मत्स्यवर्गातील डिप्नोई (Dipnoi) गणातील माशांना फुप्फुसमीन म्हणतात. या गोड्या पाण्यातील माशांना क्लोम (कल्ले) व फुप्फुसासारखे कार्य करणारा वाताशय  (हवेची पिशवी) असल्यामुळे ते पाण्यात व हवेतही श्वसन करू शकतात. त्यामुळे या माशांना फुप्फुसमीन असे म्हणतात. डिप्नोई हा शब्द न्यूम (Pneum) या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. न्यूम या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ ‘फुफ्फुस’ (Lung) असा होतो. या माशामध्ये वाताशयाचे फुफ्फुसमध्ये रूपांतर झालेले आहे.

फुप्फुसमीन

आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही ठिकाणी मिळून फुप्फुसमीन माशाच्या केवळ सहा प्रजाती अस्तित्वात राहिल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये निओसेरॅटोडस (Neoceratodus), आफ्रिकेमध्ये प्रोटॉप्टेरस (Protopterus) आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लेपिडोसायरन (Lepidosiren) या फुप्फुसमीन माशाच्या प्रजाती आढळतात. डेव्होनियन फुप्फुसमीन (Devonian lungfish) हा युरोप व उत्तर अमेरिकेतील फुफ्फुसमीन आता अस्तंगत झाला आहे. याचे शास्त्रीय नाव डिप्टेरस (Dipterus) असे आहे. यांपैकी एकही फुफ्फुसमीन भारतीय किनाऱ्यावर सापडत नाही. मत्स्य व उभयचर वर्गातील दुवा म्हणून फुफ्फुसमीन माशांचे उत्क्रांती व वर्गीकरण विज्ञानात महत्त्वाचे स्थान आहे.

सर्व फुप्फुसमीन माशांच्या शरीरात सलग कास्थिमय पृष्ठरज्जू असतो. तसेच या  माशांच्या जबड्यात टाळूवर दात आढळून येतात. यांचे शरीर निमुळते आणि लांबट असून त्यांना अंसपक्षाची (Pectoral fin) आणि श्रोणीपरांची (Pelvic fin) जोडी असते. पुच्छपक्ष (शेपटीचे पर) व पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) गुदपक्षाशी अखंड असतात. याच्या शरीराची वैशिष्ट्ये आदिम स्वरूपाची आहेत. सार्कोप्टेरीजी (Sarcopterygii) माशाप्रमाणे चांगला अंत:कंकाल असलेल्या यांच्या परांना पाली/खंड (Lobes) असतात. हा मासा असूनही त्यात फुप्फुसे दिसून येतात. काही प्रमाणात कल्ले देखील श्वसनासाठी वापरले जातात. त्यांची श्वसन संस्था विशेष अनुकुलित असते. मात्र श्वसनरंध्र नसतात. नाकपुड्या मुस्काटाच्या खालच्या बाजूस आढळतात.

प्राचीन फुप्फुसमीनामध्ये कर्परेच्या (Skull) हाडांवर कॉसमीन (Cosmin) या क्षारयुक्त पदार्थापासून बनलेल्या ऊतीचे आवरण होते. परंतु, आधुनिक फुप्फुसमीनामध्ये कॉसमीनचे आवरण नाहीसे झाले असून तेथे केवळ त्वचेचे आच्छादन दिसून येते.

डेव्होनियन फुप्फुसमीन (डिप्टेरस)

फुप्फुसमीन माशांची फुप्फुसे स्वरयंत्र आणि घश्याला जोडलेली असतात, परंतु त्यांना श्वसन नलिका नसते. प्रत्येक फुप्फुस असंख्य छोट्या हवेच्या पिशव्यांनी बनलेले असते. त्यामुळे मोठा श्वसन पृष्ठभाग मिळू शकतो. बहुतेक सर्व फुप्फुसमीनांना दोन फुप्फुसे असतात. मात्र, ऑस्ट्रेलियन प्रजातीला केवळ एकच फुप्फुस असते. शरीराच्या ग्रसनी आणि अन्ननलिकेच्या ऊर्ध्व (पृष्ठ) बाजूस ही फुप्फुसे आढळतात. ऑस्ट्रेलियन फुप्फुसमीन प्रजाती कल्ल्यांच्या साहाय्याने श्वसन करू शकते. मात्र फुप्फुसमीनाच्या इतर प्रजातीत कल्ले पूर्णत: ऱ्हास पावलेले असतात. त्यामुळे कल्ले श्वसनास निरुपयोगी असतात. फुप्फुसमीन पाण्याच्या पृष्ठभागावरील हवेचे श्वसन करू शकतात. त्यामुळे ते प्रदूषित पाण्यात देखील जगू शकतात.

