आ. १. वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांमधील केंद्रकाचे स्थान

केंद्रकी पेशीतील सर्वांत मोठे अंगक. पेशींमधील सर्व जैविक प्रक्रियांचे नियंत्रण केंद्रकात होते. रॉबर्ट ब्राउन यांनी १८३१ मध्ये याचा शोध लावला. ऑर्किड वनस्पतीच्या पेशींचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करताना त्यांना पेशी केंद्रक दिसले, त्याला त्यांनी Nucleus म्हणजे केंद्रक असे नाव दिले.

बहुतेक पेशी एककेंद्रकी असतात. केंद्रकाचे पेशीतील स्थान बहुधा पेशीच्या मध्यभागी असते. वनस्पती पेशीत असलेल्या मोठ्या रिक्तीकांमुळे (Tonoplast) केंद्रक एका बाजूला सरकलेले असते. मेद पेशींमधे (Adipocytes) साठवलेल्या मेद कणांमुळे (Fat globule) केंद्रक एका बाजूला ढकलले गेलेले असते. स्त्रावी पेशींमधील केंद्रक आधारपटलाच्या जवळ तळाशी असते. शुक्रपेशीतील केंद्रक अग्रकायाच्या (Acrosome) जवळ असते. (पहा आ. १ व २).

आ. २. विविध पेशींतील केंद्रकाचे स्थान

बहुधा पेशीकेंद्रक गोल आकाराचे असते. परंतु,  अंडाकृती, चकतीसारखे, सर्पिलाकार, नालाकृती, बहुरूपीय वगैरे आकाराची केंद्रके आढळली आहेत. (पहा आ. ३). पेशीचा आकार, पेशीप्रक्रियांची स्थिती, पेशीमधील डीएनए, प्रथिने यांवर केंद्रक आकाराने लहान किंवा मोठे आहे ते ठरते. केंद्रकाचा आकार हर्टविग सूत्र (Hertwig’s formula) वापरून मोजता येतो. या सूत्रावरून केंद्रकाचे आकारमान (घनफळ) व पेशीचे आकारमान (घनफळ) यांचे गुणोत्तर काढण्यात येते. केंद्रकाचे आकारमान विभाजनपूर्व स्थितीत नेहमीपेक्षा वाढले, तर पेशीमध्ये कर्करोगाची लक्षणे असल्याचे विकृती वैज्ञानिक निदान करतात.

हर्टविग सूत्र

केंद्रकाची रचना समजून घेण्यासाठी पेशी विभाजनपूर्व अवस्थेत (Interphase) असावी लागते. विभाजनपूर्व अवस्थेतील केंद्रकाचा आकार १–१५ मायक्रोमीटर इतका असतो. केंद्रकाची त्रिज्या सर्वसाधारणपणे ५–८ मायक्रोमीटर असते. केंद्रकाचे वजन पेशीच्या वजनाच्या सुमारे १०% इतके असते. केंद्रक आवरण (Nuclear envelope), केंद्रकद्रव (Nucleoplasm/Nuclear sap), केंद्रकी (Nucleolus) आणि क्रोमॅटिनचे जाळे (Chromatin network) हे केंद्रकाच्या रचनेतील महत्त्वाचे घटक आहेत. (पहा आ. ४).

आ. ३. विविध आकारातील केंद्रक

केंद्रक आवरण हे केंद्रकद्रव व पेशीद्रव यांना परस्परापासून वेगळे ठेवते. केंद्रक आवरण दुहेरी केंद्रक पटलांनी (Nuclear membrane) बनलेले असते. काही ठिकाणी अंतर्द्रव्यजालिका पटलांबरोबर जुळलेली असते. दोन केंद्रक पटलांमधील अंतर सुमारे १०–७० नॅमी. असते (Perinuclear space). केंद्रक पटल आणि अंतर्द्रव्यजालिकेतील द्रव पेशीद्रवासारखाच असतो. केंद्रक पटलाचा केंद्रकद्रवाकडील पृष्ठभाग तंतुमय असून त्याला तंतुमय पटल (Fibrous lamina) म्हणतात.

आ. ४. केंद्रक : रचना

केंद्रक आवरण सच्छिद्र (Nuclear pores) असते. यातून संदेशवाहक आरएनए (एमआरएनए) आणि रायबोसोमचे घटक केंद्रकातून बाहेरील पेशीद्रवात येतात. या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी छिद्राभोवती सु. ३० प्रथिने कंकणाकृती आकारात (Annuli) एकत्र आलेली असतात. ही प्रथिने झडपेप्रमाणे कार्य करतात. छिद्रावरील मध्यवर्ती कणिका (Central granule) आवश्यकतेनुसार छिद्र बंद करते. प्रथिनांची कंकणाकृती रचना आणि मध्यवर्ती कणिका यांच्या एकत्रित रचनेला केंद्रक छिद्र संकुल (Nuclear pore complex) म्हणतात. एका केंद्रक आवरणामध्ये सु. १,०००  छिद्र संकुले असू शकतात. (पहा आ. ५).

आ. ५. केंद्रक छिद्र संकुल

केंद्रक आवरणाच्या आतील जागेत केंद्रकद्रव असून तो पारदर्शी असतो. न्यूक्लिइक अम्ल, विकर, प्रथिने आणि मूलद्रव्य यांमुळे केंद्रकद्रव अंशत: अम्लधर्मी असतो. केंद्रकद्रवामध्ये क्रोमॅटिन आणि केंद्रकी तरंगत असतात. क्रोमॅटिन धागे हिस्टोन प्रथिन घटकांभोवती गुंडाळला जातो तेव्हा या रचनेला गुणसूत्र असे म्हणतात. रायबोसोमच्या लहान व मोठ्या उपघटकांची निर्मिती केंद्रकीमधे होते. प्रथिननिर्मितीमध्ये सक्रिय पेशींमधे केंद्रकींची संख्या जास्त असू शकते. केंद्रकी हा पेशी केंद्रकातील सर्वात मोठा भाग आहे. केंद्रकीभोवती स्वतंत्र पटल नसते. केंद्रकीमध्ये रायबोसोम निर्मिती होते. प्रथिननिर्मिती करणे, अनुवंशिक घटकांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण, पेशीय प्रक्रियांचे नियंत्रण व समन्वय आणि रायबोसोमच्या उपघटकांची निर्मिती ही केंद्रकाची महत्त्वाची कार्ये आहेत.

पहा : पेशीअंगके.

संदर्भ :

  • http://www.biologydiscussion.com/nucleus/nucleus-
  • http://www.biologydiscussion.com/nucleus/3-main-constituents-of-nucleus-cell-biology/38528
  • https://www.nature.com

समीक्षक : नीलिमा कुलकर्णी