ही संज्ञा प्राप्त झाली. आचार्य अभिनवगुप्तांच्या कथनानुसार नाटकाच्या विभिन्न प्रसंगांमध्ये भावनात्मक ऐक्य प्रस्थापित झाल्याकारणाने या नाट्य-संगीतांना धृवा ही संज्ञा प्राप्त झाली. धृवगीतांचे गायन नाटकाच्या विभिन्न प्रसंगांत केले जाते. धृवगीतांच्या परंपरेचे क्रियात्मक रूप नाट्यशास्त्रापूर्वीपासून परिवर्तित संस्कृत नाट्यग्रंथांमध्ये नियमित दिसून येते. कालीदासांच्या विक्रमोर्वशीय नाटकात धृवगीतांचा प्रयोग केल्याचा उल्लेख आहे. भरतांच्या मते धृवागीतांचे योग्य स्थानी, यथारस गायन स्वर, वर्ण, स्थान, लय आदी अंगाबरोबरच केल्याने नाट्यप्रयोग अधिक परिणामकारक होतो. धृवगीतांचे गायन त्या काळात प्रचारात असलेल्या ग्रामरागात केले जात असल्याचा स्पष्ट उल्लेख नाट्यशास्त्रात आहे. या धृवगीतांचा नाट्यांतर्गत प्रयोजनानुकूल प्रयोग व गायन नाट्यप्रवेशापासून नाट्यसमाप्तीपर्यंत करण्याच्या दृष्टीने पंचविध वर्गीकरण करण्यात आले आहे. त्या धृवगीतांना १) प्रावेशिकी, २) आक्षेपिकी, ३) प्रासादिकी, ४) अंतरा आणि ५) नैष्क्रामिकी अशा संज्ञा देण्यात आल्या. धृवगीतांमध्ये शब्दांचा प्रयोग भावाभिव्यक्तीसाठी आवश्यक मानला गेला. भरतकालीन धृवागीतांत प्रथम आलाप गायन त्यानंतर वाद्य व त्या अंतर्गत छंद गायन हाच क्रम योग्य मानला गेला आहे. भरतकालीन धृवगीतांत शब्द अथवा काव्यगायनाचे श्रेष्ठ निदर्शन केले जात असे. त्या धृवागीतांचा हेतू अर्थाभिव्यक्ती असल्याकारणाने त्यांचे गायन अशाच प्रसंगी केले जाई की, त्याच्या हेतू सिद्धीसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे. भरतकालीन धृवगीतांचा वापर, प्रयोग, गायन, भावाभिव्यक्ती, अर्थाभिव्यक्ती या सर्व तत्त्वांचे पालन आपल्याला आज महाराष्ट्रातील प्रचलित हरिकीर्तनात दिसून येते. आपल्या कीर्तनात सर्वप्रथम कीर्तनकार ब्रह्मनिरूपण म्हणजे कोणत्याही एका धार्मिक तत्त्वावर विस्तृत व्याख्यान देतो. त्या व्याख्यानातील तत्त्वांना पुष्टी देण्यासाठी उदाहरणात्मक एखादी पौराणिक कथा तो सांगतो. या दोन भागांमधील अवकाशात कीर्तनकार साहाय्यक गायकांबरोबर मृदंगादी वाद्यांसोबत श्रोत्यांच्या मनोरंजनाकरिता प्रबंध गायन/धृपद गायन प्रस्तुत करतो. संभवतः भरतकालीन प्राचीन परंपरेनुसार देव-देवतांच्या जीवनाबद्दल धार्मिक नाटकांमधील धृवगीतांचा व कालांतराने धृव-प्रबंधांचा, दोन प्रयोगांच्या अवकाशांमध्ये ‘विष्कम्भक’ याच अर्थाने प्रयोग केला जात होता. आधी प्रबंध गायनाची आणि नंतर धृपद गायनाची ही परंपरा प्राचीन काळापासून देवालयांत, मंदिरांत, धार्मिक कार्यप्रसंगी आजतागायत चालत आली आहे.

समीक्षण : सुधीर पोटे