कांटोरोव्ह्यिच, लिओनीद व्ही. : (१९ जानेवारी १९१२ – ७ एप्रिल १९८६). सुप्रसिद्ध रशियन गणिती, अर्थतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. संसाधनांच्या वाजवी वापरासंबंधी विकसित केलेली तंत्रे व सिद्धांताबद्दल डच-अमेरिकन अर्थतज्ज्ञ यालिंग चार्ल्स कूपमान्स (Tjalling Charles Koopmans) यांच्याबरोबरीने १९७६ मध्ये अर्थशास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. अर्थशास्त्राचे नोबेल मिळविणारे ते पहिलेच रशियन संशोधक-प्राध्यापक होय.
कांटोरोव्ह्यिच यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्झबर्ग येथे रशियन ज्यू कुटूंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध डॉक्टर होते. लिओनीद यांनी १९२६ मध्ये लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. तेथून त्यांनी १९३० मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी गणित विषयात पीएच.डी. पदवी मिळविली आणि त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. तेथे १९३४ ते १९६० या काळात अर्थशास्त्र व गणित या विषयांचे अध्यापन केले. दरम्यान १९३५ मध्ये विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्सʼ ही पदवी प्रदान केली. १९६१ ते १९७१ या काळात त्यांनी यू.एस.एस.आर. अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सायबेरियन शाखेत गणित आणि अर्थशास्त्र विभागाचे नेतृत्व केले. १९६४ मध्ये त्यांनी प्रतिष्ठित मानली जाणारी सोव्हिएत संघाच्या अकॅडमी ऑफ सायन्सेसची निवडणूक जिंकली. त्यानंतर १९७१ ते १९७६ या काळात मॉस्कोतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इकॉनॉमिक प्लॅनिंगʼ या संस्थेच्या संशोधन-प्रयोगशाळेचे विभाग प्रमुख पदावर त्यांनी काम केले.
कांटोरोव्ह्यिच यांनी रशियन सरकारसाठीही काम केले. १९३८ मध्ये तेथील प्लायवूड ट्रस्ट संस्थेच्या सोव्हियत प्रयोगशाळेत प्लायवूड उद्योगातील उत्पादन वाढावे यासाठी साधनसामग्रीचा जास्तीत जास्त विनियोग कसा करता येईल, याबाबतची त्यांना कामगिरी सोपविण्यात आली तसेच ते संस्थेचे सल्लागारही होते. आर्थिक मर्यादा, उपलब्ध कच्चा माल व साधनसामग्रीचा यथायोग्य वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी व तत्सम आर्थिक नियोजनासाठी वापरता येऊ शकेल असे रेखीय कार्यक्रमण (Linear Programming) हे गणिती तंत्र त्यांनी १९३९ मध्ये विकसित केले. देशांतर्गत उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा जास्तीत जास्त लाभ व्हावा तसेच सेवांची निर्मिती करण्यासाठी वाजवी पद्धतीने वापरणे कसे शक्य आहे, याबाबतचे पायाभूत संशोधन त्यांनी केले. कोणत्या वस्तू व सेवांचे किती प्रमाणात, कोणत्या पद्धतीने उत्पादन करावे, उत्पादनापैकी सध्या किती उत्पादन सेवनासाठी वापरावे आणि भविष्यासाठी किती राखून ठेवावे अशा प्रश्नांची सोडवणूक त्यामुळे शक्य झाली. सुनियोजित अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीसंबंधीचे निर्णय बरोबर व्हावेत यासाठी किमतीविषयक विवेकी (Rational) धोरण व समान व्याजदरामुळे विकेंद्रित निर्णयप्रक्रिया शक्य होते याबाबतचे विश्लेषण त्यांनी केले.
कांटोरोव्ह्यिच यांनी १९६०च्या दशकात रशियन अर्थव्यवस्थेचा विकास जास्तीत जास्त व्हावा याचा विशेषत्वाने अभ्यास केला. वाढती लोकसंख्या व तांत्रिक प्रगती व्यक्तींच्या व समाजाच्या सेवनकार्यावर प्रभाव टाकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुर्मिळ साधनसंपत्तीचा उच्चतम विनियोग व्हावा यासाठी त्यांनी विकसित केलेली अर्थमिती (Econometrics) पद्धत हे त्यांचे या क्षेत्रातील मोठे योगदान मानले जाते.
कांटोरोव्ह्यिच यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : ॲप्रॉक्झिमेट मेथड्स ऑफ हायर ॲनॅलिसिस (१९५८), दि बेस्ट यूज ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस (१९५९), मॅथॅमेटिकल मेथड्स ऑफ प्रॉडक्शन प्लॅनिंग ॲण्ड आर्गनायझेशन (१९६०), टेबल फॉर दि न्युमीरीकल सोल्यूशन ऑफ बॉन्डरी व्हॅल्यू प्रॉब्लेम्स (१९६३), एसेज इन ऑप्टीमल प्लॅनिंग (१९७६), प्रॉब्लेमस ऑफ अप्लिकेशन ऑफ मेथड्स इन इन्डस्ट्री (१९७६), फंक्शनल ॲनॅलिसिस इन नॉर्म स्पेसेस (१९७७), मॅथॅमेटिक्स इन इकॉनॉमिक्स (१९८९), दि प्राईस इंम्पिकेशन्स ऑफ ऑप्टीमल प्लॅनिंग (१९९०) इत्यादी.
कांटोरोव्ह्यिच यांना अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल पुढील मानसन्मान लाभले : स्टॅलीन पुरस्कार (१९४९), यू.एस.एस.आर. अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य (१९६४ ते १९७१), सोव्हियत शासनाचे लेनिन प्राइझ (१९६५), ऑर्डर ऑफ लेनिन (१९६७), ऑर्डर ऑफ दि पॅट्रिऑटिक वॉर इत्यादी.
कांटोरोव्ह्यिच यांचे मॉस्को, रशिया येथे निधन झाले.
समीक्षक – संतोष ग्या. गेडाम