(स्थापना – १९५७). भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) अखत्यारित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमाटिक प्लांट्स अर्थात सीआयएमएपी ही संस्था येते. या संस्थेचे पूर्वीचे नाव सेन्ट्रल मेडिसिनल प्लान्ट्स ऑर्गनायझेशन (सीआयएमपीओ) असे होते. प्रत्यक्षात संस्थेचे कार्य १९५९ मध्ये सुरू झाले. भारतीय औषधी वनस्पतींचा अभ्यास, अशा वनस्पतींवर संशोधन आणि त्यापासून प्रमाणित औषधनिर्मिती अशी उद्दिष्टे संस्थेची आहेत. काही वर्षात यामध्ये सुगंधी वनस्पती संशोधनाची भर पडली. १९७८ मध्ये संस्थेचे नाव बदलून ‘सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लान्ट्स (सीआयएमएपी) संस्था असे ठेवण्यात आले. १९८० मध्ये संस्था दिल्लीतील कुकरेल येथे स्थलांतरित झाली.
सीआयएमएपीचे मुख्य कार्यालय उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे आहे. शंभरपेक्षा जास्त संशोधक, दीडशेहून जास्त अभियंते, तंत्रज्ञ, सहायक कर्मचारी, तीनशेच्यावर पीएच.डी. धारक आणि त्यापुढील उच्च अभ्यासक गण येथे कार्यरत आहेत. हे सारे मनुष्यबळ लखनौतील मुख्य कार्यालयाशिवाय हैदराबाद, बंगळुरू, पुरारा (उत्तराखंड) आणि पंतनगर (उत्तराखंड) येथील संशोधन केंद्रातून कार्यरत आहेत.
सीआयएमएपीकडे कृषी संशोधनासाठी नवीन जनुकयुक्त वाण आणि आधुनिक तंत्र प्रशिक्षण देण्यासाठी पंचवीस हेक्टर शेतजमीन आहे. या क्षेत्राचा वापर करून गांडूळशेती, फलोद्यान प्रात्यक्षिके दाखविली जातात. उत्तम वाणांची रोपे रोपवाटिकेतून माफक किंमतीत विकून त्यापासून नफा कसा मिळवता येतो यांची प्रात्यक्षिके अल्प मुदतीच्या शिबिरातून येथे घेतली जातात. ही संस्था मुख्यतः जीवशास्त्र, रसायनशास्त्र, शेतकी क्षेत्र यात अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे आणि तंत्र प्रणालींच्या मदतीने संशोधन करते. उद्योजक, तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक यांनी एकत्र काम करावे, शेतकरी आणि सामान्य जनांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रम आखावेत असे पाहते. नवनवीन उत्पादने विक्रीस आणणे, त्यांच्या दर्जात, उपलब्धतेत सतत वाढ करणे, संबंधितांचे तांत्रिक आणि प्रशासकीय कौशल्य आणि ज्ञान वाढेल असे प्रशिक्षण देणे, जनसामान्यांपर्यंत या गोष्टींचा प्रसार अशा विविध उद्दिष्टांसाठी संस्था प्रयत्न करते. संस्थेच्या संशोधनांतून भारतातील वनस्पतींपासून उपयुक्त रसायने वेगळी करुन औषधे बनवणे शक्य झाले आहे, शिवाय संशोधनांतून सिद्ध झालेले तंत्रज्ञान वापरून बरीच उत्पादने तयार केली गेली आहेत.
बुंदेलखंड (उत्तरप्रदेश), महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा, गुजराथेतील कच्छ या भागांत गवती चहा-पातीचहाचे पीक घ्यायला सीएसायआर–सीआयएमएपीने शेतकऱ्यांना उत्तेजन दिले. संस्थेने पातीचहा, जिरॅनियमसारख्या गंधधारक वनस्पती, पातीचहा सारखेच वाळा हे सुगंधी गवत यांच्यातील द्रव्ये औषधनिर्मितीसाठी उपयोगात आणली आहेत.
सध्या भारतात सोळा संस्थांत जनुक पेढ्या आहेत. प्रारंभीच्या तीन जनुक पेढ्यांपैकी एक सीआयएमएपीमध्ये होती. जनुक पेढ्यांत शून्याखालील तापमानाला जनुके साठवली आणि टिकवली जातात. त्यांचा गरजेनुसार वापर करून जास्त गुणकारी, आर्थिक दृष्ट्या लाभदायक, कीटकांना आणि अतिवृष्टीला, अनावृष्टीला, धुक्याला, बुरशीला – तोंड देऊन टिकणारी वनस्पती वाणे विकसित करता येतात.
भारताला आपली नैसर्गिक वनस्पती संपदा ओळखून, वाढवून, वापरून औषधी उत्पादनांबाबत आत्मनिर्भर बनवणे. अशा उत्पादनांची निर्यात करून अन्य देशांचाही फायदा करून देणे. घर, परसदार, शेतीवाडीतील जमीन उपयोगात आणून खेडोपाडी लहानमोठ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनस्तर उंचावणे आदी कामात संस्था अग्रेसर आहे.
अश्वगंधा, तुळस, अशा आयुर्वेदात वर्णन केलेल्या औषधी वनस्पतींपासून रसायने मिळवून त्यांपासून प्रभावी आणि तरीही सुरक्षित औषधे निर्माण करणे ही कामे संस्थेने केली आहे, तसेच अश्वगंधापासून मिळवलेल्या रसायनांचा फुफ्फुसांचा कर्करोग आणि पुरस्थ (प्रोस्टेट) ग्रंथीचा कर्करोग बरा करण्यासाठीचे औषधे विकसित केली. त्यात मधुमेह प्रकार-२ वरील उपचारासाठीच्या औषधाचाही समावेश होतो. रक्तकांचन वृक्षाच्या सुक्या पानांच्या आणि सुक्या पाकळ्यांच्या चुऱ्यापासून औषधी रसायने आणि अमिनो आम्ले, प्रथिने, कर्बोदके माणसाना आणि गुरांना उपयोगी पडतात. तसेच शतावरीपासून स्त्रियांच्या विकारांवर, व्हायटेक्स पेडंक्युलॅरिसपासून (काकतिक्ता) मलेरिया, कावीळ, मधुमेह यांवर उपचार म्हणून रसायने मिळतील का यावर ही संस्था अभ्यास करत आहे. हळदीच्या रोपातले हळकुंड काढून घेतल्यावर शेतकरी पाने निरुपयोगी म्हणून फेकून देतात. त्यांपासून औषधी तैलद्रव्ये काढून ती रोगकारक सूक्ष्मजीव नाशासाठी, सौंदर्यवर्धनासाठी कशी करता येतील यासाठी तसेच कापूर कचरी ही सुगंधी वनस्पती स्वयंपाकात वापरतात. पोषणासाठी आणि औषधी रसायनांसाठी संस्था कापूर कचरीचे पृथक्करण करत आहे.
कळीचे शब्द : #औषधनिर्मिती
संदर्भ :
- https://www.cimap.res.in/pages/AdminHomePage.aspxcimap.res.in
- https://www.cimap.res.in/pages/Purara.aspx
- https://www.cimap.res.in/pages/Phytochemistry.aspx
- http://14.139.57.216/english/
- http://14.139.57.216/english/index.php/corporate-social-responsibility/2019-12-13-05-53-38
समीक्षक : मोहन मद्वाण्णा