नर्मदा मॅन. भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचे मानवी जीवाश्म. भारतात अत्यंत कमी मानवी जीवाश्म मिळाले आहेत. हथनोरा, नेतांखेडी, गुर्ला, उमरिया, देवाकाचार, बुधनीघाट व धनाघाट या फक्त सात स्थळांवर मिळून अवघे १५ मानवी जीवाश्म उपलब्ध आहेत. हे संगळे नर्मदा नदीच्या खोऱ्यात असून त्यातील हथनोरा (जिल्हा सिहोर, मध्य प्रदेश) या ठिकाणी भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण या संस्थेतील संशोधक अररुण सोनकिया यांना १९८२ मध्ये कवटीच्या तुकड्याचा जीवाश्म सापडला. तथापि त्याला १९८४ मध्ये मान्यता मिळाली. हा जीवाश्म नर्मदा मानवाचा आहे, असे प्रतिपादन सोनकिया यांनी केले आहे. सोनकिया त्याचा समावेश इरेक्टस मानव जातीत करतात.

या जीवाश्मांचा भारतीयांखेरीज अमेरिकन, जर्मन व फ्रेंच संशोधकांनीही अभ्यास केला आहे. विख्यात अमेरिकन पुरामानवशास्त्रज्ञ केनेथ केनेडी (१९३०-२०१४) यांनी या जीवाश्माचे वर्गीकरण आद्य आधुनिक मानव (Archaic Homo sapeins) असे केले आहे. या जीवाश्मासाठी होमो नर्मदेन्सिस ही प्रजात किंवा होमो सेपियन्स नर्मदेन्सिस ही उप-प्रजात असेही वर्गीकरण काही संशोधक करतात. तथापि हा जीवाश्म कोणत्या प्रजातीचा आहे या बाबतीत संशोधकांमध्ये मतैक्य झालेले नाही. एकंदरीत बघता पेकिंग मानव (पेकिंग मॅन) अथवा जावा मानव (जावा मॅन) यांच्याप्रमाणे नर्मदा मानव ही संज्ञा पुरामानवशास्त्रात फारशी वापरली जात नाही.
संदर्भ :
- Kennedy, K.A.R., God-Apes and Fossil Men: Palaeoanthropology of South Asia, University of Michigan Press, Ann Arbor, 2000.
- Sankhyan, A. R. ‘Evolutionary Perspective on Narmada Hominin Fossils’, Advances in Anthropology, Vol. 10, pp. 235-258, 2020.
- Sonakia, A. & de Lumley H. ‘Narmada Homo erectus – A possible ancestor of the modern Indian’, Comptes Rendus Palevol, Vol. 5, Issues1-2, pp. 353-357, 2006.
- Sonakia, A. ‘Skull cap of an early man from the Narmada Valley alluvium (Pleistocene) of central Indi’, American Anthropologist, 87 (3), pp. 612–616, 1985.
चित्रसंदर्भ :
- हथनोरा (मध्य प्रदेश) येथे मिळालेला कवटीचा तुकडा. https://www.researchgate.net/figure/Lateral-view-of-Narmada-cranium-Photograph-courtesy-of-A-Sonakia_fig1_22613282
समीक्षक : सुषमा देव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.