श्रॉफ, गोविंददास मन्नुलाल (Shroff, Govinddas Munnulal) : (२४ जुलै १९११ – २१ नोव्हेंबर २००२). बिटिशांकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानामधील जनतेच्या मुक्तिलढ्याचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य) येथे झाला. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे मुख्याध्यापकांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी त्यांनी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे मॅट्रिकच्या परीक्षेत ते संस्थानात सर्वप्रथम आले. मद्रास विद्यापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन केले. कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन ते बी. एस्सी. (ऑनर्स) झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इ. स. १९३५ मध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले. पुढे गणित विषय घेऊन ते एम. एस्सी. झाले आणि नंतर इ. स. १९३६ मध्ये त्यांनी एलएल. बी. ही पदवी मिळवून काही काळ औरंगाबादच्या शासकीय विद्यालयात अध्यापन केले. याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवती ऊर्फ सत्याबेन या सुविद्य मुलीशी झाला (इ. स. १९३७). त्यांना डॉ. अजित, डॉ. संजीव व राजीव हे तीन मुलगे असून डॉ. उषा सुरीया या त्यांच्या स्नुषा होत.
काँग्रेससारख्या राजकीय संघटनेस परवानगी नसल्यामुळे जून १९३७ मध्ये परतूर येथे महाराष्ट्र परिषद या नावाने भरलेल्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनास ते उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्याशी त्यांचा तेथे परिचय झाला. सप्टेंबर १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसवर स्थापनेपूर्वीच बंदी आल्यामुळे सत्याग्रह आंदोलन करण्याचे ठरले. नोकरीचा राजीनामा देऊन सत्याग्रहींची नोंदणी करण्याचे काम त्यांनी केले. ‘वंदे मातरम्’ हे गीत शासकीय शाळा आणि वसतिगृहांत गाण्याला बंदी करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या संपाचे त्यांनी नेतृत्व केले. जानेवारी १९४१ मध्ये कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून डाव्या विचारांच्या सहकाऱ्यांबरोबर अटक होऊन बीदरच्या तुरुंगात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले (इ. स. १९४१-४२). ऑक्टोबर १९४२ मध्ये त्यांची सुटका झाली. स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक धोरण, कम्युनिस्टांबरोबरील सहकार्य व चळवळीचे स्वरूप यांबाबत झालेल्या मतभेदांमुळे स्टेट काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यांतील स्वामी रामानंद तीर्थांचे नेतृत्व मानणाऱ्या जहाल गटाचे ते नेते व तात्त्विक मार्गदर्शक होते. इ. स. १९४७-४८ मधील निर्णायक लढ्याचे मार्गदर्शन करणाऱ्या चार सदस्यीय कृती समितीचे ते सदस्य होते.
स्वतंत्र भारतातील काँग्रेस पक्षाच्या राजकीय स्वरूपाबद्दल निराशा वाटल्याने सहकाऱ्यांसह त्यांनी काँग्रेस संघटनेचा त्याग केला आणि लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स या लोकशाही समाजवाद मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटनेची त्यांनी स्थापना केली. पुढे त्यांनी कम्युनिस्टांसह डाव्या राजकीय पक्षांची पीपल्स डेमॉक्रॅटिक फ्रंट या आघाडीची स्थापना केली. हैदराबाद विधानसभेच्या निवडणुकीत लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्सच्या बहुतेक नेत्यांप्रमाणे त्यांना पराभव पतकरावा लागला. पुढे या पक्षाच्या विसर्जनानंतर पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यास वाहून घेतले. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
श्रॉफ यांनी मराठवाड्याच्या विकासप्रश्नांसाठी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. देशातील सर्व नागरिक साक्षर झाल्याशिवाय देशाची खरी प्रगती होणार नाही, या जाणीवेतून १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘प्रौढ साक्षरते’ला विशेष प्राधान्य देण्यात आले. यातूनच १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ची सुरुवात झाली. श्रॉफ यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शासनाने १९९२-९३ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झालेल्या साक्षरता अभियानाचे मानद अध्यक्षपद त्यांना दिले. अध्यक्ष या नात्याने त्यांनी केरळ राज्याप्रमाणे अभियान राबविण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता अभियानाच्या माध्यमातून सफाई कामगार, विटभट्टीवरील कामगार, शेतमजूर इत्यादी १५ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्व जाती-धर्मांतील गरीब लोकांना साक्षर बनविण्याचे ध्येय उराशी बाळगून ते पूर्णत्वास नेले. एवढेच नव्हे, तर त्यांनी कारागृहातील कैद्यांनाही शिक्षणाचे धडे दिलेत. यासाठी ते स्वत꞉ अनेक गावांना, खेड्यांना, शहरांतील विविध वार्ड, झोपडपट्ट्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन कौशल्यविकास शिबिरे व प्रशिक्षणे दिलीत. सेवाभावी कार्यकर्त्यांना संघटित करून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या. साक्षरता अभियानाच्या कार्याचे स्वरूप समजून घेऊन या कार्यास न्याय देऊ शकतील, असे शिक्षणप्रेमी आणि या कार्यात रस असणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती केली. तसेच आपल्या जिल्ह्यात मुस्लीम समाज मोठ्याप्रमाणात असल्यामुळे विशेषत꞉ मुस्लीम भगिनींना साक्षर करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र स्वयंसेविकांची नियुक्ती केली. त्यांनी साक्षरता अभियानातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश अगदी तळागाळापर्यंत पोहोचविला. त्यांनी आपल्या जीवनाचे अंतिम दशक साक्षरता अभियान कार्यासाठी समर्पित निष्ठेने झोकून देऊन सुमारे २ लाख ३० हजार निरक्षरांना साक्षर केले. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपेक्षा औरंगाबाद जिल्ह्याचे साक्षरता अभियान हे आगळेवेगळे झाले.
श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी व योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इत्यादी शिक्षणसंस्थांचे श्रॉफ हे एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. तसेच ते मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे संस्थापक आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाड्यासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले (१९७०). मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वे ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांच्या गतिशील व समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.
संदर्भ :
- चपळगावकर, नरेंद्र, कर्मयोगी संन्यासी, मुंबई, १९९९.
- न्यायाधीश, चंद्रकांत (संपा), साक्षरता अभियानातून शिक्षण कौशल्याचा ध्यास ꞉ पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, छत्रपती संभाजीनगर, २०२४.
- बोरीकर, दिनकर, गोविंदभाई श्रॉफ गौरवगंथ, औरंगाबाद, १९९२.
- भालेराव, अनंत, मांदियाळी, मुंबई, १९९४.
- भालेराव, अनंत, हैदराबादचा स्वातंत्र्यसंगाम आणि मराठवाडा, पुणे, १९८७.
समीक्षक ꞉ संतोष ग्या. शा. गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.