फुप्फुसमीन सर्वाहारी असून ते मासे, कीटक, छोटे संधीपाद, किडे, मृदुकाय, उभयचर प्राणी आणि काही वनस्पतीदेखील खातात. त्यांना खरे उदर नसून त्याऐवजी आतड्यातील सर्पिल झडप असते. ज्यावेळी उन्हाळ्यात तळी आटतात त्यावेळी ते आपल्या शरीराभोवती चिखलाचे कवच तयार करतात. हवा जाण्यासाठी या कवचाला छिद्र असते. या कवचाला कोश म्हणतात. पुढचा पावसाळा येईपर्यंत ते त्यांत राहतात. ते कोशाला आतून आपल्या शरीरातील श्लेष्माचे (बुळबुळीत पदार्थाचे) अस्तर लावतात. यावेळी ते ऊर्जेसाठी शरीरात साठविलेल्या चरबीचा वापर करतात. या अवस्थेला ग्रीष्मनिष्क्रियता किंवा ऊष्मकालसुप्ती (Aestivation) म्हणतात. त्यांच्या शरीरक्रिया या काळात बदलल्या जातात. त्यांच्या चयापचयाचा वेग नेहमीच्या साधारण वेगाच्या साठ पटीने मंदावतो. इतरवेळी ते अमोनिया उत्सर्जित करत असतात, पण या काळात ते युरिया हा कमी विषारी पदार्थ उत्सर्जित करू लागतात. यांची आयुमर्यादा खूप मोठी असते. शिकागो येथील मत्स्यालयात एक फुप्फुसमीन १९३३ ते २०१७ पर्यंत जिवंत असल्याची नोंद आहे. प्रजननकाळात त्यांचे अंसपक्ष पिसासारख्या उपांगात बदलले जातात. यांच्या साहाय्याने आपल्या अंड्यांना ते हवा पुरवतात. यांच्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या वैशिष्ट्यपूर्ण असतात.

आफ्रिकेतील प्रोटॉप्टेरस  व दक्षिण अमेरिकेतील लेपिडोसायरन  या प्रजातींचा समावेश लेपिडोसायरनिडी (Lepidosirenidae) कुलात होतो. या वंशांतील फुप्फुसमीन दलदलीत व खाजणात राहतात. त्यामुळे ते वरचेवर हवेत श्वसन करतात. सध्या अस्तित्वात असलेल्या फुप्फुसमीन माशाच्या ऑस्ट्रेलियन फुप्फुसमीन, दक्षिण अमेरिकन फुप्फुसमीन, मार्बल फुप्फुसमीन, कल्लेवाला फुप्फुसमीन, पश्चिमी आफ्रिकन फुप्फुसमीन आणि ठिपकेवाला फुप्फुसमीन या सहा प्रजाती आहेत. त्यांची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे –

फुप्फुसमीन : विविध प्रकार

(१) ऑस्ट्रेलियन फुप्फुसमीन (Australian lungfish) : यास क्वीन्सलँड फुप्फुसमीन (Queensland lungfish) असे देखील म्हणतात. हा निओसेरॅटोडोंटिडी (Neoceratodontidae) या कुलातील एकमेव अस्तित्वात असलेला फुप्फुसमीन असून याचे शास्त्रीय नाव निओसेरॅटोडस  फॉर्स्टराय (Neoceratodus forsteri) असे आहे. हा मूळचा ऑस्ट्रेलियातील दक्षिण-पूर्व क्वीन्सलँड येथील मेरी आणि बर्नेट या नद्यांमधील आहे. या फुप्फुसमीन माशाला जिवंत जीवाश्म म्हटले जाते. ऑस्ट्रेलिया प्रदेशाशी प्रदेशनिष्ठ (Endemic) असणाऱ्या या प्रजातीत एक कोटी वर्षांपूर्वीची वैशिष्ट्ये दिसून येतात. साडेतीन कोटी वर्षांपूर्वीची अशा माशांची जीवाश्मे सापडली आहेत. हा निओसेरॅटोटडस अजूनही तशीच वैशिष्ट्ये दाखवतो. म्हणूनच त्याला सध्या अस्तित्वात असलेल्या पृष्ठवंशीय प्राण्यांपैकी सर्वांत प्राचीन प्रजाती म्हटले जाते. पृष्ठवंशीय प्राण्यांपैकी सर्वांत जास्त मोठा जीनोम (एकूण जनुकांची संख्या) विकसित फुप्फुसमीनांच्या शरीर पेशींत असतो.

