स्वदेशी शिक्षणपद्धतीची तुलना इतर देशांतील शिक्षणपद्धतीशी अभ्यासपूर्ण करून आपल्या शिक्षणपद्धतीत असलेल्या उणीवा दूर करणे आणि विदेशी शिक्षणपद्धतीतील महत्त्वपूर्ण घटक अंगीकारणे म्हणजे तुलनात्मक शिक्षण होय. मानव हा निसर्गातील गोष्टींमध्ये तुलना करत असतो. लहान मुले आई, वडील या दोहोंमध्ये तुलना करतात; तर आई, वडील त्यांच्या मुलांची तुलना करतात. विद्यार्थी, शिक्षकांमध्ये तुलना करतात; तर शिक्षक विद्यार्थांमध्ये तुलना करतात. त्याच प्रमाणे देशातील शिक्षणपद्धतीची विदेशांतील शिक्षणपद्धतीशी तुलना केली जाते. म्हणजेच दोन किंवा त्यापेक्षा अधिक वस्तू, घटना, व्यक्ती इत्यादींमध्ये तुलना केली जाऊन उपयोगी माहिती आत्मसात केली जाते, त्यास तुलनात्मक शिक्षण असे म्हणतात.
जगातील विविध देशांच्या शैक्षणिक कृतींचा इतिहास आणि त्याच्या अभ्यासातून तुलनात्मक शिक्षण अस्तित्वात येते. तुलनात्मक शिक्षणामध्ये शिक्षणाचा अभ्यास इतर देशांच्या संबंधात केला जातो. देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यपद्धतीमध्ये अमुलाग्र बदल केले जातात. त्यामुळे शैक्षणिक बदल घडून देशाचा विकास होण्यास मदत होते.
व्याख्या : गुड यांच्या मते, ‘तुलनात्मक शिक्षण हे वेगवेगळ्या देशांमधील सद्यस्थितीतील शैक्षणिक सिद्धांताच्या व प्रात्यक्षिकांच्या अभ्यासाशी निगडित असे क्षेत्र असून विस्तृतपणे व सखोलपणे शैक्षणिक समस्या समजावून घेणे हा त्याचा हेतू आहे. ज्या स्वतःच्या देशाच्या सीमांच्या पलीकडच्या असतात’.
कॅनडेल यांच्या मते, ‘तुलनात्मक शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या विविध तत्त्वज्ञांनाची तुलना फक्त सिद्धांताच्या आधारे नव्हे, तर सर्वार्थाने श्रेष्ठ प्रात्यक्षिकांच्या आधारे केली जाते’.
मॅलीनसन यांच्या मते, ‘तुलनात्मक शिक्षण हा असा विषय आहे, ज्यात इतर संस्कृतीचे व त्या संस्कृतीमधून घेतलेल्या इतर शिक्षण पद्धतींचे पद्धतशीरपणे परीक्षण केले जाते. साम्य व फरक यांचा शोध लावणे, तसेच ज्या नेहमीच्याच समस्या सर्वांच्याच बाबतीत सारख्या असतात, त्यांवर भिन्न उपाय का अवलंबिले, याचाही शोध लावणे हा यात हेतू असतो’.
ॲडेजम्बाई यांच्या मते, ‘तुलनात्मक शिक्षण एक अशी संकल्पना आहे, ज्यात विशिष्ट समाजातील किंवा संस्कृतीतील किंवा विविध समाजामधील आणि विविध संस्कृतीमधील शिक्षणातील साम्ये व फरक यांचा चिकित्सक अभ्यास केला जातो’.
ऑसोकोया यांच्या मते, ‘तुलनात्मक शिक्षण हे समाज, राज्य, प्रांत आणि राष्ट्र या अंतर्गतच्या शैक्षणिक सिद्धांत व प्रात्यक्षिकमधील तुलना असू शकते. ज्यामध्ये तज्ज्ञ शैक्षणिक कार्यक्रम सिद्धांत, प्रात्यक्षिकांच्या तुलना करण्यात व्यस्त असतात. हे अगदी एकाच समाजाच्या अंतर्गत असू शकते’.
