निअँडर नदीच्या खोऱ्यातील मानव. सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी ⇨सेपियन मानव म्हणजे आधुनिक मानव जातीचा उदय झाला त्या वेळी इरेक्टस या अतिप्राचीन जातीचे मानव अस्तित्वात होते. शिवाय इतरही अनेक मानव जातींचे भाईबंद होते. त्यांच्यात निअँडरथल मानव आणि ⇨डेनिसोव्हा मानव (अद्याप वेगळी जात सुचवण्यात आलेली नाही) हे प्रमुख व उत्क्रांतीच्या दृष्टीने जवळचे मानवसमूह होते.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी उत्क्रांती ही संकल्पनाच मान्य झालेली नव्हती. १८५६ मध्ये जर्मनीतील ड्यूसेलडॉर्फजवळ निअँडर नदीच्या खोऱ्यात फेल्डहोफर या गुहेत अशाच प्रकारचे जीवाश्म मिळाले होते. या जीवाश्मांना १८६४ मध्ये अँग्लो-आयरिश भूवैज्ञानिक विल्यम किंग (१८०९-१८८६) यांनी होमो निअँडरथलेन्सिस (निअँडरथल मानव) हे नाव दिले. या अगोदर बेल्जियममधील अविर्स या गुहेमधून १८२९ मध्ये नामशेष झालेल्या मानवांचे जे जीवाश्म मिळाले होते, ते असेच असल्याचे नंतरच्या काळातील संशोधनातून दिसले. तसेच १८४८ मध्ये जिब्राल्टर भागात फोर्ब्स क्वारी या ठिकाणी एका प्रौढ निअँडरथल स्त्रीची कवटी रॉयल नेव्हीचे कॅ. एडमंड फ्लिंट यांना मिळाली होती. अर्थातच त्या काळात उत्क्रांतीच मान्य नसल्याने हे जीवाश्म आपल्या आधुनिक मानवांच्या आधी असलेल्या मानवांचे आहेत हे मान्य होणे अशक्यच होते. या शोधानंतर अनेक दशके निअँडरथल जीवाश्मांचा मानवी पूर्वजांशी काही संबंध असेल हे मानले जात नव्हते. उलट आधुनिक मानवांपूर्वी यूरोपमध्ये वास्तव्य करणारे जे कनिष्ठ प्रतीचे लोक होते त्यांचे हे अवशेष आहेत, हे मत प्रचलित होते.
निअँडरथल मानवांचे जीवाश्म सध्याच्या इंग्लंडपासून उझबेकिस्तानपर्यंत आणि दक्षिणेकडील लाल समुद्रापर्यंत आढळलेले आहेत. हे मानव संपूर्ण यूरोप व आशिया खंडात विस्तृत भागात पसरलेले होते. इराकमधील शानिदार गुहा, उझबेकिस्तानातील तेशिकताश आणि सायबीरियातील ओक्लाडनिकोव येथे मिळालेले निअँडरथल जीवाश्म लक्षणीय आहेत.
निअँडरथल मानवांचा कालखंड सर्वसाधारण सुमारे २,५०,००० ते ३०,००० वर्षपूर्व असा आहे; तथापि उत्तर स्पेनमधील अतापुर्का भागात सिमा दे लॉस ह्यूसोस येथे १९७६ मध्ये मिळालेले ६५०० मानवी जीवाश्म ४,३०,००० वर्षपूर्व काळातले आहेत. या जीवाश्मांच्या डीएनए रेणूंच्या अभ्यासातून ते निश्चितपणे प्रारंभीच्या निअँडरथल मानवांचे असल्याचे सिद्ध झाले आहे. हा पुरावा मात्र एकुलता एक नाही. इंग्लंडमधील केंट भागातही साधारणपणे इतक्या अगोदरचे निअँडरथल मानव होते हे दिसते. तेथे ‘स्वान्सकोंब कवटी’ म्हणून ओळखली जाणारी कवटी एका निअँडरथल स्त्रीची असून तिचा काळ ४,००,००० वर्षपूर्व असा आहे.
निअँडरथल मानवांच्या मेंदूचे आकारमान १२०० ते १७५० घ. सेंमी. होते. म्हणजेच त्यांचा मेंदू आधुनिक मानवांइतका मोठा होता, तरीही बुद्धिमत्तेच्या बाबतीत ते आधुनिक मानवांपेक्षा कमी प्रगत व अधिक आदिम असल्याचे मानले जात होते. या मानवांचे नाक मोठे असून ते काहीसे मध्यम उंचीचे व दणकट बांध्याचे होते. त्यांचे वजन ६४ ते ८२ किग्रॅ. असावे व उंची १५० ते १७५ सेंमी. असावी असे दिसते. त्यांच्या शरीराची एकूण रचना आत्यंतिक थंडीत टिकून राहण्यासाठी झालेली होती. हे लोक मुख्यतः प्राण्यांची शिकार करून जगत असले, तरी त्यांच्या अन्नात वनस्पती व बुरशींचाही समावेश होता. तसेच ते शिंपल्यातील मांसही खात असत.
