(संवेद). सर्व सजीवांमध्ये परिसरातून विशिष्ट माहिती जमवणे आणि त्याला प्रतिसाद देणे यासाठी ‘संवेदन’ ही महत्त्वाची जैविक पद्धती आहे. बहुधा हा प्रतिसाद उद्दीपकाच्या स्वरूपात असतो. उदा., मानवी मेंदू भोवतालच्या परिसरामधून सतत माहितीस्वरूपात संवेद गोळा करत असतो. या संवेदांचे विश्लेषण करून त्याला रासायनिक किंवा भौतिक पद्धतीने प्रतिसाद दिला जातो. दृष्टी (प्रकाश), गंध, स्पर्श, ध्वनी आणि रुची या पाच संवेद ज्ञानेंद्रियांकडून मानवी शरीर संवेदने ग्रहण करते. इतर सजीवांमध्ये असाच प्रकार असावा असे समजून एक, दोन, तीन, चार आणि पाच संवेद इंद्रिये असणाऱ्या सजीवांचे वर्गीकरण देखील केले गेले. तथापि, गेल्या शंभर वर्षांत याहून अधिक संवेद ग्रहणाचे मार्ग आहेत हे सिद्ध झाले आहे. मानवेतर सजीवांतील संवेद ग्रहण विविध प्रकारे होते. संवेद मिळवताना ते सजीवाच्या चेता संस्थेस समजण्याच्या पद्धतीचे असावेत याची काळजी घेतली जाते. या पद्धतीस ‘संवेद पारगमन’ (Sense Transduction) असे म्हणतात. संवेदन आणि बोधन (Perception) या क्रिया सजीवाच्या आकलन, वर्तन आणि विचार या प्रक्रियेचा भाग आहेत. केवळ मनुष्य प्राणी विचार करतो, इतर सजीव विचार करीत नाहीत, हे मानवाने गृहीत धरलेले आहे.
सजीवामध्ये ज्ञान संवेदक (ज्ञानेंद्रिय) हे परस्परसंबंधी संवेदी पेशी समूह असून ते विशिष्ट भौतिक प्रेरणेस प्रतिसाद देतात. कर्पार आणि परिघीय चेताद्वारे संवेद मेंदूकडे वाहून नेले जातात. विविध प्रकारच्या ग्राही पेशींचे [उदा., स्पर्शग्राही (Mechanoreceptor), प्रकाशग्राही (Photoreceptor), रसायनग्राही (Chemoreceptor), तापग्राही (Thermoreceptor)] संवेदी पेशीसमूह ज्ञानसंवेदक माहिती मेंदूकडे पोहोचवतात. मेंदूतील संवेदी केंद्रात माहितीचे विश्लेषण आणि बोधन होते.
बाह्य आणि अंतर्गत इंद्रिये अशा दोन प्रकारांत संवेदन इंद्रिये विभागली जातात. डोळे, कान, त्वचा, नाक आणि तोंड ही मानवी बाह्य संवेदन इंद्रिये आहेत; तर, आंतरकर्ण (तोल सांभाळणे) आणि शरीराची आंतरस्थिती सुधारक व वेदना इंद्रिये ही अंतर्गत संवेदन इंद्रिये आहेत. यांशिवाय सहज न उमगणारे संवेदक हे तहान, भूक, गुदमरणे (ऑक्सिजन पातळी अपुरी किंवा कार्बन डाय-ऑक्साईड पातळी वाढणे), मळमळणे किंवा उलटी यांसारख्या अनैच्छिक क्रिया यांच्या संवेदनाचे कार्य करतात. काही सजीवांमध्ये विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्र, हवेतील बाष्प तसेच ध्रुवीत प्रकाश (Polarized light) इ. ओळखण्यासाठीचे संवेदक असल्याचे आढळले आहे. पर्यायी संवेदकांमध्ये प्रतिध्वनी स्थाननिश्चिती, संवेदी पद्धती किंवा उपपद्धती विकसित झाल्या आहेत. बहुसंवेद पद्धतीत विविध संवेदांचा एकीकृत अनुभव असतो. उदा., एका संवेदापासून मिळालेली माहिती दुसऱ्या संबंधित संवेदासाठी वापरता येते. थोडक्यात, चेताविज्ञान जीवशास्त्र, बोधन मानसविज्ञान आणि बोधनविज्ञान ही क्षेत्रे परस्परांशी निगडीत आहेत. सर्वसाधारणपणे संवेदनांचे पुढील प्रकार पडतात.
(१) ध्वनिसंवेदन : हे तीन गटांमध्ये विभागले गेले आहे. मानवी कानाची ध्वनिग्रहण क्षमता २०–२०,००० हर्टझ इतकी आहे. हत्तीला २० हर्टझपेक्षा कमी कंपन क्षमतेचा ध्वनी काढता व ग्रहण करता येतो. कुत्रा आणि मांजर मानवी ध्वनिक्षमतेबरोबरच २०,०००–४०,००० हर्टझ कंपन क्षमतेच्या ध्वनीस प्रतिसाद देतात. वटवाघूळ आणि डॉल्फिन यांची ध्वनिग्रहण क्षमता १,६०,००० हर्टझ एवढ्या क्षमतेचे आवाज ऐकण्यासाठी विकसित झाली आहे.
