नोबेल, आल्फ्रेड बेअरनार्ड : (२१ ऑक्टोबर १८३३–१० डिसेंबर १८९६). स्वीडिश अभियंते, स्फोटकांचे संशोधक, उद्योगपती आणि प्रख्यात नोबेल पारितोषिकांचे प्रणेते. त्यांनी डायनामाइट व इतर शक्तिमान स्फोटक पदार्थ शोधून काढले.

नोबेल यांचा जन्म स्टॉकहोम (स्वीडन) येथे झाला. तेथे १८४१-४२ च्या दरम्यान ते प्रथम शाळेत गेले, परंतु नंतर त्यांचे शिक्षण खासगी शिक्षकांकडूनच झाले. त्यांनी पॅरिसमध्ये एक वर्ष रसायनशास्त्राचा अभ्यास केला(१८५०). नंतर त्यांनी अमेरिकेत जॉन एरिक्‌सन यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वीडन, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेत शिक्षणासाठी पाठविले. त्यांना स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्रजी व जर्मन भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यासोबतच साहित्य, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान या विषयांची आवड होती. अमेरिकेहून परतल्यावर ते प्रथम वडिलांच्या रशियातील सेंट पीटर्झबर्ग येथील कारखान्यात रुजू झाले, परंतु तो लवकरच बंद पडला आणि ते स्वीडनला परतले. या कारखान्यात त्यांनी स्फोटक द्रव्यांचा विशेषतः नायट्रोग्लिसरीनचा अभ्यास केला. नायट्रोग्लिसरीनचे संशोधक ए. सोब्रेअरो यांचेशी पॅरिसमध्ये त्यांचा परिचय झाला होता.

नायट्रोग्लिसरीन हे द्रव्य अतिस्फोटक आणि असुरक्षित असल्याने त्याचा व्यावसायिक उपयोग होऊ शकत नव्हता. घरच्या धंद्यात लागणाऱ्या स्फोटकांचा वापर सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने व्हावा म्हणून धोका पत्करूनही नोबेल यांनी अनेक प्रयोग केले. नायट्रोग्लिसरीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी त्यांनी एक कारखाना उभारला परंतु या कारखान्यात १८६४ साली भयंकर स्फोट होऊन त्यात त्यांचा धाकट्या भावाचे निधन झाले. तसेच नायट्रोग्लिसरीन घेऊन जाणारे एक जहाज स्फोटाने नाश पावले. त्यामुळे या कारखान्यावर बंदी आली. म्हणून त्यांनी सरोवरात नांगरलेल्या जहाजावर हाताळण्यास सुरक्षित अशी स्फोटके बनविण्याचे प्रयोग चालू केले. त्यांतूनच १८६६ मध्ये डायनामाइट या स्फोटकाचा शोध लागला. कीझेलगूर या सच्छिद्र मृत्तिकेत नायट्रोग्लिसरीन शोषित करून त्यापासून डायनामाइट बनवितात. हे हाताळण्यास सुरक्षित असते. या शोधाचे एकस्व (पेटंट) ब्रिटनमध्ये १८६७ मध्ये व अमेरिकेत १८६८ मध्ये त्यांनी मिळविले. त्यानंतर त्यांनी नायट्रोसेल्युलोज (गनकॉटन) व नायट्रोग्लिसरीन यांचा कलिल विद्राव बनवून त्यापासून उत्स्फोटक (ब्लास्टिंग) जिलेटीन वा गेलिनाइट हे एक आदर्श स्फोटक द्रव्य त्यांनी १८७५ मध्ये बनविले. ते कॉर्डाइट या स्फोटकाचे पूर्वद्रव्य होय. याचे एकस्व त्यांनी १८७६ मध्ये मिळविले. तसेच १८७५ मध्ये त्यांनी लेटिनस डायनामाइट हे अधिक शक्तिशाली स्फोटक बनविले. त्यानंतर बॅलिस्टाइट या धूर न होणाऱ्या स्फोटकाचा शोध त्यांनी लावला व त्याचे एकस्व १८८८ मध्ये मिळविले. हे डायनामाइटापेक्षा जास्त शक्तिमान होते. जी स्फोटके केवळ पेटविल्याने उडत नाहीत त्यांचा स्फोट घडविण्यासाठी उपयोगी पडतील अशा विस्फोटकांचा (डेटोनेटरांचा) शोधही त्यांनी लावला. तोही स्फोटकांच्या शोधाइतकाच महत्त्वाचा आहे.

नोबेल यांनी बनविलेल्या स्फोटकांचा वापर शस्त्रांबरोबरच तेलाच्या विहिरी खोदणे, खनिजांचे उत्खनन करणे, रेल्वे तसेच रस्त्यांसाठी बोगदे खोदणे, कालव्यांचे रुंदीकरण यासाठी जगभरात केला जाऊ लागला. रशियात क्रिमिया युद्धाने जोर धरल्याने वडिलांच्या शस्त्रांच्या धंद्यात त्यांना चांगलेच उत्त्पन्न मिळू लागले. त्यांनी तयार केलेले विस्फोटके तसेच डायनामाइट व उत्स्फोटक जिलेटीन यांमुळे खाणकामाच्या उद्योगात फार मोठी क्रांती घडून आली. यांशिवाय विद्युत् रसायनशास्त्र, प्रकाशकी, धातुविज्ञान इ. क्षेत्रांतही उपयोगी पडेल असे काही संशोधन त्यांनी केले. त्यांनी सु. ३५५ एकस्वे मिळविली.

नोबेल यांच्या भावाचे १८८८ मध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला, परंतु नोबेल यांचे निधन झाले अशी चुकीची बातमी पसरली. पॅरिस प्रेसने ‘मृत्यूच्या सौदागराचा अंत’ असा मथळा या बातमीला दिला. या बातमीचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम झाला. अनेक देशांत काढलेले स्फोटकांचे कारखाने आणि बाकू तेल क्षेत्राचा व्यवहार यांपासून त्यांना अमाप संपत्ती मिळाली. विधायक कार्यासाठी ज्यांचा उपयोग व्हावा अशा शोधांचा दुरुपयोग विनाशक कामासाठी केला जातो हे पाहून त्यांना फार वाईट वाटत असे. बहुधा यामुळेच त्यांनी आपल्या संपत्तीचा विनियोग मौलिक आणि मानवी हितसंवर्धक कार्यासाठी पारितोषिके देण्याकरिता व्हावा अशी व्यवस्था मृत्युपत्रात करून ठेवली. मृत्युपत्रानुसार त्यांनी आपली ९४% संपत्ती जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पारितोषिक देण्यासाठी ठेवली होती.

नोबेल यांच्या स्मरणार्थ १०२ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला नोबेलियम हे नाव देण्यात आले आहे.

नोबेल यांचे सॅन रेमो (इटली) येथे निधन झाले.

पाहा : नायट्रोग्लिसरीन, स्फोटक द्रव्ये, डायनामाइट, नोबेल पुरस्कार

कळीचे शब्द : नायट्रोग्लिसरीन स्फोटक द्रव्ये. डायनामाइट, नोबेल पुरस्कार

संदर्भ :

 समीक्षक : श्रीनिवास केळकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.