निअँडरथल मानवांच्या नष्ट होण्यासंबंधी अनेक सिद्धांत आहेत. सुरुवातीच्या संशोधकांनी यांना जंगली मानव म्हणून चित्रित केले असल्याने त्यांच्या नष्ट होण्यासंबंधी असे मानले जात होते की, आधुनिक मानवांच्या तुलनेत ते जगण्यासाठी सक्षम नव्हते. विशेषतः मानवतेची म्हणून संस्कृती, सामाजिक वर्तन, भाषा, विविध पर्यावरणांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि प्रतीकात्मक वर्तन ही मुख्य वैशिष्ट्ये फक्त खास आधुनिक मानवांमध्येच आहेत अशी कल्पना होती. त्यामुळे हे गुणधर्म नसलेले ‘इतर’ मानव उत्क्रांतीच्या झगड्यात अपयशी ठरल्याने नाहीसे झाले, असे एक मत मांडण्यात येत असे. हे चित्र गेल्या शतकाच्या जवळजवळ अखेरपर्यंत असेच होते; तथापि अलीकडच्या दोन दशकांमध्ये नामशेष झालेल्या निअँडरथल मानवांबद्दलची आपली धारणा मोठ्या प्रमाणात बदलली आहे.
निअँडरथल माणसांमध्ये संगीताच्या अस्तित्वाचा व कलात्मक दृष्टी असल्याचा एक महत्त्वाचा पुरावा १९९५ मध्ये स्लोव्हेनियात सापडला इव्हान तुर्क व जेनेस डिर्जेक या संशोधकांनी स्लोव्हेनियातील दिवजे बेब येथे केलेल्या उत्खननामध्ये त्यांना अस्वलाच्या मांडीच्या हाडापासून बनवलेली एक बासरी मिळाली. हे ठिकाण मध्याश्मयुगातील असून काळ ४३,००० वर्षपूर्व असा आहे. ही बासरी निअँडरथल मानवाने बनवली असावी असा अंदाज आहे. ‘निअँडरथल बासरी’ म्हणूनही ती ओळखली जाते. इतरांना प्रतीकात्मक संदेश देण्याचा एक भाग म्हणून गुहेच्या भिंतींवर हेतुपुरस्सर रंगवलेल्या (किंवा कोरलेल्या) आकृती हे मानवी उत्क्रांतीमधील एक प्रमुख विशेष पाऊल असल्याचे मानले जाते. तथापि २०१४ मध्ये स्पेनमधील गोरहॅम्स गुहेत खालच्या खडकावर फुल्यांप्रमाणे कोरीव काम केल्याचे आढळले. निअँडरथल माणसांमध्ये कलात्मकतेची क्षमता होती किंवा नाही याबद्दलच्या वादविवादाला २०१८ मध्ये नाट्यमय कलाटणी मिळाली. दक्षिण स्पेनमधील कुएवा दे लॉस एव्हिओनेस येथील निअँडरथल मानवाचे वास्तव्य असलेल्या एका गुहेत मुद्दाम छिद्र पाडलेले आणि लाल व पिवळ्या रंगांनी रंगवलेले शिंपले मिळाले. त्यांचा काळ १,१७,००० वर्षपूर्व एवढा जुना आहे. आधुनिक मानवांच्या तुलनेत (४०,००० ते २०,००० वर्षपूर्व) कलात्मक दृष्टी असण्याचा हा फार प्राचीन पुरावा आहे. कदाचित अशी कलात्मकतेची जाणीव आधुनिक मानव आणि निअँडरथल मानव या दोघांनाही त्यांच्या सामायिक पूर्वजांकडून मिळाली असावी.
निअँडरथल मानव बोलू शकत होते की नाही हे सांगणे कठीण आहे; कारण जीवाश्मांमध्ये स्वरयंत्राचे मऊ भाग मिळत नाहीत. तथापि घसा, कानाचा भाग व जबडे यांची रचना बघता असे दिसते की, ती रचना आपल्यापेक्षा फारशी वेगळी नाही. या मानवांची ऐकण्याची क्षमता आपल्याप्रमाणेच होती व ते कदाचित प्राथमिक स्वरूपाची भाषा बोलत असावेत. याला दुजोरा देणारा पुरावा अलीकडच्या काळात या मानवांच्या जनुकीय अभ्यासातून मिळाला आहे. ‘फोर्कहेड बॉक्स प्रोटीन पी २’ (फॉक्सपी-२) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जनुकांच्या गटात दहा जनुके आहेत. हे सर्व भाषिक क्षमतेशी व बोलण्याच्या क्षमतेशी संबंधित आहेत. यांतील दोन जनुके आधुनिक मानव आणि निअँडरथल मानव यांच्यात सारखेच असल्याचे आढळले आहे.
