गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील (२०१३ पूर्वीचा जुनागढ जिल्हा) कोडिनार या गावाजवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर शिंघोडा नदीच्या मुखापाशी आहे. प्राचीन भारतीय साहित्यात श्रीकृष्णाच्या द्वारकेबाबत ज्या अनेक ठिकाणांचा उल्लेख येतो, त्यांपैकी ही एक द्वारका असावी असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. डेक्कन कॉलेजने १९६३ मध्ये द्वारकेला केलेल्या उत्खननानंतर प्रा. ह. धी. सांकलिया यांनी मूळ द्वारका हीच श्रीकृष्णाची द्वारका असावी, असे मत मांडले होते; तथापि ते मान्य झाले नव्हते. कोडिनारजवळ असलेल्या या ठिकाणाखेरीज सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर पोरबंदर व मियानी यांच्या दरम्यान किंडारी खाडीच्या काठी विसवाडा येथे मूळ द्वारका आहे, अशीही एक परंपरा आहे.
मूळ द्वारकेला एका छोट्या टेकाडावर भग्नावस्थेतील एक कृष्ण मंदिर असून ते इ. स. दहाव्या शतकानंतरचे आहे. या मंदिराच्या जवळच चुनखडीच्या दगडांनी बांधलेली चार मीटर उंचीची रचना आहे. याला स्थानिक लोक दिवा दांडी (दीपगृह) असे म्हणतात. बहुधा हे मध्ययुगीन काळात (बारावे ते पंधरावे शतक) दीपगृह होते. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञांनी कोडिनारच्या परिसरात केलेल्या सागरी पुरातत्त्वीय सर्वेक्षणात गाळाच्या दगडापासून बनवलेला नांगर मिळाला. नांगराची जाडी १२ ते २० सेंमी. असून त्याच्या वरच्या भागात एक गोल भोक आहे, तर खालच्या भागात दोन चौरस भोके आहेत. हा नांगर आणि द्वारका व बेट द्वारका येथे मिळालेले ऐतिहासिक व मध्ययुगीन नांगर यांच्यात साम्य आढळले.
पाण्याखालील पुरातत्त्वीय सर्वेक्षणात सागरतळ उंचसखल असून त्यात काही ठिकाणी खडक असल्याचे आढळले. तेथे नांगराप्रमाणे वापरले गेलेले काही दगड मिळाले, पण ते इतर ठिकाणी मिळालेल्या नांगरांपेक्षा वेगळे होते. त्यावरून असे दिसते की, या जागी नौका उभ्या करण्याची जागा असावी. ही जागा तेथे नव्याने सिमेंटचा धक्का बांधताना नष्ट झाली असावी.
सर्व पुरातत्त्वीय पुराव्यांचा एकत्रित विचार करताना असे दिसते की, ऐतिहासिक व मध्ययुगीन काळात मूळ द्वारका हे बंदर कार्यरत असावे. तथापि या ठिकाणी आद्य ऐतिहासिक काळातील कोणतेही अवशेष मिळाले नाहीत. तसेच प्राचीन वसाहतीचा भाग पाण्यात बुडल्याचे कोणतेही पुरावे तेथे आढळले नाहीत.
संदर्भ :
- Gaur, A. S.; Sundaresh & Tripati, Sila, ‘New evidence on Maritime Archaeology around Mul Dwarka (Kodinar), Gujarat Coast, Indiaʼ, Man and Environment, 34(2): 72-76, 2009.
- Gaur, A. S.; Sundaresh; Rao, B. R.; Tripati, Sila & Khedekar, V. D. ‘A Possible Medieval Lighthouse at Mul Dwarka (Kodinar), Saurashtra Coast, Indiaʼ, International Journal of Nautical Archaeology, 39(2):418 – 422, 2010.
- Sankalia, H. D. ‘Dwarka in literature and archaeologyʼ, Excavations at Dwarka (Eds., Ansari, Z. D. & Mate, M. S.), pp. 1-17, Deccan College, Pune, 1966.
समीक्षक : श्रीनंद बापट