जॉन्सन, सायमन (Johnson, Simon) ꞉ (१६ जानेवारी १९६३). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि २०२४ च्या नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. त्यांचा जन्म युनायटेड किंगडम मधील शेफील्ड येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण रोसेस्टर येथे घेतले असून १९८४ मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. नंतर १९८६ मध्ये मँचेस्टर विश्वविद्यालयातून त्याच विषयातून पदव्युत्तर पदवी आणि १९८९ मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विश्वविद्यालयातून पीएच. डी. ही पदवी प्राप्त केली. त्यांनी तेथेच प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या शोधनिर्मिती आणि ज्ञानाचा मुख्य भाग जागतिक अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर केंद्रित आहे. त्यांना डेरेन असिमोग्लू आणि जेम्स रोबिन्सन या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांसोबत नोबेल पुरस्कार मिळला असून डेरेन असिमोग्लू आणि सायमन जॉन्सन हे अमेरिकेतील एमआयटी या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत; तर जेम्स रोबिन्सन हे शिकागो विद्यापीठात कार्यरत आहेत (२०२५).

आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत राजकीय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग आणि भूमिका या क्षेत्रांत मूलभूत संशोधन करून त्याचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास जगासमोर मांडण्याचे काम सायमन यांनी केले आहे. विविध देशांतील आर्थिक प्रगतीमधील वैधर्म्य आणि त्याची कारणे तपासून त्याबद्दलची आपली समज वाढविण्याचे काम या तीन अर्थतज्ज्ञांनी केले, असे निरीक्षण नोबेल समितीने मांडले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होत असताना विविध प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या देशांमध्ये कायद्याची बाजू कमकुवत असते आणि सामाजिक संस्था या समाजाचे शोषण करतात, त्या देशांची प्रगती खुंटते असे निरीक्षण सायमन यांच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यांच्या अभ्यासातून अर्थशास्त्राच्या अध्ययनाची आणि संशोधनाची ऐतिहासिक पद्धत आणि संस्थात्मक अर्थशास्त्राच्या (इन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक्स) तत्त्वांना बरोबर घेऊन या दोन्हींची सांगड घालण्याचे एक नवे तंत्र विकसित होताना दिसत आहे.

सायमन हे एक प्रसिद्ध संशोधक असून त्यांनी  जागतिक अर्थव्यवस्थेतील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर खोलवर अभ्यास केला आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आर्थिक धोरणे, जागतिक विकास, तसेच सरकारे आणि कंपन्यांमधील संबंध हा आहे. त्यांच्या संशोधन कार्याची सुरुवात १९९० च्या दशकात होऊन ते खूप लवकरच एक प्रमुख अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले गेले. ते २०२७-०८ मध्ये आंतरराष्ट्रीय चलन निधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ व संशोधन विभागाचे संचालक होते, तर जागतिक बँकेत त्यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले. त्यांनी २००८ च्या जागतिक अरिष्टाच्या संदर्भात केलेले ‘ग्रेट रिसेशन’ हे विश्लेषण खूप गाजले होते. त्यांना २०१३ मध्ये इंडिपेंडन्टकम्युनिटी बँकर्स ऑफ अमेरिकेद्वारा मेन स्ट्रिट हिरो म्हणून गौरविण्यात आले. ते सीएफए इन्स्टिट्यूट सिस्टेमिक रिस्क काउन्सिल या संस्थेचे सह-अध्यक्ष आहेत.

सायमन यांचे संशोधन मुख्यतः जागतिक अर्थव्यवस्थेतील पिढीजात असलेल्या असमानता आणि सत्ता  यांच्या संबंधावर आधारित आहे. त्यांनी आजच्या काळात वैश्विक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचार केला आहे. त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी पुढील काही प्रमुख मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे :

  • उद्योग आणि सरकार यांचे परस्परसंबंध : सरकार व उद्योगक्षेत्र यांमधील नाते कसे बदलते आणि त्याचा समाजावर कसा परिणाम होतो, हा सायमन यांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठ्या कंपन्यांचा सरकारवर प्रभाव कसा वाढत जातो, तो समाजातील आर्थिक असमानता निर्माण करण्यास कसा कारणीभूत ठरतो आणि जागतिक वित्तीय संकटातदेखील या घटकांचा प्रभाव कसा पडत असतो हे त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले आहे.
  • अर्थव्यवस्थेतील असमानता आणि विकास : सायमन यांनी जगभरातील आर्थिक असमानतेवर आपले विचार मांडले आहेत. विकासाच्या मार्गात विषमता एक मोठा अडथळा ठरते. पन्नास वर्षांपूर्वी (१९८० च्या दशकापूर्वी) ज्या प्रकारे विकासाची प्रक्रिया घडत होती, एकविसाव्या शतकात ती आता मुळात अनियमित झाली आहे. सर्व समाजात समानता येण्यासाठी आर्थिक असमानता आणि जागतिक आर्थिक धोरणे यांचा परस्परसंबंध त्यांनी समजून घेऊन मांडला.
  • कृषी आणि उत्पादन क्षेत्राच्या समस्यांवर लक्ष : सायमन यांनी कृषी आणि उत्पादन क्षेत्राच्या समस्यांवरही विचार केला असून जागतिक स्तरावर आपल्याला उत्पन्नाचे योग्य वितरण आणि कृषी क्षेत्रातील धोरणांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणतात.
  • नवीन तंत्रज्ञान आणि जागतिक अर्थव्यवस्था : तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडले आहेत व अजूनही घडत आहेत. डिजिटल तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांमुळे असमानता आणखी वाढली असून शासन संस्थेने तंत्रज्ञानाच्या अतिवापरावर नियंत्रण ठेवून सर्वसमावेशक विकासावर भर द्यावा, असे मत सायमन यांनी मांडले आहे.

सायमन यांनी जागतिक आर्थिक संकटांचे केलेले विश्लेषण ‘असमानता आणि सरकार-उद्योग संबंध’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयांत खूप उपयुक्त असून विकसनशील देशांच्या संदर्भात ते अधिकच मोलाचे ठरते. त्यांच्या संशोधनामुळे अनेक देशांना आर्थिक धोरणांच्या दृष्टीकोनातून आर्थिक समतोल साधण्याचे मार्ग मिळाले आहेत.

सायमन यांचे योगदान केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही, तर जागतिक आर्थिक धोरणांमध्येदेखील महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या कार्याचा खूप मोठा प्रभाव जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नोणे निधी (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड – आयएमएफ) आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांच्या धोरणांवर झाला आहे. त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित केली आहेत. जागतिक आर्थिक संकटांवरील त्यांचे विश्लेषण, तसेच सरकार-व्यवसाय यांचे नाते आणि त्यांचे परिणाम यांवर आधारित विचार त्यांनी आपल्या लेखनकार्यातून मांडले आहेत. त्यांनी २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीचे आणि बँकिंग क्षेत्रातील विषमतांचे सखोल विश्लेषण केले आहे. तसेच अमेरिकेची राष्ट्रीय कर्जाच्या बाबतीत आर्थिक धोरणे आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम सांगितले आहेत.

सायमन यांची काही प्रसिद्ध पुस्तके पुढील प्रमाणे : रेडी-मेड ॲक्टिव्हिटीज फॉर कस्टमर केअर स्किल, १९९४; स्टार्टिंग ओवर इन इस्टर्न यूरोप, १९९५; किप युअर किड्स सेफ ऑन द इंटरनेट, २००४;  स्टडी ऑफ चायनिज अल्केली, २००९; १३ बँक्रस, २०१०; द वर्ल्ड आफ्टर द फायनॅन्शिअल क्रायसिज, २०११; व्हाईट हाउस बर्निंग, २०१२; व्हेन गॉड मनी गोज बॅड, २०१२; जंप-स्टार्टिंग अमेरिका, २०१९; पावर अँड प्रोग्रेस, २०२३ इत्यादी.

संदर्भ :

  • Finance and Society, UK, 2019.
  • Journal of Economic Perspectives, 2016.
  • World Bank Economic Review, 2017.

समीक्षक ꞉ अविनाश कुलकर्णी