गोड्या पाण्यातील एक खाद्य मत्स्य. याचा समावेश अँग्विलिफॉर्मिस (Anguilliformes) गणातील अँग्विलिडी (Anguillidae) कुलात होतो. या माशाचा आढळ गोड्या पाण्यात ३–१० मी. खोलीपर्यंत असतो. याचे शास्त्रीय नाव अँग्विला बेंगालेन्सिस (Anguilla bengalensis) असे आहे. हा मासा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळतो. त्याचा प्रसार भारत, पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार व दक्षिणपूर्व आफ्रिका येथे आहे. भारतात मणिपूर, मेघालय, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम व नागालँड येथे त्याचा आढळ आहे. याच्या अँ. बेंगालेन्सिस बेंगालेन्सिस (Anguilla bengalensis bengalensis) व अँ. बेंगालेन्सिस लॅबिएटा (Anguilla bengalensis labiata) या दोन उपजाती आहेत. यांना सामान्यपणे इंग्रजीत अनुक्रमे इंडियन मॉटल्ड ईल व आफ्रिकन मॉटल्ड ईल असे म्हणतात.
वाम मासा सु. १.२ मी. लांब असून त्याचे वजन जास्तीत जास्त ७ किग्रॅ.पर्यंत असते. पृष्ठपरामध्ये मृदू पर अर २५०–३५० आणि गुदपरामध्ये २२०–२५० इतके असतात. पाठीच्या कण्यामध्ये १०६–११२ मणके असतात. याचे शरीर लांबुळके असून डोके त्रिकोणी व वरून चपटे असते. ओठ जाडसर व पूर्ण विकसित असतात. शेपूट चपटी असते. शरीरावरील खवले लहान, लंबगोल व त्वचेत घुसलेले असतात. पुच्छपर आणि स्पृशा दिसून येत नाहीत. त्वचेचा रंग पिवळट, हिरवट तपकिरी असून त्यावर गडद तपकिरी किंवा काळपट रंगाचे चट्टे असतात. लहान माशांची खालील बाजू फिकट रंगाची असून वरील बाजूवर गडद ठिपके अथवा चट्टे असतात. याच्या कल्याभोवती असलेल्या पिशवीसारख्या आवरणामुळे कल्याभोवती पाणी टिकून राहते. त्यामुळे हे मासे पाण्याबाहेर अनेक तास जिवंत राहू शकतात. याच कारणामुळे त्यांची वाहतूक जिवंत अवस्थेत करणे सोपे जाते. विविध क्षारतेच्या पाण्यात अधिवास व प्रजनन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. वाम मासा मांसाहारी असून तो छोटे संधीपाद प्राणी, अळ्या, मृदुकाय प्राणी, वलयांकित कृमी, कोळंबी, जलीय सूक्ष्म व इतर वनस्पती इत्यादींवर उपजिविका करतो.
वाम मासे डोंगरातील प्रवाह, नद्या, डबकी, तलाव येथे आढळून येतात. या माशाच्या वाढीच्या प्राथमिक तसेच प्रौढ अवस्था सामान्यपणे नदी, खडकातील साठलेले पाणी, गोडे पाणी, नदीच्या मुखाजवळील भाग तसेच समुद्र या ठिकाणी सापडतात. समुद्राभिगामी (Katadromous) जाती प्रौढ झाल्यावर १०–१५ वर्षे गोड्या पाण्यात राहतात. त्यानंतर त्या पुनरुत्पादन करण्यासाठी समुद्राकडे स्थलांतर करतात. समुद्रकिनाऱ्यापासून दूर अंडी घातल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. मादी एकावेळी सु. एक लाख इतकी अंडी घालते. पिले (larvae; leptocephalus) वाढीच्या अवस्थेत पारदर्शक दिसतात.
जिवंत वाम माशाची पिले तसेच प्रौढ माशांची खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हे मासे व्यावसायिक उदरनिर्वाहाचे एक महत्त्वाचे साधन आहे. याच्या शरीरावरील श्लेष्म (म्युकस) हे सांधेदुखीवरील औषध म्हणून वापरले जाते. यापासून मिळणाऱ्या अन्नघटकांमुळे याची किंमत अधिक असते. परिसंस्थेतील प्रतिकूल बदलामुळे या माशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने २०१९ मध्ये या माशाला धोक्याची जाती म्हणून घोषित केले आहे.
पहा : ईल; वाम, खाऱ्या पाण्यातील.
संदर्भ :
- https://eprints.cmfri.org.in/3299/1/Article_03.pdf
- https://www.fishbase.se/summary/1272
- https://www.nature.com/articles/s41598-020-72788-9
समीक्षक : नंदिनी देशमुख