उत्तर अटलांटिक महासागरातील द्वीपसमूह आणि पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश. क्षेत्रफळ २,३२२ चौ. किमी.; लोकसंख्या २,४२,७९६ (२०२४ अंदाजे). पोर्तुगालच्या मुख्य भूमीपासून पश्चिमेस सुमारे १,६०० किमी. अंतरावर ही बेटे आहेत. या बेटांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ३६° ५०’ उ. ते ३९° ४४’ उ. आणि २५° प. ते ३१° १६’ प. असा आहे. ही बेटे सामान्यपणे वायव्य-आग्नेय दिशेत पसरली असून त्यांचा विस्तार सुमारे ६०० किमी. पेक्षा अधिक परिसरात झालेला आहे. अझोर्स द्वीपसमूहात एकूण नऊ प्रमुख बेटे व अनेक लहान द्वीपके असून ती निसर्गत:च तीन गटांत विभागली गेली आहेत. त्यांपैकी आग्नेयीकडील गटात सेंट मायकेल व सेंट मेरी ही बेटे, मध्यवर्ती गटात तर्सेईरा, ग्रस्योझा, पीकू, फयाल व सेंट जॉर्ज, तर वायव्येकडील गटात कोर्व्हू व फ्लोरेस ही बेटे आहेत. यांतील सेंट मायकेल या सर्वांत मोठ्या बेटाचे क्षेत्रफळ ७५९ चौ. किमी. असून कोर्व्हू या सर्वांत लहान बेटाचे क्षेत्रफळ फक्त १७ चौ. किमी. आहे. सेंट मायकेल बेटावरील पाँता देल्गादा हे राजधानीचे ठिकाण, तसेच द्वीपसमूहातील सर्वांत मोठे शहर आहे.

अझोर्स बेटे ज्वालामुखीक्रियेने बनलेली असली, तरी काही बेटांवर वस्ती झाल्यापासून तेथे ज्वालामुखी क्रीया झालेल्या नाहीत. ही बेटे म्हणजे अटलांटिक महासागराच्या मध्य-अटलांटिक रिज या सागरी पर्वतरांगेच्या पाण्याबाहेर आलेल्या माथ्यांपैकी आहेत. किनाऱ्यालगतचा भाग उभ्या चढणीचा व दुर्गम आहे. किनाऱ्यापासून या बेटांची उंची एकदम वाढलेली आढळते. पीकू आल्टो (उंची २,३५१ मी.) हे येथील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. उत्तर अमेरिकन, यूरेशियन व आफ्रिकन या तीन भूपट्टांच्या कडा ज्या भागात एकत्र आलेल्या आहेत, त्याच भागात या बेटांचे स्थान असल्यामुळे भूशास्त्रीय दृष्ट्या हा भाग अस्थिर असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच येथे वारंवार भूकंप व ज्वालामुखी उद्रेक होत असतात. इ. स. १५२२ मध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात सेंट मायकेलची तत्कालीन राजधानी व्हीला फँका दो कांपो जमिनीत गाडली गेली होती. इ. स. १९२६ मध्येही भूकंपाचा धक्का जाणवला होता. १९५७-५८ मधील कॅपेलिन्होस ज्वालामुखी उद्रेकात व भूकंपात फयाल बेटाचा आकार वाढला होता. येथील अनेक बेटांवरील घरे प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून तयार केलेल्या ठोकळ्यांपासून बांधलेली आढळतात. बेटांवर ज्वालामुखी कुंडज्वालामुखी महाकुंड हे वैशिष्ट्यपूर्ण भूविशेष पाहायला मिळतात. सेंट मायकेल बेटावरील फर्नस सरोवराच्या किनाऱ्यावर अनुभवास येणारी ज्वालामुखीची उष्णता (धग) हे पर्यटकांचे लोकप्रिय सहल स्थळ असून, ती उष्णता अन्न शिजविण्यासाठीही पुरेशी होते. सर्व बेटे डोंगरकड्यांनी युक्त असून सेंट मेरी बेट सोडल्यास सर्वत्र लाव्हारसापासून बनलेल्या टेकड्या, उन्हाळे (औषधीयुक्त गरम पाण्याचे झरे), गायझर, सरोवरे इत्यादी आढळतात.

