या माशाचा समावेश सायप्रिनोडोन्टीफॉर्मिस (Cyprinodontiformes) गणातील पॉइसिलीडी (Poeciliidae) कुलात होतो. त्याच्या शेपटीला असलेल्या तलवारीसारख्या विस्तारामुळे ह्याला असिपुच्छ मासा असे म्हटले जाते. हा मासा गोड्या पाण्यात आढळतो.

निसर्गत: आढळणारा असिपुच्छ मासा

असिपुच्छ माशाचे शास्त्रीय नाव झायफोफोरस हेलेरी (Xiphophorus hellerii) असे आहे. Xiphophorus हा ग्रीक शब्द असून Xiphos म्हणजे कट्यार किंवा तलवार व phorus म्हणजे धारण करणारा. कार्ल हेलर (Karl Bartholomaeus Heller) या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी या माशाचा शोध लावला, त्यामुळे त्यांच्या नावावरून hellerii हे नाव आले आहे. असिपुच्छ मासा हा मूळचा उत्तर आणि मध्य अमेरिकेच्या वेराक्रूझ, मेक्सिकोपासून वायव्य होंडुरासपर्यंतच्या भागातील आहे.

निसर्गत: आढळणाऱ्या या माशाचा रंग हिरवा किंवा हिरवट पिवळसर असून त्यावर दोन्ही बाजूला लाल किंवा तपकिरी रंगाचे पट्टे असतात. बंदिस्त प्रजननातून विविध रंगांचे असिपुच्छ मासे निर्माण केले जातात. नर माशाची जास्तीत जास्त लांबी १४ सेंमी., तर मादीची जास्तीत जास्त लांबी १६ सेंमी. असते. नरामध्ये शेपटीचा (गुदपक्षाचा; Anal fin) विस्तार होऊन त्याचा उपयोग जननांगाप्रमाणे (Gonopodium) केला जातो. याच्या साहाय्याने नर समागमाच्यावेळी मादीमध्ये शुक्राणू सोडतो. हे जननांग दिसायला तलवारीसारखे असून याच्या दोन्ही कडा गडद काळ्या रंगाच्या असतात. मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते. प्रजनन काळात मादीच्या पोटावर (गुदपक्षाच्या जवळ) काळा ठिपका दिसतो. हा मासा सुमारे तीन महिन्यांत पूर्ण जननक्षम होतो.

असिपुच्छ मासा : नर व मादी.
विविध रंगांतील असिपुच्छ मासे

असिपुच्छ मासा गोड्या पाण्यात राहणारा, आकाराने लहान तसेच आकर्षक रंगाचा असल्याने विशेषत: घरच्या मत्स्यालयासाठी याची निवड केली जाते. ही शांत प्रजाती असली तरी नर मासे एकमेकांप्रती आक्रमक होऊ शकतात. म्हणून घरातील जलजीवालयात प्रजनन करण्यासाठी नर-मादीचे १:४ असे गुणोत्तर निश्चित केले आहे. म्हणजेच एका नराबरोबर तीन ते चार माद्या सोडल्या जातात. मादी एकावेळी सुमारे १०० ते १५० पिले (Fry) सोडते. मादी स्वत:च्या शरीरातील पिशवीत शुक्राणू साठवून ठेवते. साठवलेले शुक्राणू पुन्हा पुन्हा फलनासाठी वापरता येतात. म्हणजे प्रत्येक वेळेस तिला पिले सोडण्यासाठी नराची गरज भासत नाही. साधारणत: दर तीन-चार आठवडयांनी मादी पिले देऊ शकते. घरी जलजीवालयामध्ये पाळल्या जाण्याऱ्या इतर माशांबरोबर याचे सहज प्रजनन करता येते.

असिपुच्छ मासा भरपूर वाहते पाणी असणाऱ्या नद्या, ओढे अशा प्रवाहात निसर्गत: आढळतो. वाढीसाठी त्याला पाणवनस्पतींची आवश्यकता असते. हा मिश्राहारी असून झाडाची पाने तसेच छोटे किडे, गांडूळाच्या जातीतील प्राणी इत्यादी त्याचे खाद्य आहे. घरातील जलजीवालयातील माशांना पुरेसे खाणे वेळच्या वेळी देण्याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर ते आपल्याच पिलांना खाऊ शकतात. पुरेशा मोठ्या आकाराच्या टाकीत आवश्यक त्या पाणवनस्पती ठेवल्यास ते मुक्तपणे संचार करू शकतात व त्यांचे जननही होऊ शकते. तसेच पिलांना लपण्यासाठी (सुरक्षित राहण्यासाठी) पाणवनस्पतींचा उपयोग होतो.

योग्य काठीण्यपातळी (Hardness), तापमान व अल्कता असलेल्या पाण्यात असिपुच्छ मासे व्यवस्थित राहतात. त्यांचा आयु:काल सुमारे ५ वर्षांचा असतो.

संदर्भ :

  • https://www.fishkeepingworld.com/swordtail-fish/
  • https://en.wikipedia.org/wiki/Green_swordtail

समीक्षक : नीलिमा कुलकर्णी