अधिवासातील नैसर्गिक घटकांची माहिती मिळवणे व ती आपल्या प्रजातीमधील अन्य सजीवांपर्यंत पोहोचवणे या क्रिया सजीवांना टिकाव धरण्यासाठी आवश्यक असतात. विशिष्ट ध्वनी, गंध, पिसांची किंवा केसांची रंगसंगती, शारीरिक हालचाली, विद्युत लहरी अशा विविध मार्गांनी सजीव अन्य सजीवांशी संवाद साधतात. त्यातीलच ध्वनिसंवेदन हा प्राण्यांमधील संप्रेषणाचा एक प्रमुख मार्ग आहे. प्राणी, पक्षी व कीटक या पद्धतीने संवाद करतात. मानव, प्राणी, पक्षी यांच्या ध्वनिग्रहण क्षमतेनुसार ध्वनीचे श्राव्य ध्वनी (Acoustic sound), अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आणि श्राव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे तीन प्रकार पडतात. मानवी कान २० ते २०,००० हर्ट्झ एवढी कंपनक्षमता असलेला (कंप्रतांचा) आवाज अर्थात श्राव्य ध्वनी ऐकू शकतात. परंतु, अन्य सजीव श्राव्य ध्वनीच्या पलीकडे ध्वनिलहरी प्रक्षेपित व ग्रहण करू शकतात. २० हर्ट्झपेक्षा कमी कंपनक्षमतेच्या ध्वनीला अवस्वनिक (अवश्राव्य), तर २०,००० हर्ट्झपेक्षा अधिक कंपनसंख्येच्या ध्वनींना स्वनातीत (श्राव्यातीत ध्वनी) म्हणतात. सजीवांच्या बहुसंख्य प्रजाती एक किंवा अधिक प्रकारच्या ध्वनिलहरी वापरून संवाद साधत असल्याचे निदर्शनास आले आहे. हत्ती, जिराफ, पाणघोडा, गेंडा यांसारखे अनेक सस्तन प्राणी तसेच काही पक्ष्यांच्या प्रजाती अवस्वनिक ध्वनिलहरींमार्फत संवाद करतात. तसेच डॉल्फिन, वटवाघूळ, घड्याळ मासा व अनेक कृंतक प्रजाती स्वनातीत ध्वनिलहरींद्वारे संप्रेषण करतात.
अवस्वनिक ध्वनी संप्रेषण करणाऱ्या सजीवांपैकी हत्ती हा प्रमुख सजीव आहे. हत्ती १० हर्ट्झपेक्षा कमी कंपनक्षमता असलेल्या लहरी प्रक्षेपित करू शकतात. तसेच ते १ हर्ट्झ इतक्या लहान ध्वनी लहरी देखील ओळखू शकतात. आफ्रिकन हत्ती मोठ्या कळपांमध्ये राहतात. हे कळप चरताना लांबपर्यंत पसरतात व छोट्या छोट्या गटांमध्ये फिरतात. हे गट अवस्वनिक संप्रेषणाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. अवस्वनिक लहरींद्वारे संवेदन करण्याचे विविध फायदे असतात. कमी कंपनक्षमता असलेल्या या ध्वनी लहरींची तरंगलांबी (Wavelength) जास्त असते. तरंगलांबी अधिक असल्याने या लहरी मोठ्या अडथळ्यांना (जमिनीवरील मोठी झाडे, मोठमोठे दगड) पार करून दूरवर पोहोचतात. त्यामुळे हत्तीचे कळप एकत्रित ठेवण्यासाठी अवस्वनिक संवेदन क्षमता महत्त्वाची ठरते. अवस्वनिक संप्रेषणाद्वारे हत्ती १४ वेगवेगळ्या गटांमधील प्राणी ओळखू शकतात.
तसेच मोठ्या समूहामधील प्राणी अवस्वनिक लहरींद्वारे १०० पेक्षा अधिक माद्यांना वेगवेगळे ओळखू शकतात. निकटवर्ती आणि अपरिचित प्राणी ओळखण्यासाठी हत्ती ही पद्धती वापरतात. अवस्वनिक संप्रेषणाचा उपयोग करून हत्तींचे कळप एकमेकांपासून योग्य अंतर राखतात. हत्तींचे कळप सु. १० किमी.पर्यंत एकमेकांशी संपर्क ठेवत असल्याचे आढळले आहे. अन्नपाण्याचे योग्य विभाजन करण्यात संपर्काची ही पद्धती उपयोगी पडते.
