काही सजीव फक्त एका पेशीने बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. जीवाणू हे एकपेशीय सजीव आहेत. एकपेशीय सजीवांचे पेशी केंद्रकावरून आभासी/असीम केंद्रकी व दृश्य केंद्रकी पेशी असे दोन प्रकार केले आहेत. सजीवांचा प्रारंभ आभासी केंद्रकी पेशीपासून झाला असावा असे मानतात. या नोंदीतील जीवाणूचे वर्णन एकपेशीय असीम केंद्रकी जीवाणूवरून घेतलेले आहे. प्रत्यक्षात जीवाणूमध्येही विविधता आहे.

जीवाणू : विविध आकार.

सर्वांत लहान पेशी म्हणजे ‘मायकोप्लाझ्मा’ (Mycoplasma) असून या गोलाकार जीवाणू पेशींचा व्यास ०.२ मायक्रॉन (µ) पेक्षाही लहान असतो (१ µ= एका मिमी.चा हजारावा भाग). या सर्वांत छोट्या पेशीचे वस्तुमान एका ग्रॅमचा १०-१४ भाग इतके असते.

जीवाणूचे बाह्य स्वरूप व पेशीपटलाची रचना यांवरून जीवाणूचे वर्गीकरण करण्यात येते. प्रारंभीच्या काळात सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या जीवाणूंच्या बाह्य आकारावरून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आणि त्यांना गोलाणू (Coccus), दंडाणू (Bacillus), मळसूत्राकार (Sprillum) आणि तंतुमय (Filaments) अशी नावे देण्यात आली. जीवाणू घन पोषण माध्यमावर पेट्रीबशीमध्ये (Petri dish) वाढवल्यास त्यांच्या वसाहती तयार होतात.

सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे जीवाणू

सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या त्यांच्या परीक्षणावरून तो जीवाणूचा प्रकार असल्याचे ठरविता येते. जीवाणूंचे मुख्य लक्षण त्यांचा सूक्ष्म आकार आहे. एश्चेरिकिया कोलाय (ई कोलाय; Escherichia coli) सरासरी आकाराचा आहे असे समजण्याचा प्रघात आहे. त्याची लांबी २ मायक्रॉन, रुंदी ०.५ मायक्रॉन, घनफळ ०.६-०.७ घन मायक्रॉन, तर पाण्यासहित वजन १ ×१०-१२ ग्रॅम (पायकोग्रॅम) असते.

जीवाणू पेशीच्या मध्यभागी आभासी केंद्रक (DNA) असते. जीवाणू पेशीमध्ये केंद्रक नसून केंद्रकासारखा भाग असतो, त्यामुळे अशा केंद्रकास आभासी केंद्रक किंवा केंद्रकाभ असे म्हणतात. केंद्रकाभाभोवती पटल नसते. डीएनएचा रेणू पेशीद्रवामध्ये (Cytoplasm) अनियमित वेटोळ्याच्या स्वरूपात असतो. सूक्ष्मदर्शकाखाली केंद्रक न दिसता केंद्रकाची जागा दिसते, त्यामुळे अशा पेशींना आभासी केंद्रकी म्हणतात.

पेशीद्रवाभोवती पेशीपटल (Plasma membrane) असते. यामुळे पेशीला आकार प्राप्त होतो. पेशीपटलाचा काही भाग पेशीद्रवात इंग्रजी ‘यू’ च्या आकारासारखा डोकावलेला असतो, त्यास मध्यकाय (Mesosome) असे म्हणतात. मायकोप्लाझ्मा जीवाणू गटाखेरीज इतर सर्व जीवाणूंमध्ये पेशीपटल पेशीभित्तिकेने वेढलेले असते. पेशीभित्तिकेबाहेर संपुटिका (Capsule) असते. पेशीपटलाबाहेर डोकावणाऱ्या झलरिका (Pili/Pilus) दिसून येतात.