अलावीएटल यांच्या मते, ‘तुलनात्मक शिक्षण हे राष्ट्रीय, आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतींमध्ये तुलना व विरोधाभास करण्याचा मार्ग आहे’.
उद्देश : तुलनात्मक शिक्षणाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत ꞉
- विविध शिक्षण व्यवस्थांचा अभ्यास : वेगवेगळ्या देशांतील शिक्षणव्यवस्थांचे तुलनात्मक विश्लेषण करून त्यांच्या सामर्थ्य आणि मर्यादा ओळखणे.
- सुधारणा आणि नावीन्यता : इतर देशांमध्ये यशस्वी ठरलेल्या शिक्षणपद्धतींचा अभ्यास करून आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये सुधारणा करणे.
- आंतरराष्ट्रीय सामंजस्य : विविध संस्कृतींमधील शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांबद्दल सामंजस्य वाढविणे.
- वैज्ञानिक दृष्टिकोण : शिक्षणाच्या तत्त्वांचा आणि पद्धतींचा वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी तुलनात्मक दृष्टिकोण वापरणे.
- शैक्षणिक धोरणे आणि निर्णय : तुलनात्मक शिक्षणाचा अभ्यास करून शिक्षण धोरणकर्त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी साहाय्य करणे.
फायदे : जे शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा, नावीन्यता आणि जागतिक दृष्टिकोण विकसित करण्यात मदत करतात, अशा तुलनात्मक शिक्षणाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत ꞉
- उत्तम शैक्षणिक पद्धतींचा अवलंब : तुलनात्मक शिक्षणाद्वारे विविध देशांमध्ये यशस्वी ठरलेल्या पद्धतींचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सर्वोत्तम शिक्षणपद्धती आपल्या देशात लागू करण्याची संधी मिळते.
- शैक्षणिक धोरणे सुधारण्यास मदत : तुलनात्मक अभ्यासामुळे शिक्षण धोरणकर्त्यांना विविध देशांच्या धोरणांचा आढावा घेता येतो आणि आपल्या परिस्थितीनुसार त्यात सुधारणा करता येते.
- नवीन विचारसरणी आणि नावीन्यता : विविध संस्कृती, समाज आणि शिक्षणव्यवस्थांचा अभ्यास केल्याने शैक्षणिक क्षेत्रात नवा दृष्टिकोण आणि नाविन्यपूर्ण कल्पना येऊन शिक्षण अधिक प्रभावी होते.
- वैश्विक समज आणि सहिष्णुता वाढविते : तुलनात्मक शिक्षणामुळे विविध संस्कृतींमधील शिक्षणपद्धतींचे अंतरंग समजून घेता येते. यामुळे आंतरराष्ट्रीय सहिष्णुता आणि समन्वय वाढतो.
- शैक्षणिक समस्यांवर उपाय शोधणे : विविध देशांमध्ये ज्या समस्यांचा सामना केला जातो, त्यांचे उपाय शोधण्यासाठी तुलनात्मक दृष्टिकोण उपयुक्त ठरतो. हे उपाय आपल्या शिक्षणव्यवस्थेत लागू करता येतात.
- सुधारणा आणि शैक्षणिक विकासाला चालना : तुलनात्मक शिक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या शिक्षणव्यवस्थेत आवश्यक बदल करता येऊन शिक्षणाचा दर्जा वाढतो.
- शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास : विविध देशांतील शिक्षणाची गुणवत्ता मोजण्यासाठी तुलनात्मक शिक्षण मदत करते. त्यामुळे आपल्या शिक्षणव्यवस्थेत गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करता येते.
- वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोण : तुलनात्मक शिक्षणामध्ये वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध पद्धतीचा वापर होऊन शिक्षणाच्या परिणामांचे अचूक विश्लेषण करता येते.