कळपाची एकसंधता राखणे, अधिवासाचे परिक्षेत्र ठरविणे, जोडीदाराचा शोध घेणे व पिलांचे संरक्षण करणे यांसाठी हत्ती अवस्वनिक संप्रेषण वापरतात. वादळ, समुद्राच्या लाटा, सागरी प्रवाह, भूगर्भातील हालचाली या विविध नैसर्गिक घटनांमुळे तसेच विमाने, हेलिकॉप्टर यांच्यामुळे अवस्वनिक लहरी उत्पन्न होतात. या ध्वनिलहरी टिपण्याची क्षमता हत्तींमध्ये आढळते. नैसर्गिक आपत्ती व धोके ओळखून गटातील प्राण्यांना धोक्याची सूचना देण्यासाठी ही क्षमता उपयोगी पडते.
नैसर्गिक अधिवासातील हत्तींवर ध्वनिमुद्रित अवस्वनिक आवाजांचा वापर करून प्रयोग केले गेले. त्यामध्ये मानवाला अजिबात ऐकू न येणाऱ्या या ध्वनिफितींना हत्ती प्रतिसाद देत असल्याचे आढळले. तसेच ध्वनिफीत ऐकताना हत्तींच्या हालचाली व वर्तनामध्ये लक्षणीय बदल घडून आले. त्याचप्रमाणे हत्ती १-२ किमी. लांब अंतरावरून हे अवस्वनिक ध्वनी ऐकू शकतात, असेही आढळून आले.
हत्तींप्रमाणेच देवमासे, डॉल्फिन, घड्याळ मासा यांसारखे सागरी सजीव अवस्वनिक संप्रेषणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. समुद्राच्या तळाशी प्रकाश मर्यादित असतो तसेच गंध व स्वाद या संवेदांचा उपयोग मर्यादित असतो. त्यामुळे या सजीवांमध्ये अवस्वनिक संप्रेषणाचे विशेष महत्व असते. देवमाशाच्या ब्लू व्हेल (Blue whale) व हम्पबॅक व्हेल (Humpback whale) या प्रजातींमधील अवस्वनिक संप्रेषणाचा शास्त्रज्ञ अनेक दशके अभ्यास करीत आहेत. हम्पबॅक व्हेल मासे नियमित आणि सुसंगत अवस्वनिक ध्वनींच्या मालिका प्रक्षेपित करतात. हे ध्वनी ‘व्हेलचे गीत’ (Song of whales) म्हणून प्रसिद्ध आहेत. मानवी संगीत रचनांप्रमाणे या ध्वनिमालिकांमध्ये विशिष्ट आकृतिबंध व पुनरावृत्ती आढळते. सस्तन प्राण्यांमध्ये स्वरयंत्र (Larynx) असते, त्याप्रमाणे व्हेल माशांमध्ये स्वनिक-ओष्ठ (Phonic lip) असतो. स्वनिक ओष्ठांमधील स्वरतंतूंमधून १०–२० हर्ट्झ कंपनक्षमतेचे अवस्वनिक ध्वनी निर्माण होतात.
मानवामधील भाषिक संवाद सोडता ‘व्हेलचे गीत’ हा सजीवांमधील संवादाचा सर्वांत क्लिष्ट प्रकार मानला जातो. देवमाशांचे समूह या गीतांच्या माध्यमातून आपापसात अनेक प्रकारचे संदेश पाठवतात. नर देवमासे या ध्वनींचा उपयोग जोडीदार शोधण्यासाठी करतात. विशिष्ट गीतांद्वारे नर माद्यांना साद घालतात. एका गटातील सर्व नर एकच गीत गातात. तसेच लांबवर पसरलेले देवमाशांचे गट थोड्याफार फरकाने सारखेच गीत गात असल्याचे आढळून आले आहे. ही गीते काही सेकंद ते काही मिनिटांची असू शकतात व समुद्रात शेकडो किलोमीटरपर्यंत ऐकू जातात.
