इरेक्टस मानव या जातीचे जीवाश्म प्रथम १८९१ मध्ये इंडोनेशियामधील जावा भागातील त्रिनील येथे सापडले. विख्यात डच वैज्ञानिक युजीन डुबॉ (१८५८-१९४०) यांनी प्रारंभी या मानवसदृश जीवाश्मांचे वर्गीकरण पिथेकॅन्थ्रोपस इरेक्टस (ताठ उभा राहणारा कपि-मानव) असे केले. आधुनिक मानव जातीच्या तुलनेत हे मानव सर्वांत जास्त काळ अस्तित्वात होते. त्यांचा कालखंड सुमारे १९ लाख ते दीड लाख वर्षपूर्व असा असून ते भारतासह जगाच्या फार मोठ्या भागात पसरले होते (पाहा : तक्ता).

इरेक्टस मानव जातीचे काही महत्त्वाचे जीवाश्म

कालखंड (लक्ष वर्षपूर्व)

पुराजीवशास्त्रीय स्थान

जीवाश्म वर्णन

१९ ते १२

कूबी फोरा, केन्या (केनिया) तुर्काना बॉय अथवा नरियोकोटोम बॉय (केएनएम-डब्ल्यूटी १५०००), केएनएम-इआर ३७३३ (स्त्री), केएनएम-इआर ३८८३ (संभाव्य एर्गास्टर मानव), केएनएम-इआर १८०८ (स्त्री)

१९ ते ७

ओल्डुवायी गॉर्ज, टांझानिया ओएच ९ व ओएच१२
१८ ते १७ दमनिसी, जॉर्जिया डी३४४४ (वयस्कर पुरुष), डी२७००, डी२२८०, डी२२८२ (आफ्रिकेबाहेरील सर्वांत जुना इरेक्टस जीवाश्म)
१९ ते १६ स्वार्टक्रान्स, दक्षिण आफ्रिका एसके ८४७ (संभाव्य एर्गास्टर मानव)
१.८ ते ०.९ संगीरान अथवा त्रिनील, इंडोनेशिया संगीरान २, संगीरान १७, त्रिनील २ (जावा मानव)
१.० ते ०.८ सेप्रानो, इटली सेप्रानो १ (युरोपातील सर्वांत प्राचीन इरेक्टस जीवाश्म)
०.८ ते ०.४ झाउकौडियन, चीन झेडकेडी इ१, झेडकेडी डी१, झेडकेडी एल१, झेडकेडी एल२, झेडकेडी एल३, झेडकेडी एच३ (पीकिंग मानव)
०.८ ते ०.६ बोडोदार, इथिओपिया बोडो कवटी (सेपियन मानवाचा पूर्वज असण्याची शक्यता)
०.३ ते ०.१ जिनीयुशान, चीन जिनीयुशान (पीकिंग मानव पेक्षा प्रगत)
०.२ ते ०.०५ ग्नानडोंग, इंडोनेशिया ग्नानडोंग १, ग्नानडोंग ९,  ग्नानडोंग १०, ग्नानडोंग ११ जिनीयुशान (सर्वांत अलीकडच्या काळातील इरेक्टस जीवाश्म)

 

इरेक्टस मानव ही जाती आफ्रिकेत उगम पावली असावी, असे सर्वसामान्य मत होते; तथापि आता या मताच्या उलट पुरावे मिळाल्याने दुसरा सिद्धांत पुढे आला आहे. या जातीचा उदय आशिया खंडात झाला आणि तेथून ती इतरत्र पसरली असा पर्यायी सिद्धांत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जावा (जावा मानव), चीनमध्ये झाउकौडियन या ठिकाणी आणि जॉर्जियात दमनिसी या विस्तृत भूप्रदेशांत आढळलेले इरेक्टस मानवाचे जीवाश्म हे आफ्रिकेतील इरेक्टस मानव जीवाश्मांच्या अगोदरचे आहेत.