(२) प्रकाश संवेदन : हे मानवी दृष्टी संवेदावरून ओळखता येते. मानवी दृष्टी ३८०–७५० नॅनोमीटर (नॅमी.) तरंगलांबीच्या वर्णपटास (तांबडा ते जांभळा रंग) प्रतिसाद देते. मानवी डोळ्याला तांबडा, निळा आणि पिवळ्या रंगाच्या प्रकाशात उत्तम दिसते; परंतु, मधमाशा, फुलपाखरू, रेनडियर, विंचू व कोळी या सजीवांना दिसण्यासाठी अतिनील किरणांची आवश्यकता असते किंवा त्यांची दृष्टी अतिनील किरणांच्या वर्णपटात अधिक कार्यक्षम असते.
(३) रुची संवेदन : याला स्वादन (Gustation) संवेदन असेही म्हणतात. अन्नग्रहण ज्या अवयवांमार्फत होते, त्यानुसार त्याचे ग्राही असतात. सस्तन प्राण्यांमध्ये जीभ, मधमाशीमध्ये स्पृशा व पाय, तर ऑक्टोपसच्या चूषकांवर स्वादन संवेदक असतात. स्वादन व गंध संवेदक परस्परांच्या सहकार्याने चव आणि गंध ओळखतात.
(४) गंध संवेदन : स्वादन संवेदनाप्रमाणे रासायनिक संवेदनाचा हा थोडा वेगळा प्रकार आहे. कीटक, काही गोड्या किंवा सागरी पाण्यातील जलचर, काही पक्षी, सस्तन प्राण्यांपैकी अनेक सजीव गंध संवेदावरून खाद्य, स्वजातीय तसेच शत्रू यांना ओळखतात. नर आणि मादी परस्परांना गंध संवेदनामुळेच ओळखू शकतात. जेथे प्राण्यांची घनता अधिक असते, तेथे सजातीय नर किंवा मादी एकत्र येणे हे केवळ गंध संवेदामुळे शक्य होते; उदा., कामगंध (Pheromones). नर सस्तन प्राणी कामगंधामुळे आपल्या कळपातील सजीवांवर नियंत्रण मिळवतो. हरिणांमध्ये डोळ्याखाली असलेल्या ग्रंथीच्या स्रावातील गंधामुळे त्यांना उघड्या मैदानात आपल्या कुटुंबाच्या स्थानाची निश्चिती शक्य होते. वाघ आपल्या परिसरातील झाडांवर मूत्रविसर्जन करून खुणा ठेवतो. त्यामुळे त्या परिसरात आलेल्या नरास मूत्रातील गंधामुळे तेथे दुसरा वाघ असल्याची खूण समजते.
(५) उष्ण, शीत आणि स्पर्श यांचे संवेदन : स्वत:चे आस्तित्व टिकवून ठेवणे आणि परिसराबरोबर जुळवून घेणे यासाठी प्रत्येक सजीवातील उष्ण, शीत आणि स्पर्श ही संवेदने अत्यावश्यक आहेत. एखाद्या उबदार दिवशी उघड्या पायांनी घरातून बाहेर पडले असता बाहेर असलेल्या सूर्यप्रकाशाची ऊब उघड्या त्वचेतून समजते. पायांना गवताचा स्पर्श समजतो. पाऊल बदलले म्हणजे हा स्पर्श हवाहवासा वाटत राहतो. ऊब, स्पर्श आणि हालचाल यांची जाणीव क्षणाक्षणाला होते. सतराव्या शतकामध्ये तत्त्ववेत्ता रेने देकार्त यांनी त्वचा आणि मेंदू हे चेतांच्या साहाय्याने परस्परांच्या संपर्कात असतात, हे सिद्ध केले होते. परंतु, संवेदी चेता हे संदेश मेंदूकडे नेतात याचा वैज्ञानिक पुरावा जोसेफ एर्लांगर (Joseph Erlanger) आणि हर्बर्ट ग्रासर (Herbert Grasser) यांनी १९४४ मध्ये दिला. याबद्दल त्यांना वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी विविध प्रकारचे वेदना आणि वेदनारहित संवेद वेगवेगळे असून बोटाच्या टोकाशी असलेल्या संवेदाच्या साहाय्याने हे ओळखता येतात, हे सिद्ध केले. याच्याशी संबंधित असलेल्या TRPV1, TRPV8 आणि पायझो (Piezo) या वाहिन्यांच्या शोधाबद्दल २०२१ मध्ये डेव्हिड ज्यूलियस (David Julius) आणि अर्डेम पटापौटियन (Ardem Patapoutian) या वैज्ञानिकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेदना आणि स्पर्शज्ञानाच्या शोधामुळे वेदना व स्पर्श जाणीव यांबद्दलच्या माहितीमध्ये मोलाची भर पडली आहे.
पहा : अवस्वनिक ध्वनी संप्रेषण; गंध संवेद; संवेदनग्राही.
संदर्भ :
- The Five (and More) Senses | Live Science
- http://www.cochlea.org/en/hear/human-auditory-range
- https://www.beeculture.com/bees-see-matters/
- https://www.encyclopedia.com/science-and-technology/chemistry/chemistry-general/chemoreception
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/2021/summary/
- https://ui.adsabs.harvard.edu/abs/2012Sci…336.1054W/abstract
समीक्षक : प्रमोद जोगळेकर