ऑस्ट्रेलियन फुप्फुसमीन या माशाची पृष्ठ बाजू हिरवी ते काळपट तपकिरी असून खालील बाजू पिवळसर केशरी असते. याचे शरीर लांबट निमुळते, डोळे लहान, डोके चपटे व तोंड लहान असते. याची लांबी जास्तीत जास्त १५० सेंमी. व वजन सुमारे ४३ किग्रॅ. असते.

(२) दक्षिण अमेरिकन फुप्फुसमीन (South American Lungfish) : लेपिडोसायरनिडी या कुलातील व लेपिडोसायरन  या प्रजातीतील एकमेव अस्तित्वात असलेला फुप्फुसमीन असून याचे शास्त्रीय नाव लेपिडोसायरन पॅरॅडॉक्सा (Lepidosiren paradoxa) असे आहे. हा मासा खाजणामध्ये आणि संथ गतीने वाहणाऱ्या पाण्यामध्ये आढळतो. ॲमेझॉन आणि पाराना नदीच्या खोऱ्यात याचे वास्तव्य असते. हा हवेतील ऑक्सिजन श्वसनामार्फत घेत असतो. जेव्हा हा अपरिपक्व असतो तेव्हा त्याच्या काळसर अंगावर सोनेरी रंगाचे ठिपके असतात. जशी परिपक्वता येते तसे हे ठिपके नाहीसे होतात. इतर फुप्फुसमीनांप्रमाणेच दात धारण करणारी याच्या जबड्यातील हाडे एकत्र जोडली गेलेली असतात. यांचे शरीर निमुळते आणि वाम माशाप्रमाणे लांबट असते. याची लांबी सुमारे १२५ सेंमी. असून याचे अंसपर अतिशय नाजूक आणि दोरीप्रमाणे असतात, तर याचे श्रोणीपर थोडे मोठे आणि बरेच मागच्या बाजूस असतात. खांद्याच्या बाजूकडे याचे पर एकाच हाडाला जोडलेले असतात. कल्ले अविकसित व अक्षम असतात आणि प्रौढावस्थेत तर ते कार्य देखील करू शकत नाहीत.

(३) मार्बल फुप्फुसमीन (Marbled lungfish) : याचा समावेश लेपिडोसिरेनिडी (Lepidosirenidae) या कुलात होत असून यास सॅलॅमँडर फुप्फुसमीन (Leopard lungfish) असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव प्रोटॉप्टेरस इथियोपिकस (Protopterus aethiopicus) असे आहे. याचा आढळ पूर्व व मध्य आफ्रिकेमध्ये तसेच नाईल नदीमध्ये आहे. विशेषेकरून खाद्यान्न म्हणून ही जाती वापरली जात असल्याने व्हिक्टोरिया सरोवरातील म्वान्झा खाडीमध्ये मोठ्याप्रमाणावर याची मासेमारी केली जाते.

मार्बल फुप्फसमीनचे शरीर गुळगुळीत, गोलाकार आणि निमुळते असते. याचे खवले शरीरात अतिशय खोलवर रुतलेले असतात. याची शेपूट अतिशय लांब असून ती टोकाकडे निमुळती होत जाते. आफ्रिकन फुप्फुसमीनाच्या प्रजातींपैकी ही सर्वांत मोठी प्रजाती असून त्यांची लांबी २०० सेंमी. पर्यंत असते. अंसपक्ष आणि श्रोणीपर अतिशय लांब आणि पातळ असून एखाद्या शेवयीप्रमाणे दिसतात. अंड्यातून नुकतेच बाहेर पडलेले जीव हे उभयचर न्यूट (Newt) प्राण्याप्रमाणे दिसतात. या पिलांना शरीराच्या बाहेर कल्ले असतात. २-३ महिन्यांची झाल्यावर ही पिले स्थित्यंतर (Metamorphosis) करून प्रौढ होत असताना त्यांचे बाह्य कल्ले नाहीसे होतात व त्या ठिकाणी कल्ला विदरे तयार होतात. हे मासे पिवळसर राखाडी किंवा गुलाबी छटांचे असतात आणि त्यांच्यावर राखाडी रंगाचे मोठाले ठिपके आढळतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर जणूकाही संगमरवरी नक्षीकाम असावे असे भासते. यांची पृष्ठ बाजू राखाडी छटांची असते, तर अधर बाजू फिकट रंगाची असते. या माशाचा जीनोम सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेने सर्वांत मोठा म्हणजे १३३ अब्ज न्यूक्लिओटायडांनी बनलेल्या डीएनएचा असतो.

