अटलांटिक महासागराच्या जवळजवळ मध्यावर उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली जगातील सर्वाधिक लांबीची सागरी रिज (पर्वतरांग). अटलांटिक महासागरच्या सागरतळावर पसरलेली ही रिजप्रणाली पृथ्वीवरील सर्वांत मोठी भूशास्त्रीय रचना आहे. उत्तरेस ८७° उ. अक्षांशापासून (उत्तर ध्रुवापासून दक्षिणेस ३३३ किमी.) ते दक्षिणेस ५४° द. अक्षांशापर्यंत (बूव्हे बेटापर्यंत) या रिजचा बहुतेककरून सलग विस्तार झालेला आहे. म्हणजेच उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून ते दक्षिणेस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत तिचा विस्तार आढळतो. या रिजला मध्य-अटलांटिक महासागरी उंचवटा किंवा खंडीय उंचवटा म्हणूनही ओळखले जाते. या रिजची एकूण लांबी सुमारे १६,००० किमी. असून रुंदी १,००० ते १,६०० किमी. आहे. रिजची सागरतळापासूनची उंची सुमारे ३,००० मी. आहे. बहुतांश पर्वतरांग पाण्याखाली असून काही ठिकाणी वेगवेगळ्या बेटांच्या स्वरूपात ती समुद्रपातळीच्या वर आलेली दिसते. उदा., उत्तर अटलांटिकमधील आइसलँड बेट, अझोर्स द्वीपसमूह; दक्षिण अटलांटिकमधील असेन्शन बेट, सेंट हेलीना बेट, ट्रिस्टन द कूना द्वीपसमूह, बूव्हे बेट इत्यादी रांगांचे पाण्याबाहेर आलेले भाग आहेत. यातील बहुतेक बेटे ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेली आहेत. यूनेस्कोने या बेटांवरील अनेक भागांचा समावेश जागतिक वारसास्थळांत केलेला आहे.

भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार मानलेल्या वेगवेगळ्या भूपट्टांपैकी उत्तर अटलांटिकच्या पश्चिम भागातील उत्तर अमेरिकन भूपट्ट आणि पूर्व भागातील यूरेशियन भूपट्ट, तसेच दक्षिण अटलांटिकच्या पश्चिम भागातील दक्षिण अमेरिकन भूपट्ट व पूर्व भागातील आफ्रिकन भूपट्ट या भूपट्टांच्या सांध्याला अनुसरून त्यांच्या सीमारेषेवर या रिजचा विस्तार झालेला आहे. म्हणजेच या रिजमुळे उत्तर अटलांटिकमध्ये उत्तर अमेरिकन भूपट्ट यूरेशियन भूपट्टापासून वेगळे झाले आहे, तर दक्षिण अटलांटिकमध्ये दक्षिण अमेरिकन भूपट्ट आफ्रिकन भूपट्टापासून अलग झाले आहे.

शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार ही अतिशय मंदगतीने प्रसरण पावणारी पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेच्या माथ्यावर ८० ते १२० किमी. रुंदीची लांबच लांब खोल दरी किंवा खचदरी आहे. प्रत्यक्षात ही खचदरीच लगतच्या भूपट्टांची सीमारेषा आहे. ही खचदरी म्हणजे सागरतळ प्रसरित होणारा पट्टा असून तेथील प्रावरणातून वितळलेला लाव्हारस व लाव्हाजन्य पदार्थ सातत्याने तेथील सागरतळावर येऊन थंड होतात, तसेच ते रिजच्या कडांवरून बाहेर पसरतात. त्यांपासून नवीन भूकवच किंवा मृदावरण तयार होते. या घटनेमुळे मध्य-अटलांटिक रिजच्या दोन्ही काठांवरील द्रव्य मूळ रिजमधील द्रव्यापेक्षा तरुण असते. समुद्रतळाचे प्रसरण आणि मुख्य रिजपासून महासागरी तळ व खंडांची बाहेरच्या बाजूस सरकण्याची होणारी हालचाल यांमुळे अटलांटिक महासागराची द्रोणी रुंदच रुंद होत जात असल्याचे आढळते. या द्रोणीचा प्रसरण किंवा रुंद होण्याचा वेग प्रतिवर्षी साधारण २.५ सेंमी. इतका असतो. परिणामत: मध्य-अटलांटिक रिजला अनुसरून तिच्या सीमारेषेवर उत्तर अमेरिकन व यूरेशियन भूपट्ट एकमेकांपासून दूर जात आहेत. याचाच अर्थ अजूनही उत्तर अमेरिका आणि यूरोप ही खंडे एकमेकांपासून दूर जात आहेत. येथील सागरतळाच्या प्रसरण होण्याबरोबरच रिजच्या काही भागांवर भूकंप आणि ज्वालामुखींची क्षेत्रे निर्माण झालेली आढळतात.

विषुववृत्ताजवळ रोमान्शे फरो हा सागरी खंदक (खोली ७,७५८ मी.) आहे. या खंदकामुळे या रिजचे उत्तर अटलांटिक रिज व दक्षिण अटलांटिक रिज असे दोन भाग झाले आहेत. हा खंदक म्हणजे अटलांटिकमधील सर्वाधिक खोलीच्या भागांपैकी एक आहे; मात्र हा खंदक कोणत्याही भूपट्टांच्या सीमारेषेवर नाही. भूकंप व ज्वालामुखीच्या दृष्टीने मात्र ही खचदरी क्रियाशील आहे. मध्य-अटलांटिक रिजच्या दोन्ही बाजूंस सुमारे ४,००० ते ५,००० मी. खोलीचे अनेक खोलगट भाग आहेत.

मध्य-अटलांटिक रिजचे शास्त्रशुद्ध संशोधन तसेच तिची भूशास्त्रीय व जीवशास्त्रीय वैशिष्ट्ये यांचा अभ्यास व संशोधन अजूनही प्राथमिक पातळीवरच आहे. असे असले, तरी काही ठिकाणी आढळणारी क्रियाशील उष्णजलीय क्षेत्रे ही इतर मध्य-महासागरी रिज क्षेत्रांपेक्षा अधिक क्रियाशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या तळावर ही रिज असल्याचे अनुमान पहिल्यांदा इ. स. १८५३ मध्ये मॅथ्यू फाँटन माउरी यांनी संयुक्त संस्थानांच्या नौदलातील यूएसएस डॉल्फिन जहाजाच्या (ब्रिंग) माध्यमातून काढले. दक्षिण अटलांटिकमधील रिजचा शोध एचएमएस चॅलेंजर गलबताद्वारे काढलेल्या सफरीच्या माध्यमातून लागला (इ. स. १८७२). एकोणिसाव्या शतकातच यूरोप ते अमेरिका यांदरम्यान अटलांटिकमधून टेलिफोनची समुद्री तार टाकण्याच्या निमित्ताने तारेच्या मार्गाची स्थाननिश्चिती करण्यासाठी अभ्यास करत असताना शास्त्रज्ञांच्या गटाला अटलांटिकच्या मध्यात हा विस्तीर्ण खंडीय उंचवटा असल्याचे आढळले. या रिजच्या अस्तित्वाची खात्री इ. स. १९२५ मध्ये झाली.

समीक्षक : माधव चौंडे