प्रचलित व्यवस्थेबद्दल, सद्यस्थितीबद्दल असमाधान वाटणे ही मानवी मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. प्राप्त परिस्थितीबद्दल असमाधान वाटण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळेच मानवाला प्रगती साधण्यास मदत झाली आहे. प्रगती साधण्यासाठी मानवाकडून विविध क्षेत्रांत संशोधन केले जाते. अध्यापकांमधील विषयज्ञानाचे किंवा आशय समृद्धतीचे विकसिन होऊन त्याचा उपयोग अध्यापनात व्हावा, याकरिता शिक्षण क्षेत्रात आशययुक्त अध्यापन पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे.
आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये तीन स्वतंत्र मुद्दे आहेत.
- (१) आशय ꞉ आशय म्हणजे उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी निवडलेली क्षेत्रे होय.
- (२) अध्यापन ꞉ एखादा विशिष्ट हेतू मनात धरून विद्यार्थ्यांच्या अंतरंगात सुप्त स्वरूपात असलेल्या विविध शक्तीचे व क्षमतांचे विकसन म्हणजे अध्यापन.
- (३) पद्धती ꞉ विहित आशय विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध कृतींची पद्धतशीर मांडणी म्हणजे पद्धती होय.
व्याख्या : एन. सी. टी. ई. च्या मते, ‘निरीक्षणक्षम कौशल्यांच्या परिभाषेत छात्राध्यापकांमध्ये विकसित झालेले आशय आणि पद्धतीचे अर्थपूर्ण एकात्मिकरण म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती होय’.
आशयाचा विचार करताना तो कोणत्या इयत्तेसाठी, कोणत्या विद्यार्थ्यासाठी स्पष्ट करायचा आहे आणि तो कोणत्या पद्धतीचा अवलंब केला, तर सर्वांत चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना आकलन होऊ शकेल व त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल, याचा विचार म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती होय.
वरील व्याख्येवरून आशययुक्त अध्यापनामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो :
- (१) आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये आशय व अध्यापन या दोहोंचे अर्थपूर्ण एकात्मिकरण केले जाते.
- (२) आशययुक्त अध्यापनात शालेय स्तरावरील संकल्पनाचे सखोल आकलन केले जाते.
- (३) संस्कारयुक्त अध्यापन करण्याची पद्धती म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती होय.
आशययुक्त अध्यापन पद्धती ही संकल्पना १९७८-७९ मध्ये अस्तित्वात येऊन राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेमध्ये (एनसीटीई) तिचे शिक्षकांचे शिक्षण याअनुषंगाने चौकट तयार करण्यात आली; मात्र प्रशिक्षण महाविद्यालयांनी ती पद्धत प्रत्यक्षात १९८१ पासून सुरू केली. सुरुवातीला हा विषय समजून न घेता आशय व पद्धती यांची फारकत दोन वेगवेगळ्या भागांत करूनच अध्यापन करण्यात आल्याचे दिसून येते.
आशयानुसार अध्यापन पद्धती निवडताना शिक्षकाला आशयाचे विश्लेषण करून विश्लेषणाकडून संश्लेषणाकडे जायचे; या संश्लेषणाने जो नियम तयार होईल, जे तत्त्व निघेल, त्या तत्त्वांच्या अध्यापनासाठी पद्धतीचा शोध घ्यायचा; ते तत्त्वे, तो नियम शिकविण्यासाठी जी कोणती पद्धती योग्य असेल, त्या पद्धतीने शिकवायचे या सर्व गोष्टींचा समावेश आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये होतो.
प्रकार ꞉ ली शुल्मन यांनी आशय ज्ञानाचे पुढील चार प्रकार सांगितले आहेत ꞉
- (१) विषयज्ञान ꞉ एखाद्या विषयाचे अध्यापन करताना त्यामध्ये असलेले सखोल व संपूर्ण ज्ञान म्हणजे विषयज्ञान होय.
- (२) सामान्य अध्यापनशास्त्रीय ज्ञान ꞉ सामान्य अध्यापनशास्त्रीय ज्ञानामध्ये अध्यापनविषयक व्यापक तत्त्वे, पद्धती इत्यादींचा समावेश असतो.