(४) कल्लेवाला फुप्फुसमीन (Gilled lungfish) : याचा समावेश लेपिडोसिरेनिडी या कुलात होत असून याचे शास्त्रीय नाव प्रोटॉप्टेरस अँफिबियस (Protopterus amphibius) असे आहे. पूर्व आफ्रिकेत सापडणारी ही फुप्फुसमीन प्रजाती सर्वांत लहान आकाराची म्हणजेच ४४ सेंमी. लांबीची असते. याचा रंग निळसर किंवा राखाडी छटांचा असून त्यावर अतिशय छोटे आणि जवळजवळ न दिसणारे असे काळे ठिपके असतात. मात्र यांच्या अधर बाजूला फिकट राखाडी छटा असते.

(५) पश्चिम आफ्रिकेतील फुप्फुसमीन (West African lungfish) : याचा समावेश लेपिडोसिरेनिडी या कुलात होत असून याचे शास्त्रीय नाव प्रोटॉप्टेरस अन्नेक्टेन्स (Protopterus annectens) असे आहे. यास आफ्रिकन फुप्फुसमीन असेही म्हणतात. पश्चिम व मध्य आफ्रिकेच्या प्रदेशात आढळणाऱ्या या प्रजातीमधील माशांचे शरीर वाम माशाच्या शरीराप्रमाणेच लांब असून त्यांना उठावदार मुष्क असते. डोक्याच्या लांबीपेक्षा शरीराची लांबी ९−१५ पट जास्त असते. यांना तंतूप्रमाणे दिसणाऱ्या परांच्या दोन जोड्या असतात. अंसपक्षाच्या मुळाशी किनार असते आणि हे पर डोक्यापेक्षा तीन पट लांब असतात. तर श्रोणीपर हे डोक्याच्या लांबीपेक्षा जवळजवळ दुप्पट असतात. बाह्य कल्ल्यांच्या तीन जोड्या असून परांच्या जवळ कल्ले विदरे दिसून येतात. यांचा पृष्ठबाजूचा रंग तपकिरी असून अधर बाजूचा रंग फिकट व त्यावर काळसर तपकिरी ठिपके असा असतो. नैसर्गिकरित्या राहत असणाऱ्या या माशांची लांबी १०० सेंमी.पर्यंत वाढू शकते.

(६) ठिपकेवाला फुप्फुसमीन (Spotted lungfish) : याचा समावेश लेपिडोसिरेनिडी या कुलात होत असून याचे शास्त्रीय नाव प्रोटॉप्टेरस डॉल्लॉय (Protopterus dolloi) असे आहे. ही प्रजाती मध्य आफ्रिकेच्या प्रदेशांत आढळते. यांची लांबी १३० सेंमी.पर्यंत वाढते. शरीराचा आकार ईल माशासारखा असून हे सर्वसामान्यपणे तपकिरी रंगाचे असतात. पिलांच्या शरीरावर मोठे काळे ठिपके असतात, परंतु प्रौढांमध्ये ते नाहीसे होतात. ज्यावेळी तापमान जास्त वाढते अशा वेळी हे मासे ग्रीष्मनिष्क्रियता अवस्थेत जातात.

पहा : ग्रीष्मनिष्क्रियता (पूर्वप्रकाशित नोंद), डिप्नोई (पूर्वप्रकाशित नोंद).

संदर्भ :

  • https://ucmp.berkeley.edu/vertebrates/sarco/dipnoi.html
  • https://en.wikipedia.org/wiki/Lungfish
  • https://www.britannica.com/animal/lungfish

  समीक्षक : नंदिनी देशमुख