अल्पकालिक संवेदन स्मृतीचा प्रकार. ही स्मृती सर्व प्रकारच्या ध्वनींची नोंद करते. जसे की भाषण, कुत्र्याचे भुंकणे आणि आपत्कालीन वाहनांचे आवाज. डार्विन, टरवी, आणि क्रौडर (१९७२) यांनी ही स्मृती स्पष्ट करण्याकरिता स्पर्लिंगच्या (१९६०) प्रयोगांची पुनर्मांडणी केली. या प्रयोगामध्ये एका पडद्यावर (Screen) तीन वेगवेगळ्या रंगांचे दिवे प्रयुक्तांना दाखविले. श्रवणटोपाच्या (हेडफोन) माध्यमातून प्रयुक्तांना तीन क्रमांमध्ये (डावे, मध्य, उजवे) अक्षरांच्या ओळी ऐकवण्यात आल्या. प्रत्येक रंगाचा दिवा एका श्रवणीय अक्षरांच्या ओळीशी निगडित करण्यात आला होता आणि त्याप्रमाणे प्रयुक्तांना प्रतिक्रिया देण्याची सूचना दिली होती. या प्रयोगातदेखील ‘संपूर्ण अहवाल पद्धत’ व आंशिक अहवाल पद्धत’ यांचा वापर केला गेला.

या प्रयोगांचे निष्कर्षदेखील प्रतिमा संवेदनिक अल्पकालिक स्मृतीच्या प्रयोगांसारखेच होते. यांमध्ये आंशिक-अहवाल पद्धत वापरल्यास प्रयुक्तांनी सूचित केलेल्या श्रवणीय क्रमांमधील अधिक प्रमाणांमध्ये अंक अणि अक्षरे सांगितली. एका ओळींमधील साधारण ५ अक्षरे प्रयुक्तांनी बरोबर सांगितली. संशोधकांनी यावरून श्रवणविषयक अल्पकालिक स्मृतीची क्षमता ५ अल्पांश अशी ठरवली; परंतु या स्मृतीची लौकिक क्षमता साधारण २० सेंकद मानली जाते.

प्रत्यय परिणामांचे एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण या श्राव्य संवेदनिक स्मृतीच्या मदतीने दर्शवता येते. उदा., कल्पना करा की, आपण एका स्मृतिप्रयोगात सहभागी आहात आणि यादृच्छिक अंक, अक्षरे, किंवा सारख्या गोष्टी आपल्याला सादर केल्या आहेत. जर तुम्हाला ही अंकांची किंवा अक्षरांची सूची ऐकवली गेली आणि शेवटी एक श्रवण सूचना ऐकवली गेली. ही सूचना ऐकल्याबरोबरच तुम्ही सूचीमधील अंक, अक्षरे जसेच्यातसे परत बोलून दाखवायचे. या सूचनेमुळे सूचीतील शेवटच्या काही वस्तूंच्या पुनरावृत्तीवर गंभीररीत्या परिणाम होतो. शोधकांना असे वाटते की ऐकू येणारी सूचना श्रवणविषयक मुखवट्याचे काम करते. जेव्हा ती सूचना (प्रत्यय) एखाद्या अविरत ध्वनीचे किंवा दृश्यमान पद्धतीचे रूप घेते, तेव्हा त्याचा परिणाम स्मृतिक्षमतेवर जाणवत नाही.

समीक्षक : मनीषा पोळ