भारतातील पुदुच्चेरी (पाँडिचेरी) या केंद्रशासित प्रदेशात असलेले एक प्रसिद्ध मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पुदुच्चेरी शहरापासून सहा किमी. अंतरावर अरियानकुप्पम नदीच्या मुखापाशी कक्कयानतोप्पू गावाजवळ आहे. अरिकामेडू या ठिकाणाचे पूर्वीचे स्थानिक नाव वीरपट्टणम असे आहे व अरिकामेडू या तमिळ शब्दाचा अर्थ ‘नदीकाठचे प्राचीन वसतीचे टेकाडʼ असा आहे. भारत व रोम यांच्यात व्यापारी संबंध भरात असताना ऐतिहासिक काळाच्या प्रारंभी अरिकामेडू हे पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाच्या बंदरांमधील एक होते. येथे झालेल्या उत्खननांमधून या बंदरातून आग्नेय आशियाशीही व्यापार चालत असल्याचे दिसून आले आहे.

रूलेटेड प्रकारच्या मातीच्या भांड्यांचे तुकडे, अरिकामेडू.

पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी (Periplus Maris Erithrei) या इ. स. पहिल्या शतकातील नाविक माहिती पुस्तकात  पोडुके (Poduke) नावाच्या एका बंदराचा उल्लेख आहे. हा उल्लेख अरिकामेडूचा आहे, असे मत मांडण्यात आले आहे. अरिकामेडू येथे पुरातत्त्वीय संशोधनाला सुरुवात १९३७ मध्ये झाली. गॅब्रियल जोवॉ-डुब्रॉय याने तेथे मिळालेल्या मण्यांचा अभ्यास केला. त्यानंतर १९४० (मद्रास म्युझियम, चेन्नई), १९४१-१९४४ (फॉच्यॉ व सुरलॉ, पुदुच्चेरी), १९४४ (व्हीलर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, दिल्ली), १९४७-१९५० (जॉ-मारी कसाल, फ्रान्स) आणि १९८९-१९९२ (विमला बेगली, अमेरिका) अशी अनेक उत्खनने अरिकामेडू येथे झाली आहेत. या उत्खननांमध्ये इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. अकराव्या शतकापर्यंतच्या वसाहतीचे व बंदरातील व्यापारी घडामोडींचे पुरावे मिळाले आहेत. अरिकामेडू हे दीर्घकाळ भरभराटीचा व्यापार असलेले एक प्राचीन बंदर असून तेथे अनेक वस्तू तयार होत असत व त्यांची निर्यात होत असे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सागरी पुरातत्त्वज्ञांनी २००२ मध्ये अरियानकुप्पम नदीच्या पाण्यात बुडलेल्या वसाहतीच्या व बंदराच्या शोधासाठी प्राथमिक संशोधन केले. नदीच्या पाण्यात मातीच्या भांड्याचे तुकडे मिळाले. तसेच पाण्यात दोन मीटर खोलीवर विटांचे बांधकाम आढळले. नदीचे पाणी अत्यंत गढूळ असल्याने पाण्याखालील संशोधनातून फार काही साध्य झाले नाही. सन २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानच्या (NIO) पुरातत्त्वज्ञांनी अरियानकुप्पम नदीच्या पात्रात सर्वेक्षण केले. त्यांना अर्धमौल्यवान (semi precious) दगडाचे मणी, भाजलेल्या मातीच्या वस्तू, स्थानिक प्रकारची मृद्भांडी, विटांचे तुकडे, कौलांचे तुकडे, व्यापारी संबंध दर्शवणारी रूलेटेड प्रकारची मातीची भांडी (Rouletted ware) आणि गणेशाचे एक छोटे शिल्प मिळाले. तसेच नदीच्या किनारी भागात विटांची भिंत आढळली.

संदर्भ :

  • Begley, Vimala, The Ancient Port of Arikamedu, New Excavations and New Researches 1989-1992, Ecole Françoise d’ Extreme-Orient, Pondicherry, 1996.
  • Suresh, S. Arikamedu: its Place in the Ancient Rome-India Contacts, Development Cooperation Office, Embassy of Italy, New Delhi, 2007.
  • Tripati, Sila; Prakash Babu, C.; Ramesh, M. & Khedekar, Vijay, ‘Arikamedu: A Indo-Roman Trading Station – Revisitedʼ, Man and Environment, XLII (2): 60-67, 2017.
  • Tripathi, Alok, Marine Archaeology: Recent Advances, Agam Kala Prakashan, Delhi, 2005.
  • छायाचित्र सौजन्य : डॉ. शिल त्रिपती, गोवा.

                                                                                                                                                                                         समीक्षक : शंतनू वैद्य