आधुनिक मानवांच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मृतांना आदराने वागवणे. निअँडरथल मानव मृतांना फेकून न देता पुरत असत, या कल्पनेला शंभर वर्षांचा इतिहास आहे. फ्रान्समधील ला चॅपेल-आक्स-सेंट्स येथील गुहेत १९०८ मध्ये निअँडरथलचा एक संपूर्ण सांगाडा सापडला. दीर्घकाळ बाहेर राहिल्याने प्राण्यांच्या हाडांवर जशा खुणा दिसतात तशा खुणा या हाडांवर नव्हत्या. याचा अर्थ मृत्यूनंतर शरीराचे जलद आणि हेतुपुरस्सर दफन केले गेले होते. अशाच दफनविधींचा स्पष्ट पुरावा स्पेनमधील देस-क्युबिएर्टा गुहेत सापडला आहे. लोझोया बालक (लोझोया चाइल्ड) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलाच्या (३८,००० ते ४२,००० वर्षपूर्व) कवटीच्या सोबत अनेक शेकोट्या आढळून आल्या. त्या प्रत्येकामध्ये एका स्थानिक शाकाहारी प्राण्याचे शिंग ठेवलेले होते. उझबेकिस्तानातील तेशिक ताश येथे एका ८ ते ११ वर्षांच्या निअँडरथल मुलाचे (७०,००० वर्षपूर्व) विधिवत दफन केल्याचे पुरावे मिळाले आहेत. अशाच प्रकारे निअँडरथल मृतांचे दफन केल्याचे पुरावे फ्रान्समधील इतर अनेक स्थळांवर आणि बेल्जियममधील स्पाय गुहेत दिसून आले आहेत.
इराकमधील झाग्रोस पर्वतरांगेतील शानिदार येथील गुहांमध्ये निअँडरथल मानवांचे अनेक सांगाडे सापडले आहेत. दुखापतीनंतर जखमी आणि आजारी माणसे जिवंत राहण्याचा पुरावा येथे मिळाला आहे. याचा अर्थ आधुनिक मानवांप्रमाणेच निअँडरथल लोक आजारी व्यक्तींची काळजी घेत असत. शानिदार येथील पुराव्याचे वैशिष्ट्य म्हणजे शानिदार-४ या गुहेत एका दफनाच्या वेळी फुले ठेवली असल्याचे मत मांडण्यात आले होते. याचे कारण म्हणजे तेथे काही फुलांचे पराग मिळाले होते. तथापि हा सिद्धांत सर्वमान्य झालेला नाही. निअँडरथल मानवांच्या अवशेषांमध्ये अनेक प्रकारच्या दुखापतीचे पुरावे मिळाले आहेत. तथापि बहुतेक प्रसंगी या दुखापती जीवघेण्या नव्हत्या; कारण हे दुखापतग्रस्त लोक त्यानंतर बराच काळ जगले होते. डोके व हातापायांच्या दुखापती या प्रामुख्याने शिकार करताना झालेल्या होत्या. तसेच एकमेकांमध्ये झालेला हिंसाचारही काही दुखापतींना कारणीभूत होता. निअँडरथल मानवांचे आयुष्यमान कमी होते. सर्वसाधारणपणे ते चाळीस वयाच्या आतच मरण पावत असत.
