आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्याजवळून वाहणारा हिंदी महासागरातील पृष्ठीय सागरी प्रवाह. दक्षिण गोलार्धात व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हिंदी महासागरात भोवऱ्यासारखे चक्राकार सागरी प्रवाह आढळतात. हा प्रवाह १०° द. ते २०° द. अक्षवृत्तांच्या दरम्यान आग्नेय व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावक्षेत्रात पूर्व-पश्चिम दिशेत जाणारा दक्षिण विषुववृत्तीय भागांत आढळतो. पश्चिमेस वाहत आल्यावर हा प्रवाह मादागास्कर बेटाच्या उत्तर भागात या बेटाला वळसा घालून दक्षिणेस वाहू लागतो. आफ्रिकेची मुख्य भूमी आणि मादागास्कर यांदरम्यानच्या मोझँबीक चॅनेलमधून मोझँबीक या नावाने हा प्रवाह दक्षिणेस वाहू लागतो. मोझँबीकच्या आग्नेय किनाऱ्यावरून दक्षिणेस मादागास्कर बेटाच्या नैर्ऋत्य भागापर्यंत वाहत आल्यानंतर पुढे त्या प्रवाहाला अगुल्हास या नावाने ओळखले जाते. अगुल्हास प्रवाह दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्याने नैर्ऋत्येस वाहत जातो आणि त्यानंतर तो पूर्वेकडे वळून आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे वाहत जाणाऱ्या अंटार्क्टिक परिध्रुवीय प्रवाहास मिळतो. अगुल्हास प्रवाहातील पाण्याचा अल्प भाग आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील ‘केप ऑफ गुड होप’ भूशिराला वळसा घालून अटलांटिक महासागरात वाहत गेलेला आढळतो. अगुल्हास प्रवाहाला मोझँबीक प्रवाहाकडून, तसेच मादागास्कर बेटाच्या पूर्वेकडून दक्षिणेस वाहत येणाऱ्या पूर्व मादागास्कर या प्रवाहांकडून पाणीपुरवठा होतो. अगुल्हास या सागरी प्रवाहाला दक्षिण हिंदी महासागरातील आणि दक्षिण गोलार्धातील प्रवाहांची पश्चिम सीमा मानली जाते.

अगुल्हास प्रवाहाची रुंदी केवळ १०० किमी. असून सरासरी वेग प्रती तास ०.५ ते १.४ किमी. असतो. त्याच्या वेगातील तफावत ही विषुववृत्तीय प्रवाहाच्या वेगातील तफावतीवर अवलंबून असते, तर विषुवृत्तीय प्रवाहाचा वेग त्याचे स्थान, खोली आणि ऋतू या घटकांनुसार बदलत असतो. अगुल्हास प्रवाह हा जगातील कोणत्याही महासागरातील सर्वाधिक वेगाने वाहणाऱ्या सागरी प्रवाहांपैकी एक असून त्याचा दक्षिण आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्यावरील अपतट सागरी भागात प्रती तास ९.३ किमी. इतका सर्वाधिक वेग आढळतो; कारण त्याला कमी अक्षवृत्तीय भागाकडून पाणीपुरवठा होतो. हा प्रवाह उबदार असून त्याच्यातील पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान १४° ते २६° सेल्सिअसच्या दरम्यान असते. दक्षिणेकडील भागात अंटार्क्टिकाजवळ प्रवाहातील पाण्याचे सरासरी तापमान कमी असते.

समीक्षक ꞉ शेख महंमद बाबर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.