समशीतोष्ण कटिबंधीय व महासागरीय स्थान, जवळून वाहणारा ऊष्ण गल्फ प्रवाह यांमुळे अझोर्सचे हवामान समशीतोष्ण कटिबंधीय, परंतु सौम्य स्वरूपाचे असते. येथे उच्च आर्द्रता असली, तरी पावसाचे प्रमाण कमी असते. यूरोपीय आणि भूमध्यसागरी प्रकारचे समृद्ध वनस्पतीजीवन या भागात आढळते. तसेच अनेक बेटांवरील टेकड्यांच्या उतारावर मिश्र स्वरूपाची अरण्ये आढळतात. हिवाळ्यात वादळे होत असल्यामुळे नौकानयन धोक्याचे असते. शेती, पशुपालन, दुग्धशेती, मासेमारी व पर्यटन हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. या द्वीपसमूहावर फळबागांचे प्रमाण अधिक असून अननस, केळी, संत्री, सफरचंद, अंजीर, मेडलर, जर्दाळू, द्राक्षे या फळांची उत्पादने घेतली जातात. पीकू बेटावरील द्राक्षमळ्यांना तर यूनेस्कोने २००४ मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेला आहे. याशिवाय शेतीतून गहू, मका यांसारखी तृणधान्ये, भाजीपाला इत्यादी उत्पादने घेतली जातात. शेतीप्रमाणेच मासेमारी, दुग्धव्यवसाय, हस्तकला व भरतकाम हेही व्यवसाय येथे चालतात. सेंट जॉर्ज बेटावर उच्च दर्जाचे चीज तयार केले जाते. येथे विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ व वाइन उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सेंट मायकेल बेट हे यूरोपातील एकमेव प्रमुख चहा उत्पादक बेट असून तेथील परंपरागत चहा प्रक्रिया केंद्रे पाहण्यासाठी आवर्जून मोठ्या प्रमाणावर लोक येतात. सेंट मेरी बेटावर खुला व्यापार पट्टा निर्माण करण्यात आलेला आहे. सर्व बेटे सृष्टीसौंदर्याने नटलेली असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. येथील देवमासे पाहणे हे पर्यटकांचे फार मोठे आकर्षण असते. १९८४ पासून येथे देवमासा शिकारीवर बंदी आहे. येथे सीटेशनच्या जवळजवळ २० जाती आढळतात.

कोर्व्हू, सेंट मेरी व तर्सेईरा या बेटांवर सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांवरून पोर्तुगीजांनी येथे वस्ती करण्याच्या खूप आधीपासून येथे मानवी वस्ती असल्याचे स्पष्ट होते. चौदाव्या शतकापासून या बेटाचे अस्तित्व इटालियन नकाशावर दर्शविलेले दिसते. द्योगो द सिल्व्हस यांनी इ. स. १४२७ मध्ये यांचा शोध लावला. इ. स. १४३२ पासून पोर्तुगालने येथे वसाहत सुरू केली. फ्लेमिश लोकांनी शोधली या चुकीच्या बातमीमुळे काही काळ या बेटांना ‘फ्लेमिंग बेटे’ असेही संबोधले जात असे. इ. स. १५८० ते इ. स. १६४० दरम्यान ही बेटे स्पेनच्या ताब्यात होती. अझोर्सचे बहुतांश रहिवासी पोर्तुगीजांचे वारस असून ते प्रामुख्याने रोमन कॅथलिक पंथीय आहेत. पोर्तुगीज ही येथील अधिकृत भाषा आहे. लोकसंख्येची जास्त घनता, तसेच मर्यादित आर्थिक व रोजगाराच्या संधी यांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासूनच लोक मोठ्या प्रमाणावर परदेशी मुख्यत, संयुक्त संस्थाने व कॅनडाकडे जात आहेत. येथील सर्वाधिक लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सेवा व तृतीयक व्यवसायांत गुंतलेले आहेत. बेटे एकाकी असली, तरी वाहतूक व दळणवळण सुविधा चांगल्या प्रकारे विकसित केल्या गेल्या आहेत. प्रत्येक बेटावर विमानतळ किंवा धावपट्ट्या आहेत. यूरोप व उत्तर अमेरिका यांदरम्यान हवाई वाहतूक करणारी विमाने इंधन भरण्यासाठी येथील विमानतळावर थांबतात. अँग्रा दू ईरू-ईझ्मू (अँग्रा), पाँता देल्गादा व हॉर्ता ही प्रमुख सागरी बंदरे येथे आहेत. ही बेटे वेस्ट इंडीजच्या सागरी मार्गावर असल्यामुळे त्यांना पूर्वीपासूनच महत्त्व मिळाले आहे. यूरोप-अमेरिका यांना जोडणारी केबल या बेटांवरून जाते. लाझिश आणि सेंट मारिया येथे प्रमुख हवाई तळ असून दुसऱ्या महायुद्धकाळात ती संयुक्त संस्थाने व यूरोप यांदरम्यानच्या दळणवळणांसाठी महत्त्वाची होती. १९५१ मध्ये पोर्तुगालशी झालेल्या करारानुसार संयुक्त संस्थानांनी लाझीस येथे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) चा हवाई तळ कायम ठेवला आहे.

समीक्षक : शेख महंमद बाबर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.