(स्थापना : ऑगस्ट १९८६).
आकाशमित्र एक हौशी खगोलशास्त्रज्ञ संस्था आहे. खगोलशास्त्र लोकप्रिय करणे आणि विद्यार्थ्यांना, खगोलशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात उपयुक्त योगदान देण्यासाठी उत्साही लोकांना प्रेरित करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणे हे देखील त्याचे उद्दीष्ट आहे. भारतात हौशी खगोलशास्त्रज्ञांच्या मेळाव्याचे आयोजन करणारी ही भारतातील पहिली संस्था होती. ऑगस्ट १९८६मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून या संस्थेमार्फत अनेक कार्यशाळा, मूलभूत खगोलशास्त्र अभ्यासक्रम, आकाश निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आले. “भारतातील खगोलशास्त्राशी संबंधित व्यक्तींची निर्देशिका” ही प्रकाशने प्रकाशित करून भारतातील खगोलशास्त्रीय साहित्यात वाढ केली आहे.
आकाशमित्रचे बोधवाक्य : ‘ज्ञानं सम्यगवेक्षणम्’ म्हणजे निरीक्षणांद्वारे उत्तम ज्ञान प्राप्त होते.
सन १९८५ – १९८६ या वर्षामध्ये हॅलेचा धुमकेतू दिसणार होता. धुमकेतूबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज होते ते दूर करणे आणि ज्या लोकांना धुमकेतूचे कुतूहल होते त्यांना त्याबद्दल अधिक माहिती पुरविण्यासाठी वैज्ञानिक संस्था आणि व्यक्तिगत रित्या कार्य करणारे हौशी आकाश निरीक्षक यांनी आणि कल्याणमधील आकाशप्रेमी श्री. हेमंत मोने यांनी आकाशमित्र या संस्थेची स्थापना केली. उद्देशपूर्तीसाठी कल्याण येथे खगोलशास्त्र अभ्यासकांचे एक राज्यस्तरीय संमेलन भरविले. या संमेलनात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. शशिकांत दामले यांसारख्या नामवंत शास्त्रज्ञांची व्याख्याने झाली.
आकाशमित्रच्या स्थापनेनंतर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी खगोलशास्त्राविषयी संमेलने आयोजित होऊ लागली, कार्यकर्ते व्याख्याने देऊ लागले आणि शोधनिबंध सादर करू लागले. संमेलनानंतर परस्पर संपर्कातील अडचणी लक्षात घेऊन, आकाशमित्रने, हौशी आकाश निरीक्षक व वैज्ञानिक संस्था यांच्या संपर्कांची एक यादी केली. संस्था मान्यवर आणि तज्ज्ञ व्याख्यात्यांची वेळोवेळी मार्गदर्शक व्याख्यान आयोजित करते.
खगोलशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करून देणारा एक अभ्यासवर्ग आकाशमित्र घेते. हा कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंतही पोहचविला आहे. या विषयाचा आकाशमित्रचा अभ्यासक्रम महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (महाराष्ट्र नॉलेज कोर्पोरेशन; Maharashtra Knowledge Corporation) ऑनलाईन स्वरूपात त्यांच्या संकेतस्थळावर, मुक्त शिक्षण स्रोत या भागांतर्गत लोकांना उपलब्ध करून दिला आहे.
सर्वांच्या मनात आकाशाचे जे कुतुहल असते त्याची शास्त्रीय माहिती व्हावी म्हणून आकाशमित्र, कल्याणजवळ मामणोली येथून दुर्बिणीच्याद्वारे आकाशदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच्या, ‘आकाशाचे पुस्तक वाचूया’ या प्रकल्पातून आकाशमित्र व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ या दोघांनी मिळून सुमारे १२,००० विद्यार्थ्यांपर्यंत आकाशदर्शन हा विषय पोहचवला आहे.
बुध व शुक्राची अधिक्रमणे पाहण्यासाठी दुर्बिणी व मार्गदर्शनाची गरज असते, म्हणून सूर्यबिंबावरून ग्रहाचे मार्गक्रमण पाहण्यासाठी पडदा व दुर्बिण, असा संच कल्याणमधील सार्वजनिक ठिकाणी उभा करून आकाशमित्र लोकांना अधिक्रमणे दाखवत आली आहे. खगोलशास्त्रातील सोप्या प्रयोगांची प्रदर्शने आकाशमित्रने आयोजित केली. २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञानदिनी, पुण्याच्या नारायणगावजवळील खोडद येथील जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी; GMRT), येथे जे विज्ञानप्रदर्शन भरवले जाते यामध्ये, आकाशमित्र २००२ सालापासून सातत्याने सहभागी होत आहे.
खगोलशास्त्र विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेने स्वत: बनवलेल्या प्रतिकृती आहेत व तज्ञ कार्यकर्ते आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे मुंबई विद्यापीठ, होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेतर्फे घेतली जाणारे खगोल ऑलिंपियाडचे तयारी वर्ग इ. ठिकाणी खगोलशास्त्रचे विषयतज्ञ म्हणून या तज्ज्ञांना आमंत्रित केले जाते.
आकाशमित्रचे कल्याणमधील महिला मंडळ, संस्थेच्या आवारात वाचनालय व ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात सध्या ३००हून अधिक संदर्भग्रंथ, पुस्तके, पंचांगे (एफिमेरीज; Ephemeris) आहेत. त्याचबरोबर सीडी, छायाचित्रे, स्मरणिका या देखील आहेत. १९५० — २००० या कालखंडातील सायंटिफिक अमेरीकन या नियतकालिकातील खगोलशास्त्रावरील ५०० लेखांचे २६ खंड आहेत.
आकाशमित्रच्या घडणीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या निरीक्षण प्रकल्पांची, शोधनिबंधांची आंतरराष्ट्रीय शिखर संघटनांनी दखल घेतली आहे. काही विद्यार्थी या क्षेत्रात संशोधन करत आहेत. दरवर्षी उल्का वर्षावाची निरीक्षणे आंतरराष्ट्रीय संस्थेला पाठविणे हे आकाशमित्रचे कार्यकर्ते करीत असतात. आकाशमित्रच्या नारायणगाव शाखेचे शिशिर देशमुख ‘सोहो’ या सूर्यवेधी धूमकेतू शोधण्याच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेत यश संपादन करणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत.
कळीचे शब्द : #हॅले #आकाशमित्र #आकाशदर्शन.
संदर्भ :
- http://akashmitramandal.tripod.com/
समीक्षक – म. द. फाटक,