- (३) अध्यापनशास्त्रीय आशयज्ञान ꞉ अध्यापनशास्त्रीय आशयज्ञान ही शुल्मन यांनी मांडलेली नवीन कल्पना आहे. एखाद्या विषयातील कोणता भाग सोपा व कोणता कठीण आहे, हे समजून घेऊन त्यानुसार अध्यापनाची योजना करणे, त्यानुसार पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरविणे हे महत्त्वाचे असून विशिष्ट आशयाला कोणती पद्धती प्रभावी आहे, हे निश्चित करणे या अध्यापनशास्त्रीय आशयज्ञानात येते.
- (४) अभ्यासक्रमाचे ज्ञान ꞉ अभ्यासक्रमाचे ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाचा, एखाद्या इयत्तेसाठी अथवा अभ्यासक्रमासाठी नेमण्यात आलेला असा भाग की, ज्याचे पाठ्यक्रमात व पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेल्या आशयाच्या व्याप्तीचा व परस्परसंबंधाचा आहे.
महत्त्व ꞉
- विषयातील आशयाचे सुक्ष्म बारकावे आशययुक्त अध्यापनामुळे समजतात.
- आशय व उद्दिष्टे यांचा संबंध समजतो.
- कोणत्या आशयासाठी कोणती पद्धती वापरावी ते समजते.
- उपलब्धतेनुसार व पद्धतीच्या निवडीनुसार अध्यापन साधनांची निश्चिती करता येते.
- मूल्यमापन साधनांची निवड करता येते.
गृहितके ꞉
- अध्यापन प्रक्रिया ही अनेक कौशल्यांनी बनलेली एक व्यामिश्र प्रक्रिया आहे.
- कौशल्यप्रभुत्व असेल, तर अध्यापन प्रभावी होईल.
- प्रशिक्षणाच्या आधारे कौशल्यानिर्मिती करता येते.
- पद्धती व आशय यांचा समन्वय साधला, तरच अध्यापन अर्थपूर्ण होईल.
- आशयावरील प्रभुत्व हे त्या विषयातील तपशील, संबोध, तत्त्वे, उपपत्ती अध्यापकाला किती प्रमाणात माहिती आहे यांवर अवलंबून असते.
वरील गृहितकांवरून आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या पायाभूत तत्त्वांची यथार्थ जाणीव होते. अध्यापन प्रक्रियेचे पृथक्करण केल्यानंतर त्यामध्ये अनेक कौशल्यांचा उपयोग केला जातो. अध्यापन अधिक परिणामकारक होण्यासाठी आशय आणि पद्धती यांची योग्य गुंफण होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या विषयाचा तपशील, संबोध, तत्त्वे आणि उपपत्ती शिक्षकाने अधिकाधिक प्रमाणात माहित करून घेणे गरजेचे आहे.
उद्दिष्टे ꞉
- आशय व पद्धती यांचा अतूट संबंध समजावून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे.
- प्रत्येक विषयाची एक संरचना असते, ही वस्तुस्थिती विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे.
- विद्यार्थ्यांमध्ये आपल्या विषयासंदर्भात आशय पृथक्करणाची क्षमता विकसित करणे.
- विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार व आशयानुसार पद्धती बदलते, याची जाणीव करून देणे.
- या सर्वांच्या आधारे अध्यापन प्रभावी करण्याचा प्रयत्न करणे.
उपयोग ꞉
- प्रत्येक विषयाची एक श्रेणीबद्ध संरचना असते. आशययुक्त अध्यापन पद्धतीमुळे ती समजण्यास मदत होते.
- प्रत्येक शालेय स्तराचा अभ्यासक्रम असतो, तो समजण्यास मदत होते.
- अभ्यासक्रम व पाठ्यक्रम रचनेच्या विविध पद्धती लक्षात येतात.
- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजण्यास मदत होते.
- अभ्यासक्रमाचे, पाठ्यपुस्तकाचे, आशयाचे विश्लेषण करता येते.
- पाठ्यक्रम व अभ्यासक्रम यांतील फरक लक्षात येतो.
