इंडोनेशियातील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते मध्य जावा बेटावरील सोलो शहराच्या उत्तरेस सु. ५६ चौ. किमी. क्षेत्रावर पसरलेले आहे. मानवी तसेच विविध प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जीवाश्मांचा खजिना सापडल्यामुळे सांगिरान हे स्थळ समृद्ध पुरातत्त्वीय आणि पुरापर्यावरणाशी निगडित शोधांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सांस्कृतिक आणि मानवी उत्क्रांतीचे ठोस पुरावे आद्य प्लाइस्टोसीन काळापासून ते मध्य प्लाइस्टोसीनच्या शेवटच्या काळातील गाळांच्या स्तरांमधून मिळाले आहेत.
पुरामानवविज्ञानातील एक अग्रगण्य शास्त्रज्ञ जी. एच. आर. वॉन कोनिंगस्वाल्ड यांना १९३४ मध्ये नबुंग (Ngebung) गावात अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली आणि सांगिरान स्थळाचा शोध लागला. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर १९३६ मध्ये वॉन कोनिंगस्वाल्ड यांना मानवी जीवाश्म सापडला. त्यानंतर सांगिरान येथे मेगॅन्थ्रोपोस आणि पिथेकॅन्थ्रोपस इरेक्टस / इरेक्टस मानवाचे अनेक जीवाश्म सापडले. संख्यात्मकदृष्ट्या जगातील सर्व ज्ञात होमिनिड जीवाश्मांपैकी अर्धे (८० मानवांचे जीवाश्म) आणि इंडोनेशियातील ६५ % मानवी जीवाश्म सांगिरान येथे सापडले आहेत.

सांगिरान येथील गाळाची स्तररचना असे दाखविते की, येथील भूप्रदेश विविध भूप्रक्रियांमुळे तयार झालेले आहेत. सु. २४ लाख वर्षांपूर्वी सांगिरान येथे खोल समुद्राचे अस्तित्व होते. या काळात निळसर सागरी माती (bluish marine clay) आणि चिकणमाती युक्त (marl clay) अशी पुरेन संरचना (Puren Formation) तयार झाली. या नंतरच्या काळात (१८ लाख वर्ष) उथळ समुद्र आणि खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार होऊन सांगिरान/पुकान्ग संरचना (Sangiran/Pucanggan formation) तयार झाली. नवीन संशोधनानुसार १० लाख वर्षांपूर्वी उत्तर आणि पूर्व सांगिरान येथील समुद्र पातळी आजच्या समुद्र पातळीपेक्षा ४१.९ मीटरने खाली गेली होती. त्यामुळे या काळात समुद्र किनारपट्टी अंदाजे १०० किमीपर्यंत विस्तारली असावी. साधारण ९ लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे सांगिरानमध्ये १ ते ४ मी. जाडीचा चुनखडीचा कडक थर तयार झाला, ज्याला ग्रेंझबँक (Grenzbank) म्हणून ओळखले जाते. या काळात सांगिरान महाद्वीपीय भूप्रदेश बनले. या नंतरच्या काळात (८ लाख वर्ष) नद्यांनी आणलेल्या गाळापासून दोन संरचना तयार झाल्या ज्यास बापन्ग/काबुह संरचना आणि पोहजरजर/नोटोपुरो असे म्हणतात. या नदीच्या गाळाच्या स्तरात ज्वालामुखीय राख, प्युमिसचा थर आणि मातीच्या ज्वालामुखीय लाहार थर असे दिसतात. सांगिरान परिसरात प्लाइस्टोसीन काळापासून सक्रिय असलेले तीन ज्वालामुखी आहेत (दक्षिणेकडील लाऊ ज्वालामुखी आणि पश्चिमेकडील महरपी आणि मरबाबू ज्वालामुखी).
सांगिरानमध्ये मानवी जीवाश्म हे प्रामुख्याने सांगिरान/पुकँगन संरचनेच्या अगदी वरच्या थरापासून मिळतात. परंतु १० लाख वर्षांपूर्वीच्या बापन्ग संरचनेतून मोठ्या प्रमाणात मानवी जीवाश्म मिळाले आहेत. जावामध्ये सापडलेल्या मानवी जीवाश्मांच्या अभ्यासानुसार येथील इरेक्टस मानवाचे (होमो इरेक्टस) जीवाश्म उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून तीन प्रकारांत विभागले आहेत. त्यातील पहिल्या दोन प्रकारांतील इरेक्टस मानव सांगिरान येथे सापडले आहेत.
प्राचीन इरेक्टस मानव (Archaic Homo erectus) हा मजबूत बांध्याचा, मोठ्या आकाराचे दात असणारा आणि ८५० सी. सी. कपालक्षमता असणारा होता. हा मानव जावामध्ये १५ लाख ते १ लाख वर्षपूर्व या काळात अस्तित्वात होता. काही संशोधकांच्या मते ३ लाख वर्षपूर्व (२०२०) तर काहींच्या मते १८ लाख वर्षांपूर्वीपासून हा मानव जावामध्ये राहात होता (२०२२).

प्रातिनिधिक इरेक्टस मानव (Typical Homo erectus) हा प्राचीन इरेक्टस मानवापेक्षा प्रगत होता. १००० सी. सी. कपालक्षमता असणाऱ्या या मानवाची कवटी गोलाकार होती. छोट्या आकाराचे दात असणारा हा मानव ९ लाख ते ३ लाख वर्षपूर्व या काळात राहात होता.
प्रगत इरेक्टस मानव (Progressive Homo erectus) हा २ ते १ लाख वर्षांपूर्वीचा ११०० सी. सी. कपालक्षमतेचा मानव सांगिरानच्या आजूबाजूच्या पुरातत्त्वीय स्थळांवर मिळाला. कदाचित हा सर्वांत शेवटचा इरेक्टस मानव असावा, असा संशोधकांचा दावा आहे. यानंतर इरेक्टस मानव ही जाती नामशेष/लुप्त झाली असावी.
सांगिरानमध्ये आजतागायत मिळालेल्या प्राण्यांच्या जीवाश्मांची संख्या १३,००० हून अधिक आहे. याशिवाय येथे १०० पेक्षा जास्त अश्मीभूत शंख-शिंपले मिळाले आहेत. यांतील काही सागरी तर काही गोड्या पाण्यातील आहेत.
सांगिरान येथे ५ ठिकाणी दगडी हत्यारांचे समूह सापडले आहेत, त्यांपैकी दायू हत्यार समूहात सर्वांत जास्त २२० दगडी हत्यारे होती. ही हत्यारे पुकान्ग संरचनेच्या खालच्या स्तरातील ज्वालामुखीय राखयुक्त काळ्या मातीच्या नदीच्या गाळात मिळाली आहेत. या हत्यार समूहात प्रामुख्याने लहान आकाराचे छिलके, हातकुऱ्हाड, गाभे आणि तासण्यांचा समावेश आहे. लहान आकाराचे छिलके प्रत्येक स्तरातून मोठ्या प्रमाणात मिळाली असून या हत्यार समूहाला सांगिरान फ्लेक समूह (Sangiran Flake Industry) असे संबोधले आहे. ही दगडी हत्यारे आद्य अश्मयुगीन संस्कृतीची आहेत.
मोठ्या प्रमाणात इरेक्टस मानवाचे जीवाश्म, असंख्य प्राण्यांचे जीवाश्म आणि दगडी हत्यारे मिळाल्यामुळे १९९९ मध्ये सांगिरान या स्थळाला यूनेस्कोने (संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना) जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
संदर्भ :
- Husson, Laurent; Salles, Tristan; Lebatard, Anne-Elisabeth & others, ‘Javanese Homo erectus on the move in SE Asia circa 1.8 Ma’, Scientific Reports, 2022. https://www.nature.com/articles/s41598-022-23206-9
- Hyodoa Masayuki; Matsu’urac, Shuji; Kamishima, Yuko & others, 2011. ‘High-resolution record of the Matuyama–Brunhes transition constrains the age of Javanese Homo erectus in the Sangiran dome, Indonesia’, PNAS, 108 (49), 2011. https://www.pnas.org/doi/full/10.1073/pnas.1113106108
- Puspaningruma, Mika R.; Anwara, Iwan P.; Hertler, Christine; Hölzchen, Ericson & others, ‘Living in Sangiran: A spatial reconstruction of hominin environment in Java at 1 Ma’, Earth History and Biodiversity, Vol. 1, 2024. https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2950475924000017
- Shuji Matsu`ura & Others, ‘Age control of the first appearance datum for Javanese Homo erectus in the Sangiran area’, Science, Vol. 367, pp. 210-214, 2020. https://doi.org/10.1126/science.aau8556
समीक्षक: जयेंद्र जोगळेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.