- शैक्षणिक जागतिकीकरणाला चालना : आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाच्या आदान-प्रदानाला प्रोत्साहन मिळून विविध देशांतील शैक्षणिक समृद्धी होते.
- संवेदनशीलता आणि आदर वाढविते : विविध देशांमधील शिक्षणाच्या पद्धती आणि संस्कृतींच्या तुलनेतून एकमेकांविषयीची समज आणि आदर वाढून शांततेला चालना मिळते. तुलनात्मक शिक्षणामुळे आपण शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांचा आढावा घेता येतो आणि त्यानुसार आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले पर्याय उपलब्ध करून देता येतो.
वैशिष्ट्ये ꞉ तुलनात्मक शिक्षणाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत ꞉
- आंतरराष्ट्रीय आणि आंतरसंस्कृतीय दृष्टिकोण : तुलनात्मक शिक्षण विविध देशांच्या शिक्षणव्यवस्थांचा, संस्कृतींचा आणि सामाजिक संरचनांचा अभ्यास करतो. त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेचे विस्तृत आणि बहुआयामी दृष्टिकोण मिळतात.
- वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध पद्धत : तुलनात्मक शिक्षणात अभ्यास करताना वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे हे सर्व तर्कशुद्ध पद्धतींवर आधारित असते.
- समानता आणि भिन्नता यांचा अभ्यास : विविध देशांतील शिक्षणव्यवस्थांमधील समानता आणि भिन्नता ओळखून त्या घटकांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. यामुळे विविध व्यवस्थांचे सामर्थ्य आणि कमजोरी स्पष्ट होतात.
- शैक्षणिक समस्यांचे समाधान शोधणे : शिक्षण क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांचे वैश्विक स्तरावर समाधान शोधण्यासाठी तुलनात्मक शिक्षण उपयुक्त ठरते. एका देशात यशस्वी ठरलेल्या उपायांचा उपयोग इतर देशांमध्येही करता येतो.
- ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यास : प्रत्येक देशाच्या शिक्षणव्यवस्थेवर त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा प्रभाव असतो. तुलनात्मक शिक्षण याचा सखोल अभ्यास करून विविध शिक्षण पद्धतींच्या विकासाला समजून घेण्यास मदत करते.
- शैक्षणिक धोरणे आणि प्रशासनाचा अभ्यास : तुलनात्मक शिक्षणात विविध देशांतील शैक्षणिक धोरणे, त्यांची अंमलबजावणी आणि शैक्षणिक प्रशासन कसे कार्य करते, याचा सखोल अभ्यास केला जातो.
- शिक्षणाची जागतिकीकरण आणि आधुनिकता यांतील भूमिका : आधुनिक काळातील जागतिकीकरणामुळे शिक्षणव्यवस्थेत होणारे बदल आणि त्यांचे विविध देशांवर होणारे परिणाम यांचा अभ्यास तुलनात्मक शिक्षणात केला जातो.
- बहुविध दृष्टिकोण : तुलनात्मक शिक्षणामध्ये समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि मानवशास्त्र यांसारख्या विविध शास्त्रांचा समावेश असतो. यामुळे शिक्षणव्यवस्थेचा सर्वसमावेशक अभ्यास होतो.
- विकसनशील आणि विकसित देशांमधील अंतराचा अभ्यास : तुलनात्मक शिक्षणात विकसनशील आणि विकसित देशांतील शिक्षण व्यवस्थांमधील फरक ओळखून त्यातून सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन मिळते.
- शैक्षणिक नवकल्पना आणि सुधारणेची प्रेरणा : तुलनात्मक अभ्यासातून विविध देशांतील नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतींची ओळख होते. त्यातून आपल्या देशामध्ये सुधारणा आणि नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जाते.