आशययुक्त अध्यापनाचे घटक : आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या कार्यशाळेद्वारे ठरविलेली उदिष्टे पूर्ण केली जाऊ शकतात. यामध्ये विषय संरचना, अभ्यासक्रमाचे विश्लेषण व पाठ्यक्रमाचे विश्लेषण, आशय विश्लेषण, अध्यापन पद्धतीची निवड, प्रत्यक्ष पाठ व मूल्यमापनाचा समावेश होतो.
(१) विषय संरचना : कोणत्याही अभ्यास विषयाची विशिष्ट अशी एक मांडणी असते. कोणतेही ज्ञान व माहिती यांची मांडणी सुयोग्यरीतीने केल्यास संरचना तयार होते. संरचित केलेली माहिती ही समजण्यास सोपी जाते, असा विचार सर्वप्रथम जेरोम ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाने मांडला. ज्या मांडणीच्या साह्याने एका दृष्टीक्षेपात त्या विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना येत असेल, तर अशा मांडणीला त्या विषयाची संरचना असे म्हणतात.
(२) विषय संरचनेचे उपयोग :
- संबोधाचे संरचनेतील स्थान समजते.
- अध्यापन करायच्या संबोधाशी संबंधित पूर्व संबोध व नवीन संबोध माहीत होण्यास मदत होते.
- ज्या त्या विषयाच्या शाखा, उपशाखा व त्यातील घटक यांची माहिती मिळते.
- विषयाचा अभ्यास एका दृष्टीक्षेपात होऊ शकते.
- संरचनेत असणार्या विविध घटकांमधील परस्परसंबंध लक्षात येतो.
- अध्यापन करण्यासाठी शैक्षणिक अनुभव व अध्यापन पद्धती निवडण्यास मदत होते.
- अध्यापनाला विशिष्ट दिशा मिळून अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यास मदत होते.
(३) अभ्यासक्रम चिकित्सा विश्लेषण : शिक्षक जेव्हा प्रत्यक्ष व्यावसायिक कार्यास सुरुवात करतो, तेव्हा त्यास अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक यांतील फरक माहीत असणे गरजेचे आहे. म्हणूनच आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये या सर्वांचा विचार केलेला आहे. शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणार्याला प्राप्त होणार्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम होय.
अभ्यासक्रमाचे विश्लेषण करताना अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, संरचना, अभ्यासक्रमातील आशयाची उद्दिष्टानुरूप इयत्तावार विभागणी, अभ्यासक्रम व उद्दिष्टांमधील समन्वय, शाखानिहाय भारांश, अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती या सर्व घटकांचा विचार करावा लागतो.
(४) पाठ्यक्रमाची चिकित्सा : अभ्यासक्रमातील काही उद्दिष्टे ठराविक काळात पूर्ण करण्यासाठी वर्गातील वातावरणात दिले जाणारे शैक्षणिक अनुभव म्हणजेच पाठ्यक्रम होय. पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांवरून पाठ्यक्रमाची उद्दिष्टे ठरतात. पाठ्यक्रमात प्रत्येक विषयातील आशय, त्याची पातळी, अंतर्भूत असलेल्या विविध क्षमता, अनुभव यांची संगतवार मांडणी असते. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम रचनेच्या विविध पद्धती आहेत. उदा., रेषीय, समकेंद्री, घटक व संमिश्र पद्धती.
- रेषीय पाठ्यक्रम रचना म्हणजे एखादा पाठ्यक्रम विशिष्ट पाठ्यक्रमासाठी निश्चित करण्याची पद्धती होय.
- समकेंद्री पाठ्यक्रम रचनेमध्ये एकाच पाठ्यविषय ठेऊन त्याची इयत्तेनुसार व्याप्ती वाढत जाते.
- घटक पाठ्यक्रम रचना पद्धतीमध्ये अभ्यास विषयात असणार्या विविध घटकांचा क्रम लावून विविध इयत्तेच्या पाठ्यक्रमात केली जाते.
- संमिश्र पद्धतीमध्ये वरील सर्व प्रकारांचा एकत्रित समावेश केला जातो. पाठ्यक्रमाचे विश्लेषण करताना उद्दिष्टे, गाभभूत घटक व संविधानातून प्राप्त होणारे मूल्ये आणि संमिश्र घटक मांडणी पद्धत यांचा विचार केला जातो.
(५) पाठ्यपुस्तक विश्लेषण : ज्या पुस्तकात विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आवश्यक असणारा पाठ्यांश वाचायला मिळतो, अशा पुस्तकांना पाठ्यपुस्तक असे म्हणतात. पाठ्यपुस्तकास अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाचा आरसा मानला जातो. शालेय शिक्षणातून द्यायचे अपेक्षित ज्ञान, कौशल्ये, मूल्ये, राष्ट्र आणि समाजसंदर्भात विद्यार्थ्याने भविष्यात भूमिका संक्रमित करण्याचे पाठ्यपुस्तक हे महत्त्वाचे साधन आहे.
पाठ्यक्रमानुसार पाठ्यपुस्तक लिहिले आहे की नाही, पुस्तकातील घटक-उपघटकांची मांडणी योग्य क्रमाने केलेली आहे की नाही, घटक मांडणीत अध्यापन सूत्रांचा योग्य वापर केला आहे की नाही, अचूक आशय आहे की नाही, योग्य ठिकाणी आकृत्यांचा वापर केला आहे की नाही, पुरेशी नमुना उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आहे की नाही, स्वाध्याय योग्य पद्धतीने दिले आहेत की नाही, गाभाभूत घटकांचा समावेश केला आहे की नाही इत्यादींचा विचार पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना केला जातो.
(६) आशय विश्लेषण : एखाद्या उपघटकातील आशयाचे तपशील, संज्ञा, संबोध, व्याख्या, नियम, सूत्रे, तत्त्वे, अनुमान, सिद्धांत इत्यादींमध्ये पृथक्करण करणे म्हणजे आशय विश्लेषण होय. आशयाचे विश्लेषण डेव्हिस तंत्रानुसार, मूल्यमापन तंत्रानुसार, आशयाचे बोधात्मक मानसशास्त्रीय विश्लेषणानुसार अशा वेगवेगळ्या प्रकारे करता येते.
आशय विश्लेषण केल्यामुळे शिक्षकाचा त्या विषयाचा सखोल अभ्यास होतो, आशयातील बारकावे लक्षात येतात, कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी विशिष्ट आशय शिकवणार आहोत हे समजते, आशयाचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांचा विचार करून अध्यापन पद्धतीची निवड करता येते, मूल्यमापन साधनाची निवड करता येते.
मतप्रवाह : आशययुक्त अध्यापन पद्धतीबाबत तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. काहींच्या मते, वर्गामध्ये अध्यापन पद्धतीचेच अध्यापन करावे, आशयाचे नको; कारण त्यासाठी वेळ नसतो. याउलट, काहींच्या मते, हा विचार तर्कशुद्ध असला, तरी प्राप्त परिस्थितीची गरज म्हणून स्वीकारावा; कारण विषयज्ञान आणि आशयज्ञान हे दोन्ही महत्त्वाचे असल्यामुळे ते दोन्ही अध्ययन-अध्यापनात आले पाहिजे.
आशययुक्त अध्यापन पद्धतीचा शिक्षणक्षेत्रात नव्याने समावेश करण्यात आला असला, तरी सुरुवातीला हे कार्यशाळेच्या स्वरूपात घेण्यात येत होते; मात्र २०१५ पासून शिक्षक शिक्षण महाविद्यालयाचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा झाला, तेव्हापासून आशययुक्त अध्यापन पद्धतीचे महत्त्व कमी झाल्याचे दिसून येत आहे.
संदर्भ ꞉
- गायकवाड, प्रज्ञा, विज्ञान शिक्षण, पुणे, २०१३.
- भिंताडे; जगताप, ह. ना.; बोंदार्डे, अश्विन, आशययुक्त अध्यापन पद्धती, पुणे, २००६.
- सरपोतदार; भोसले; सांगळे, आशययुक्त अध्यापन पद्धती, कोल्हापूर, २००२.
समीक्षक ꞉ ह. ना. जगताप
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.