 इरेक्टस मानव जातीचा विस्तार

इरेक्टस मानव जीवाश्म मिळू लागले तेव्हा म्हणजे सु. २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील हवामान कोरडे होऊ लागले होते आणि दोन पायांवर तोल सांभाळत पळू शकणारे हे मानव बदलत्या परिसराशी अधिक जुळवून घेऊ शकत होते. या मानवांची उंची १४५ ते १८५ सेंमी. होती आणि वजन ४५ ते ६८ किग्रॅ. होते. एकूणच या मानवांची शरीररचना आधुनिक मानवांशी मिळतीजुळती होती. झाडांमध्ये वावरण्यासाठी लागणारी शारीरिक वैशिष्ट्ये या मानवांमध्ये जवळजवळ लोप पावलेली होती. त्यांच्या कवटीचे आकारमान हॅबिलिस मानवापेक्षा जास्त म्हणजे ८५० ते ११०० घ. सेंमी. होते. हे मानव शिकार करत असल्याने व अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा वापर करत असल्याने त्यांना अधिक प्रथिने मिळत असावीत आणि अशा अधिक प्रथिनयुक्त अन्नामुळे त्यांच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळाली असावी. या मानवांचे दगडी अवजारे वापरण्याचे तंत्रज्ञान वेगळे होते. त्याला अश्युलियन तंत्रज्ञान म्हणतात. ते प्रामुख्याने हातकुऱ्हाडींचा व फरशी या तोडहत्याराचा वापर करत असत.

काही पुराजीववैज्ञानिक आफ्रिकेतील इरेक्टस मानव नमुन्यांना एर्गास्टर मानव (Homo ergaster) अशी वेगळी जाती मानतात. आफ्रिकेत १८ लक्ष ते १३ लक्ष वर्षपूर्व या दरम्यान मिळालेल्या जीवाश्मांचा समावेश ते या जातीत करतात. केनियातील रूडॉल्फ (तुर्काना) सरोवर भागातील कूबी फोरा या पुराजीवशास्त्रीय स्थळावर १९८४ मध्ये तुर्काना बॉय अथवा नरियोकोटोम बॉय (Nariokotome Boy) या नावाने ओळखला जाणाऱ्या (केएनएम-डब्ल्यूटी१५०००) सात ते अकरा वर्षे वयाच्या मुलाचे जवळजवळ सर्व अवशेष सापडले. हा आफ्रिकेतील इरेक्टस मानवाचा महत्त्वाचा जीवाश्म पुरावा आहे.

अलीकडच्या काळात २००१ मध्ये जॉर्जियात इरेक्टस मानवाचे सु. १०० जीवाश्म मिळाले आहेत. त्यांच्यासाठी इरेक्टस जॉर्जियाकस मानव (होमो इरेक्टस जॉर्जियाकस) अशी उपजात सुचविण्यात आली आहे. हे जीवाश्म सु. १८ लक्ष वर्षपूर्व या काळातले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शरीररचना सर्वसाधारणपणे छोट्या आकाराच्या आधुनिक मानवांप्रमाणे असून मेंदूचे आकारमान (५५० ते ७७५ घ. सेंमी.) मात्र कमी होते.

इरेक्टस मानवांना आधुनिक मानवांचे पूर्वज मानता येईल किंवा नाही याबाबतीत अद्याप संशोधन पूर्ण झालेले नाही. तसेच नवनवीन जीवाश्म सापडत असल्याने इरेक्टस मानव ते आधुनिक मानव ही उक्रांतीची वाटचाल पूर्वी वाटत होती त्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीची असल्याचे दिसून येत आहे.

चित्रपत्र :

इरेक्टस मानवाचे कल्पनाचित्र.
तुर्काना बॉय अथवा नरियोकोटोम बॉयचे अवशेष, केनिया.
इरेक्टस मानवाचे जीवाश्म, दमनिसी (जॉर्जिया).
इरेक्टस मानवाचे जीवाश्म मिळालेली ठिकाणे.

 

संदर्भ :

  • Middleton, E. R.; Antón, S. C. ‘Homo erectus’ in Encyclopedia of Global Archaeology (Ed., Smith, C.), Springer, New York, 2014. https://doi.org/10.1007/978-1-4419-0465-2_687
  • Roberts, D. L.; Jarić, I.; Lycett, S. J.; Flicker, D. & Key, A. ‘Homo floresiensis and Homo luzonensis are not temporally exceptional relative to Homo erectus’, Journal of Quaternary Science, 38: 463-470, 2023. https://doi.org/10.1002/jqs.3498
  • Van, Arsdale, A. P., ‘Homo erectus – A Bigger, Smarter, Faster Hominin Lineage’, Nature Education Knowledge, 4(1):2, 2013.

छायाचित्र संदर्भ :

  •  https://www.bradshawfoundation.com/origins/
  • https://humanorigins.si.edu/
  • https://www.bradshawfoundation.com/origins/
  • www.dmanisi.ge
  • https://cdn.britannica.com/54/80454-004-426A1FFE/

समीक्षक : मनीषा पोळ