निअँडरथल मानव हे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून आधुनिक मानवाचे सर्वांत जवळचे नातेवाईक आहेत हे खरे असले, तरी त्यांचे संबंध अत्यंत गुंतागुंतीचे होते. निअँडरथल आणि आधुनिक मानव अनेक हजार वर्षे एकत्र अस्तित्वात होते; परंतु या दोन समूहांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रजनन होत नव्हते, असे मानले जात होते. परस्परांमध्ये लैंगिक संबंध येत नसल्याने दोन्ही जनुकसंच स्वतंत्र राहिले. अर्थातच केवळ जीवाश्मांच्या बाह्य लक्षणांच्या अभ्यासातून हे असे होत होते किंवा नाही हे कळायचा काही मार्ग नव्हता. निअँडरथल मानवांच्या जीवाश्मांमधून डीएनए रेणू मिळवणे शक्य होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहिली. सन २०१० मध्ये या संदर्भात क्रांतिकारी घटना घडून आली. स्वीडिश वैज्ञानिक स्वान्ते पाबो (२०२२ मधील नोबेल पारितोषिक विजेते) यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीतील संशोधकांनी ४०,००० वर्षे जुन्या निअँडरथल जीवाश्मांमधून डीएनए रेणू मिळवले व निअँडरथल मानवांच्या जनुकसंचाची क्रमवारी प्रकाशित केली. हे संशोधन धक्कादायक ठरले. कारण या कार्याने प्रथमच दोन जातींमध्ये काही प्रमाणात प्रजनन झाल्याचे सूचित झाले होते. यानंतर २०१६ मध्ये सायबीरिया, क्रोएशिया व स्पेन येथील निअँडरथल जीवाश्मांमधून जनुकसंचाची क्रमवारी प्राप्त झाल्यावर दोन्ही मानव समूहांमध्ये क्वचितच नव्हे, तर नियमितपणे लैंगिक संबंध येत होते हे स्पष्ट झाले. तसेच हे संबंध किमान १,००,००० वर्षांपासून येत असल्याचे दिसून आले. दोन जातींमध्ये लैंगिक संबंध अनेक ठिकाणी येत असल्याचे पुरावे २०२१ मध्ये नव्याने सापडले आहेत. बल्गेरियातील बाको किरो गुहेत तीन आधुनिक मानवांचे जीवाश्म मिळाले आहेत. ते ४६,००० ते ४२,००० वर्षपूर्व काळातले आहेत. त्यांच्या डीएनए रेणूंच्या अभ्यासातून असे दिसले की त्यांच्यात ३ टक्के डीएनए निअँडरथलचे आहेत. यावरून संशोधकांनी असे प्रतिपादन केले आहे की, या तीन आधुनिक मानवांचा सहा ते सात पिढ्यांपूर्वी कोणीतरी पूर्वज निअँडरथल जातीचा होता. सुमारे ४०,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आधुनिक मानवांमध्ये ३ ते ६ टक्के जनुक हे निअँडरथल मानवांचे होते. सध्या जगात अस्तित्वात असलेल्या आफ्रिकेबाहेरच्या (यूरोपीय व आशियाई लोक) मानवी जनुकसंचात १ ते ४ टक्के जनुक निअँडरथल मानवांचे आहेत, हे लक्षणीय आहे.
प्रजननाव्यतिरिक्त निअँडरथल मानव व आधुनिक मानव या दोन समूहांमध्ये परस्पर संबंध येत होते. या दोन समूहांमधील हिंसाचाराचे अप्रत्यक्ष पुरावे सापडले आहेत. इराकमधील शानिदार गुहेत बरगड्यांमधील जखमेमुळे निअँडरथल पुरुषांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. सूक्ष्म अभ्यासातून असे दिसले, की ही जखम आधुनिक मानवाने फेकलेल्या भाल्यामुळे झाली होती. याचा अर्थ असा की, आफ्रिकेतून बाहेर पडून पसरलेल्या आधुनिक मानव टोळ्यांचा निअँडरथल मानवांशी भरपूर संबंध आला होता. आधुनिक मानव कोणत्यातरी कारणाने स्पर्धेत वरचढ ठरले व निअँडरथल मानव नामशेष होण्याच्या दिशेने गेले.
संदर्भ :
- Nowell, April, ‘Rethinking Neandertals’, Annual Review of Anthropology, Vol. 52, pp. 151-170, 2023.
- Ruan, Jiaoyang; Timmermann, Axel & others ‘Climate shifts orchestrated hominin interbreeding events across Eurasia’, Science, Vol. 381, pp. 699-704, 2023. https://www.science.org/doi/10.1126/science.add4459
- Slon, V.; Mafessoni, F.; Vernot, B. & others ‘The genome of the offspring of a Neanderthal mother and a Denisovan father’, Nature, Vol. 561, pp. 113-116, 2018. https://www.nature.com/articles/s41586-018-0455-x
- Vincenzo, Fabio Di; Manzi, Giorgio, ‘Homo heidelbergensis as the Middle Pleistocene common ancestor of Denisovans, Neanderthals and modern humans’, Journal of Mediterranean Earth Sciences, Vol. 15, 2023. https://rosa.uniroma1.it/rosa04/mediterranean_earth_sciences/article/view/18074
- छायाचित्र संदर्भ : १. (https://www.nhm.ac.uk/discover/who-were-the-neanderthals.html), २. https://www.nhm.ac.uk/discover/who-were-the-neanderthals.html ३. https://www.nhm.ac.uk/discover/who-were-the-neanderthals.html ४. science.org
समीक्षक : मनीषा पोळ