ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणमध्य भागातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. पोर्ट ऑगस्टाच्या उत्तरेस ६५ किमी., तर अॅडिलेड शहराच्या वायव्येस ३४५ किमी. वर असलेले हे सरोवर समुद्र सपाटीपासून सुमारे ३० मीटर उंचीवर आहे. फ्लिंडर्स पर्वतरांगांच्या पश्चिमेस, टॉरेन्स खचदरीच्या काही भागात हे सरोवर विस्तारले असून त्याची उत्तर-दक्षिण लांबी २४० किमी., पूर्व-पश्चिम रुंदी ६५ किमी. आणि क्षेत्रफळ ५,९०० चौ. किमी. आहे. सरोवर बरेच उथळ (जास्तीत जास्त खोली १ मीटर) असून त्यात सामान्यपणे केवळ लवणयुक्त लाल-तपकीर रंगाचा चिखलच आढळतो. या प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्यमान २० सेंमी. पेक्षाही कमी आहे. त्यामुळे पावसाव्यतिरिक्त सरोवराला पाणीपुरवठा करणारा कायमस्वरूपी एकही प्रवाह किंवा निर्गम मार्ग नाही. केवळ मुसळधार पर्जन्याच्या वेळीच ते भरून वाहते. यावरूनच येथील कुयानी आदिवासी याला पूर्वीपासूनच ‘एन्गार्न्दमुकिया’ म्हणजे पावसाचा वर्षाव (शॉवर ऑफ रेन) या नावाने ओळखतात. पावसाच्या वेळी यातून वाहणारे पाणी दक्षिणेस बरेच दूरवर (सुमारे ६५ किमी.) असलेल्या स्पेन्सर आखाताला जाऊन मिळते. सरोवराच्या पश्चिम किनाऱ्याजवळ मर्डी अंदमूका यांसारखी काही बेटे असून त्यांपैकी अंदमूका हे सर्वांत मोठे आहे.
इंग्लिश समन्वेषक एडवर्ड जॉन एअर यांनी नवीन चराऊ कुरणांच्या शोधार्थ फिरत असताना इ. स. १८३९ मध्ये हे सरोवर पाहिले होते. ब्रिटिश अर्थतज्ज्ञ, सैनिक, राजकारणी आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातील वसाहतीकरणाच्या कामगिरीवर आलेल्या आयोगाचे अध्यक्ष कर्नल रॉबर्ट टॉरेन्स यांच्या सन्मानार्थ या सरोवराला टॉरेन्स हे नाव देण्यात आले आहे. सरोवराला एक बंधारा बांधून यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले असून तलाव निर्माण करण्यात आला आहे. सरोवराच्या सभोवताली सॅम्फायर, सॉल्टबुश, ब्ल्यूबुश यांसारख्या वनस्पती दिसून येतात. १९९१ पासून टॉरेन्स सरोवराचा संपूर्ण प्रदेश राष्ट्रीय उद्यानासाठी संरक्षित करण्यात आला असून एक पर्यटन केंद्र म्हणून येथे ‘लेक टॉरेन्स नॅशनल पार्क’ विकसित करण्यात आले आहे.
समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे