दक्षिणपूर्व आशियातील पूर्व जावा (इंडोनेशिया) मधील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते सोलो नदीच्या काठावर असून येथे १९३१ ते १९३३ या काळात डब्ल्यू. एफ. एफ. ऑपनउर/ऑपेनूर्थ, टेर हार आणि जी. एच. आर. वॉन कोनिंगस्वाल्ड या डच भूशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली उत्खनन केले गेले. यामध्ये अश्मीभूत झालेल्या १२ मानवी कवट्या आणि उजव्या पायाची नडगीची दोन हाडे (अंतर्जंघ स्नायू) सापडली. या अश्मीभूत मानवी अवशेषांना ‘सोलो मानव’ (Solo man) असे संबोधले आहे.

यानंतर या अवशेषांच्या संशोधनकार्यात अनेक अडचणी आल्या. हे उत्खनन चालू असताना ऑपेनूर्थ सेवानिवृत्त झाल्याने पोलंडचे भूगर्भशास्त्रज्ञ जोसेफ झ्वीझेन्स्की यांचा समावेश झाला (१९३३). परंतु याच काळात आलेल्या आर्थिक महामंदीमुळे उत्खनन थांबवण्यात आले. टेर हार यांनी उत्खननाचे निष्कर्ष संक्षिप्तरूपात प्रसिद्ध केले (१९३४). कोनिंगस्वाल्ड यांची १९३४ मध्ये हकालपट्टी करण्यात आली. १९३७ मध्ये अनेक प्रयत्नांनंतर कोनिंगस्वाल्ड यांची पुनर्नेमणूक करण्यात आली, परंतु ते सांगिरान येथील संशोधन कार्यात व्यस्त असल्याने नॅनडाँग येथील काम ठप्प झाले. त्यामुळे उत्खननात मिळालेले सर्व जीवाश्म (मानवी आणि प्राणी) अनेक ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. उदा., हे जीवाश्म १९३६ मध्ये बटाविया (आजचे जाकार्ता), १९४२ मध्ये पूर्व जावातील बांडुंग शहर, १९४८ मध्ये न्यूयॉर्क येथे नेण्यात आले. तेथे ऑपेनूर्थ आणि कोनिंगस्वाल्ड यांनी या जीवाश्मांचा अभ्यास सुरू केला. तथापि १९४८ मध्ये ऑपेनूर्थ यांचे निधन झाले. पुढे त्यांचे ‘सोलो मॅन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले (१९५१). त्यानंतर १९५६ मध्ये कोनिंगस्वाल्ड यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘मीटिंग प्रीहिस्टॊरिक मॅन’ या पुस्तकात सोलो मानवाबद्दल विस्तृत माहिती दिली. १९५७ मध्ये कोनिंगस्वाल्ड यांनी हे सर्व जीवाश्म नेदरलँड्समधील उटरेच विद्यापीठास दिले, तेथे तेउकू जॅकॉब (१९२९-२००७) यांनी यावर पीएच. डी. केली. अखेर १९७८ मध्ये कोनिंगस्वाल्ड यांनी सोलो मानवाचे अश्मीभूत अवशेष इंडोनेशियातील गजाह मादा विद्यापीठास (Gadjah Mada University) सुपुर्द केले. या अवशेषांमध्ये आधी नमूद केल्याप्रमाणे जवळ जवळ बारा पूर्ण आकाराच्या मानवी कवट्या (ज्यांत एक ३ ते ४ वर्ष वयाचा मुलगा, काही प्रौढ पुरुष आणि स्त्रियांच्या कवट्या) आहेत. यांशिवाय उजव्या पायाची दोन नडगीची हाडे आणि काही कवट्यांचे तुकडे मिळाले आहेत.

सोलो नदीच्या काठावर २० मी. उंचीच्या गाळाच्या थरातून मानवी जीवाश्म सापडलेल्या स्तरात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे जीवाश्मसुद्धा होते (१९३१-३४). हे सर्व जीवाश्म एकाच स्तरात मिळाल्यामुळे या स्तरास ‘बोन बेड’ (हाडांचा स्तर) म्हटले आहे. याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत. उदा., जीवाश्म एकाच स्तरात कसे आले? फक्त मानवी कवटी का मिळाली? मानवी दात, जबडे आणि इतर हाडे का मिळाली नाहीत ? हे सर्व कधी आणि कसे घडले असावे? हे मानवी जीवाश्म आधुनिक मानवाच्या समकालीन आहेत का? इत्यादी.
उत्खननकर्त्यांनी या स्तराच्या कालमापनाविषयी अंदाज व्यक्त करताना असे म्हटले की, हा स्तर आजच्या सोलो नदीच्या पात्रापासून २० मी. उंचीवर असलेल्या नदीने तयार केलेल्या गाळाच्या मंचकाचा भाग असल्याने तो साधारण उत्तर प्लाइस्टोसीन काळातील असावा. यामुळे हे मानवी जीवाश्म आधुनिक मानवाच्या समकालीन आहेत का असा समज होता. सोलो मानवी जीवाश्मांचा शास्त्रशुद्ध अभ्यास असे दर्शवितो की, अश्मीभूत कवटी ही आधुनिक मानवाच्या कवटीपेक्षा जाड असून वरचा भाग उंचावलेला, मोठ्या आकाराचा मेंदू, कमी आकुंचित झालेला डोळ्याचा मागील भाग आणि जाड भुवया ही सर्व वैशिष्ट्ये इरेक्टस मानवासारखीच आहेत.

नॅनडाँग येथील जीवाश्माचे कालमापन करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. १९८८-८९ मध्ये युरेनियम-थोरियम पद्धतीने या स्तराचे कालमापन २,००,००० ते ३०,००० वर्षपूर्व असे केले. नंतर १९९६ मध्ये युरेनियम शृंखला कालमापन आणि इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन पद्धत वापरून या स्तरातील सस्तन प्राण्यांच्या हाडांचे कालमापन ५३,००० ते २७,००० वर्षपूर्व असे केले गेले. २००८ मध्ये ३ अश्मीभूत कवट्यांचे गॅमा पंक्तिदर्शी वापरून ७०,००० ते ४०,००० वर्षपूर्व असे कालमापन केले गेले. तर २०११ मध्ये अरगॉन-अरगॉन पद्धतीने ५,४६,०००±१२ वर्षपूर्व आणि सस्तन प्राण्यांच्या हाडांचे इलेक्ट्रॉन संस्पंदन पद्धत वापरून १,४३,००० ते ७०,००० वर्षपूर्व असे कालमापन केले गेले. २०२० मध्ये एका परिपूर्ण अभ्यासाद्वारे असे सिद्ध केले की, सु. ५ लाख वर्षांपूर्वी सोलो नदीने आपला मार्ग बदलला, तर ३.१६ लाख ते ३१,००० वर्षांपूर्वी सोलो नदीचे मंचक तयार होत होते, १,४९,००० ते ९२,००० वर्षपूर्व या दरम्यान नॅनडाँग येथील २० मी. उंचीवरील मंचक तयार होत होते. आणि १,१७,०० ते १,०८,००० वर्षापूर्व या काळात सोलो मानव असलेला बोन बेड तयार झाला.
नॅनडाँग येथील बोन बेडमध्ये खुल्या जंगलातील वातावरणात राहणारे आशियाई हत्ती, वाघ, टायग्रिस सोलोएन्सिस, मलायन टॅपिर, हिप्पो हेक्साप्रोटोडॉन, सांबर हरीण, पाण्यातील म्हैस, गाय, बैल, डुक्कर आणि खेकडा खाणारी माकडे यांचा समावेश आहे.
बोन बेडसंबंधी मिळालेल्या पुराव्यांवरून एक सिद्धांत असे सूचित करतो की, सोलो नदीच्या वरच्या बाजूला थोड्या अंतरावर एकाच पुराच्या घटनेत साधारण १२ ते १३ व्यक्तींचा आणि काही प्राण्यांचा मृत्यू झाला असावा आणि पुरामुळे वाहत जाऊन नॅनडाँग येथील गाळाच्या मंचकावर एकत्र गोळा झाला. अशा प्रकारे या प्रजातीचा हा एक अनाकलनीय अंत झाला असावा.
संदर्भ :
- Huffman, Frank; John De Vos; Aart W. Berkhout and FachroeL, Aziz, ‘Provenience Reassessment of the 1931–1933 Ngandong Homo erectus (Java), Confirmation of the Bone-Bed Origin Reported by the Discoverers’, PaleoAnthropology, 1−60, 2010.
- Indriati, E.; Swisher III, C. C.; Lepre, C.; Quinn, R. L.; Suriyanto, R. A.; Hascaryo, A. T.; Grün, R.; Feibel, C. S.; Pobiner, B. L.; Aubert, M.; Lees, W.; Antón, S. C. 2011. ‘The Age of the 20 Meter Solo River Terrace, Java, Indonesia and the Survival of Homo erectus in Asia’, PLOS One. 2011. https://doi.org/10.1371%2Fjournal.pone.0021562
- Rizal, Y.; Westaway, K. E.; Zaim, Y.; van den Bergh; Bettis III, E. A.; Morwood, M. J.; Huffman, O. F.; Grün, R.; Joannes-Boyau, R.; Bailey, R. M.; Sidarto; Westaway, M. C.; Kurniawan, I.; Moore, M. W.; Storey, M.; Aziz, F.; Suminto; Zhao, J.; Aswan; Sipola, M. E.; Larick, R.; Zonneveld, J.-P.; Scott, R.; Putt, S.; Ciochon, R. L. 2020. ‘Last appearance of Homo erectus at Ngandong, Java, 117,000–108,000 years ago’, Nature, 577, pp. 381–385. https://doi.org/10.1038%2Fs41586-019-1863-2
- Swisher, III, C. C.; Rink, W. J.; Antón, S. C.; Schwarcz, H. P.; Curtis, G. H.; Widiasmoro, A. S., ‘Latest Homo erectus of Java: Potential Contemporaneity with Homo sapiens in Southeast Asia’, Science, Vol. 274, No. 5294, pp. 1870–1874, 1996. https://doi.org/10.1126%2Fscience.274.5294.1870
- Yokoyama, Y.; Falguères, C.; Sémah, F.; Jacob, T., ‘Gamma-ray spectrometric dating of late Homo erectus skulls from Ngandong and Sambungmacan, Central Java, Indonesia’, Journal of Human Evolution, Vol. 55 (2), pp. 274–277, 2008. https://doi.org/10.1016%2Fj.jhevol.2008.01.006
- Weidenreich, F.; Von, Koenigswald G. H. R., ‘Morphology of Solo man’, Anthropological Papers of the American Museum of Natural History, 43, 1951. http://hdl.handle.net/2246/297
- चित्रसंदर्भ :
- १. नॅनडाँग-१ येथे १९३२ मध्ये बोन बेडचे उत्खनन चालू असताना – After Huffman et al. 2010
- २. नॅनडाँग येथे सोलो नदीच्या काठावरील मंचके आणि त्यांचे कालमापन दाखविणारे रेखाचित्र – After Rizal et al. 2020
- ३. नॅनडाँग येथील उत्खननात मिळालेल्या अश्मीभूत मानवी कवट्यांच्या प्रतिकृती (ओयोवा विद्यापीठ, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) https://www.smithsonianmag.com/science-nature/fossils-some-last-homo-erectus-hint-end-long-lived-species-180973816/
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.