प्रजननाशिवाय विविध सामाजिक परस्परसंबंधांमध्ये देवमासे अवस्वनिक माध्यम वापरतात. देवमाशांच्या अनेक प्रजातींमध्ये ध्वनिस्पंदने (Pulses), टिकटिक (Clicking), हुंकारणे (Groan) अशा वेगवेगळ्या ध्वनींमार्फत संकेतांची देवाणघेवाण होते. अन्नाचा शोध घेताना तसेच पिलांचे संगोपन करताना देवमासे अवस्वनिक ध्वनिमालिकांमधून गटातील अन्य प्राण्यांशी संवाद साधतात. वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या कंपनक्षमतांचे ध्वनी प्रक्षेपित व ग्रहण करतात. देवमाशांच्या काही प्रजातींची गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध आहेत.
देवमाशांची गीते सर्वप्रथम कॅप्टन डब्लू. एच. केली (W.H. Kelly) यांनी १८८१ मध्ये जपानच्या समुद्रामध्ये टिपली. गुंतागुंतीच्या रचना असलेल्या या गीतांनी शास्त्रज्ञांना अनेक दशके कोड्यात टाकलेले आहे. अंटार्क्टिक महासागरामधील पिग्मी व्हेल (Pygmy whale) व ब्लू व्हेलचा सखोल अभ्यास केला आहे. मागील ६० वर्षांत देवमाशांच्या गीतांमध्ये बदल झाल्याचे अलीकडच्या काळात झालेल्या अभ्यासातून आढळले आहे. या गीतांची कंपनक्षमता दर वर्षी थोडी थोडी कमी होत चालली आहे. सागरी ध्वनिप्रदूषणामुळे देवमाशांच्या समूहांमधील संवेदन विस्कळीत होते. तसेच शिकारीमुळे विसाव्या शतकात देवमाशांच्या अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. घटत चाललेल्या संख्येशी जुळवून घेण्यासाठी देवमाशांच्या प्रजातींमध्ये हा बदल घडून आल्याचे सागरी जीवशास्त्रज्ञ मानतात.
देवमाशाचा मेंदू प्रगत असून तो विविध प्रकारची क्लिष्ट माहिती ग्रहण करण्यास सक्षम असतो. ग्रहण केलेल्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देवमासे अवस्वनिक ध्वनीचा उपयोग करतात. हे अवस्वनिक ध्वनी केवळ संवादाचे माध्यम नसून कलात्मक अभिव्यक्तीसाठी देखील वापरले जाते यासंबंधी संशोधन सुरू आहे.
हत्ती व देवमासे यांखेरीज सुमात्रन गेंडे, मोर, सुसरीच्या काही प्रजाती व बेलुगा देवमासे यांमधील अवस्वनिक ध्वनी संप्रेषणाचा अभ्यास सुरू आहे.
पक्षी अवस्वनिक ध्वनी निर्माण करू शकत नाहीत. परंतु, अवस्वनिक ध्वनिलहरी टिपण्याची क्षमता पक्ष्यांच्या अनेक प्रजातींमध्ये आढळते. कबुतरे ०.५ हर्ट्झ इतक्या कमी कंपनक्षमतेचे ध्वनी ग्रहण करू शकतात. परिसरातील अवस्वनिक ध्वनिलहरींचा वापर करून कबुतरे मार्गनिर्देशन करतात. हवेतील प्रवाह, वाऱ्याची दिशा व जोर, आजूबाजूच्या मोठ्या वास्तूंबद्दलची माहिती त्यांना या ध्वनींद्वारे मिळवता येते. कबुतराच्या अंतर्कर्णामधील विशिष्ट चेतातंतू अवस्वनिक लहरी ग्रहण करण्यासाठी मदत करतात. पक्ष्यांच्या इतर प्रजातींमध्ये देखील ही क्षमता आढळते; परंतु, त्याबद्दल फारसे संशोधन झालेले नाही.
पहा : देवमासा, हत्ती, स्वनातीत संप्रेषण.
- संदर्भ:
https://www.britannica.com/science/animal-communication - https://www.elephantlisteningproject.org/all-about-infrasound/
- https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S156973391070014X
- https://sofiasounds.weebly.com/ultrasonic-sound-and-infrasonic-sound.html
समीक्षक : प्रमोद जोगळेकर