तुलनात्मक शिक्षणाच्या या वैशिष्ट्यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात नव्या संकल्पना आणि धोरणे विकसित करून शिक्षणाची गुणवत्ता आणि समावेशकता वाढविता येते.
महत्त्व : तुलनात्मक शिक्षणाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहेत ꞉
- शैक्षणिक धोरणांची सुधारणा : तुलनात्मक शिक्षण विविध देशांतील शैक्षणिक धोरणांचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करते. यामुळे आपली शिक्षणव्यवस्था अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकते.
- वैश्विक दृष्टिकोण : तुलनात्मक शिक्षणाच्या माध्यमातून विविध देशांतील शिक्षण पद्धती, संस्कृती आणि समाजाच्या विविध अंगांचा अभ्यास करता येतो. यामुळे शैक्षणिक व्यवस्थेचा आंतरराष्ट्रीय आणि सर्वसमावेशक दृष्टिकोण विकसित होतो.
- सर्वोत्तम शैक्षणिक पद्धतींचा अवलंब : तुलनात्मक शिक्षण यशस्वी ठरलेल्या शैक्षणिक पद्धती आणि धोरणांचा अभ्यास करून त्यांचा आपल्यासाठी योग्य असलेल्या पद्धतीने अवलंब करण्यास मदत करते. हे ज्ञान आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा करण्यास उपयुक्त ठरते.
- शैक्षणिक समस्यांचे समाधान : शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांचे प्रभावी समाधान शोधता येते. हे उपाय जागतिक स्तरावर लागू करून शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा करता येते.
- नवीन संकल्पना आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोण : तुलनात्मक शिक्षणामुळे विविध देशांमधील नाविन्यपूर्ण कल्पना आणि शैक्षणिक पद्धतींची माहिती मिळते; ज्यामुळे शिक्षणात नवीन विचारधारांचा समावेश करता येतो.
- सांस्कृतिक आणि सामाजिक समज : विविध संस्कृती आणि समाजातील शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करून त्या समाजांमधील सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांचा सखोल अभ्यास करता येतो. यामुळे जागतिक समज वाढून सहिष्णुता आणि सुसंवादाला चालना मिळते.
- शैक्षणिक संशोधनाला प्रोत्साहन : तुलनात्मक शिक्षणामुळे शैक्षणिक संशोधनाला एक नवीन दृष्टिकोण मिळतो. विविध देशांतील शिक्षण व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास करून संशोधकांना नवीन संकल्पना आणि पद्धती विकसित करण्याची प्रेरणा मिळते.
- शैक्षणिक गुणवत्ता आणि परिणामकारकता : तुलनात्मक शिक्षणाच्या माध्यमातून विविध देशांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि परिणामांचा अभ्यास केला जातो. यामुळे आपल्याला शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यासाठी योग्य त्या सुधारणा करता येतात.
- विकसनशील देशांमध्ये सुधारणा : तुलनात्मक शिक्षण विकसनशील देशांमधील शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी उपयुक्त आहे. विकसित देशांच्या शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून त्या लागू करण्यासाठी दिशा मिळते.
- जागतिक शांतता आणि सहकार्याला चालना : तुलनात्मक शिक्षणामुळे विविध देशांतील शिक्षणव्यवस्थांमध्ये समन्वय साधता येतो; ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य आणि शांततेला चालना मिळते.
तुलनात्मक शिक्षणामुळे शैक्षणिक क्षेत्रात व्यापक आणि दीर्घकालीन सुधारणा करता येतात. हे शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासोबतच जागतिक स्तरावर समन्वय साधण्यासाठी तुलनात्मक शिक्षण हे एक महत्त्वाचे साधन आहे.
संदर्भ :
- कड, य.; कोलते, मा.; घोडके, सं.; धोंडे, ज., तुलनात्मक शिक्षण, पुणे, 2024.
- Sodhi, T. S., Textbook of COMPARATIVE EDUCATION, Vikas Publishing, 2024.
- समीक्षक ꞉ ह. ना. जगताप