जीवाणू पेशी रचना

पेशीभित्तिकेच्या रासायनिक घटकांवरूनही जीवाणूंचे वर्गीकरण केले जाते.जीवाणू पेशीभित्तिका कर्बोदक व प्रथिन यांच्या संयुक्त पेप्टिडोग्लायकॅन (जैवरेणू; Peptidoglycan/murein) यापासून बनलेली असते. क्रिस्टल व्हायोलेट या अभिरंजकाबरोबर (Crystal violet Stain) पेशीभित्तिकेचा रंग जांभळा झाल्यास त्या जिवाणूला ग्रॅम-धन (Gram positive) म्हणतात. या जीवाणूंतील झलरिका बहुवारिक प्रथिनांनी बनलेल्या (Polymer) असतात. काही जीवाणूंची भित्तिका दुहेरी असते. पेशीभित्तिकेवर कर्बोदके, प्रथिने आणि मेदाम्लांचे बाह्य आवरण असते; त्यामुळे क्रिस्टल व्हायोलेट अभिरंजकाची क्रिया बाह्य भित्तिकेवर होत नाही. अशा जीवाणूंना ग्रॅम-ऋण (Gram negative) म्हणतात. ही पद्धती हान्स क्रिस्त्यान योआकिम ग्रॅम (Hans Christian Joachim Gram) यांनी १८८४ मध्ये शोधून काढली.

जीवाणू पटलापासून १-२ किंवा अनेक कशाभिका (Flagella) निघालेल्या असतात. कशाभिकांच्या हालचालींनुसार जीवाणूंची हालचाल होते. तसेच हालचालींसाठी कशाभिकापेक्षा लहान झलरिका असतात. कशाभिकेच्या तळाशी असलेल्या पेशीपटलापासून निघालेल्या बुळबुळीत पदार्थामुळे ते पृष्ठभागावरून सरकतात.

पेशिद्रवात रायबोसोम (Ribosome) नावाचे पेशीअंगक असते. रायबोसोम प्रथिन निर्मितीच्या प्रक्रियेत सहाय्यक ठरते. पेशीद्रवात नियमित वेटोळ्याच्या स्वरूपात प्लाझ्मिड (Plasmid) हे पेशीअंग दुय्यम स्वरूपाच्या डीएनएची भूमिका बजावते. प्रतिजैविकांना विरोध करण्याची क्षमता असलेली आणि इतर अनेक गुणधर्म दर्शवणारी जनुके प्लाझ्मिडवरतीच  असतात.

ग्रॅम-धन व ग्रॅम-ऋण जीवाणू

बहुतेक सर्व जीवाणूंतील प्रजनन अलैंगिक पद्धतीने घडून येते, यास विभाजन म्हणतात. काही जीवाणूंमध्ये विभाजन वेगाने घडून येते, तर काही जीवाणूंमध्ये त्यांची संख्या दुप्पट व्हायला १० तास लागतात. विभाजनातून तयार झालेल्या जीवाणूंच्या दोन्ही पेशींतील डीएनएचा रेणू मूळच्या जीवाणूसारखा असतो. विभाजन म्हणजे एका पेशीच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ पेशी तयार होतात. अशामुळे जीवाणूंची संख्या कमी वेळात झपाट्याने वाढते. काही जीवाणूंमध्ये संयुग्मन (Conjugation) प्रक्रियेने लैंगिक प्रजनन घडून येते. या प्रक्रियेत जीवाणूच्या दोन पेशींमध्ये डीएनए रेणूंची देवाणघेवाण होते.

ऑक्सिश्वसन करणारे जीवाणू ऑक्सिजनयुक्त स्थितीमध्ये राहतात. त्यांच्या वाढीसाठी आणि अस्तित्वासाठी ऑक्सिजनची गरज असते. काही जीवाणू विनॉक्सीश्वसनी असतात. ते बाह्य ऑक्सिजनशिवाय जगू शकतात; उदा., खोल समुद्रात सापडणारे जीवाणू, अन्ननलिकेतील जीवाणू तसेच अन्न दूषित करणारे जीवाणू इत्यादी. याशिवाय त्यांचा आणखी एक वर्ग आहे. या वर्गातील जीवाणू ऑक्सिजनयुक्त वातावरणात राहतात. मात्र ऑक्सिजनशिवाय त्यांची वाढ होत राहते. सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये जीवाणूंचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे.

पहा : ऑक्सिश्वसनी व विनॉक्सिश्वसनी जीवाणू, एंटरोबॅक्टिरिएसी (पूर्वप्रकाशित), ग्रॅम अभिरंजन पद्धती, पेशी, पंच सृष्टी वर्गीकरण, लवणजलरागी जीवाणू, सूक्ष्मजंतुविज्ञान (पूर्वप्रकाशित).

संदर्भ :

  • https://micro.magnet.fsu.edu/cells/bacteriacell.html
  • http://www.biologydiscussion.com/bacteria/structure-of-bacterial-cell-with-diagram/29700
  • http://www.biologydiscussion.com/bacteria/bacteria-cell-meaning-and-structure-with-diagram/36681

समीक्षक : रंजन गर्गे