ध्वनीचा एक आविष्कार. ठराविक दोन बिंदूंजवळ उभे राहून एका बिंदूजवळ कुजबुजले असता दुसऱ्या बिंदूजवळ स्पष्ट ऐकू येईल असा ध्वनिकीय गुणधर्म असणारा विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) किंवा गोलाकार घुमट वा सज्जा. उपरनिर्दिष्ट दोन बिंदू सोडल्यास अन्यत्र हे बोलणे ऐकू येत नाही. विजापूरचा गोलघुमट, वॉशिंग्टन येथील कॅपिटॉल इमारत, सेंट पॉल कॅथीड्रल (St Paul’s Cathedral) व ग्लोस्टर कॅथीड्रल या इमारतींत कुजबुजणारे सज्जे आहेत. विवृत्ताकार खोलीत विवृत्ताच्या एका केंद्राजवळ मनुष्य उभा राहून कुजबुजला असता, दुसऱ्या केंद्राजवळ उभ्या असलेल्या मनुष्यास पहिल्याचे बोलणे स्पष्ट ऐकू येते. इतरत्र एवढ्याच अंतरावर त्याच खोलीत हे बोलणे ऐकू येणार नाही.

सेंट पॉल कॅथीड्रल येथे भिंतीजवळ बोलले असता घुमटाच्या भिंतीजवळ असणाऱ्या सर्वांनाच हे बोलणे ऐकू जाते. लॉर्ड रॅली यांनी हा आविष्कार ध्वनीच्या गुणीत (एकामागून एक होणाऱ्या अनेक) परावर्तनामुळे घडतो असे सांगितले; परंतु सदर्लंड व सी.व्ही. रामन यांनी केलेल्या प्रयोगांवरून ही क्रिया यापेक्षा जटिल असावी असे दिसते.

कळीचे शब्द : #विजापूरचागोलघुमट #कॅपिटॉलइमारत #सेंटपॉलकॅथीड्रल #ग्लोस्टरकॅथीड्रल #लॉर्डरॅली

समीक्षक : माधव राजवाडे