बॅनर्जी, अभिजित (Banerjee, Abhijit) : (२१ फेब्रुवारी १९६१). अमेरिकेत स्थित प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व नोबेलस्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक स्तरावरील गरिबी दूर करण्यासाठी अवलंबिलेल्या प्रयोगात्मक दृष्टिकोनामुळे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मायकेल क्रेमर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व अभिजित यांच्या पत्नी एस्थर डुफ्लो यांच्या बरोबरीने अभिजित यांना २०१९ चा अर्थशास्त्राचा नोबेलस्मृती पुरस्कार विभागून देण्यात आला.
अभिजित यांचा जन्म निर्मला व दीपक या दाम्पत्यापोटी सुशिक्षित कुटुंबात मुंबई येथे झाला. त्यांचे आई-वडिल दोघेही अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. अभिजित यांचे शालेय शिक्षण कोलकात्यातील नामांकित शिक्षण संस्था साउथ पॉईंट हायस्कूल येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोलकाता विद्यापीठांतर्गत प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १९८१ मध्ये अर्थशास्त्र विषयात बी. एससी. ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली (जेएनयु) येथे प्रवेश घेऊन १९८३ मध्ये अर्थशास्त्रात ते एम. ए. झाले. या काळात फी वाढीसंदर्भात विद्यापीठाविरुद्ध केलेल्या आंदोलनात अभिजित यांना तिहार तुरुंगात जावे लागले होते. पुढील शिक्षणासाठी त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते एरिक स्टार्क मॅस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी १९८८ मध्ये पीएच. डी. ही पदवी संपादन केली. पीएच. डी.नंतर अभिजित यांनी काही काळ हार्व्हर्ड व प्रिस्टन या दोन विद्यापीठांत अध्यापन केले. त्याच काळात त्यांनी मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मध्ये प्राध्यापिका असलेल्या आपल्या बालपणीची मैत्रिण अरुंधती तुली-बॅनर्जी यांच्याशी विवाह केला. त्यांना कबीर नावाचा मुलगा होता. काही कारणास्तव दोघेही वेगळे झाले. त्यानंतर २०१५ मध्ये अभिजित यांनी आपली सहकारी एस्थर डुफ्लो यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.
अभिजित यांचा ‘विकासवादी अर्थव्यवस्था’ हा अभ्यासाचा मूळ विषय आहे. त्यांनी २००३ मध्ये ‘अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ॲक्शन लॅब’ (जे. पाल) या संस्थेची स्थापना केली. ते या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सहकार्यांसह जागतिक गरिबी दूर व्हावी, यासाठी आपल्या संशोधनाद्वारे सिद्धांत व व्यवहार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष गरीब क्षेत्रांना भेटी देऊन, त्यांच्यात वास्तव्य करून, संबंधित घटकांशी संवाद साधून आखलेल्या योजनांचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला. आपल्या या संशोधनाद्वारे व्यवहारावर आधारलेले प्रारूप विकसित करून त्यांनी गरिबीच्या निर्मूलनासाठी सैद्धांतिक मांडणी केली. उदा., भारतामध्ये पोलिओचे लसीकरण स्वतंत्रपणे उपलब्ध असूनसुद्धा राजस्थानमधील काही भागातील महिला आपल्या बाळांना लसीकरणासाठी केंद्रावर आणत नव्हत्या. ही बाब अभिजित व डुफ्लो यांनी लक्षात घेऊन त्यावर एक योजना आखली. त्यामध्ये त्यांनी मुलांना लसीकरणासाठी आणणार्या महिलांना डाळीची पिशवी दिली. या प्रयोगामुळे तेथील लसीकरणाची संख्या वाढल्याचे दिसून आले.
अभिजित यांच्या संशोधनामुळे भारतातील ५० लक्ष विद्यार्थ्यांना ‘उपचारात्मक अध्यापना’चा (रिमेडिअल टिचिंग) लाभ मिळत आहे. त्यांच्या अनन्यसाधारण कर्तृत्वाबद्दल रॉयल स्वीडिश अकादमी या संस्थेने त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत म्हटले की, ‘अभिजित यांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून गरिबीशी लढण्याचा नवा दृष्टिकोन जगाला दिला आहे. अनेक देशांमध्ये आरोग्य सुविधांसाठी दिले जाणारे भक्कम अनुदान हे त्यांच्याच संशोधनाचा परिणाम आहे.’
२०१९ मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दारिद्र्य निर्मूलनाच्या उद्देशाने प्रत्येक गरीब कुटुंबाला अर्थसाह्य म्हणून महिन्याला ६ हजार रूपये, तर वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची जी ‘न्याय’ योजना आणली होती, ती संकल्पना अभिजित यांची होती; मात्र त्यांनी वर्षाला ७२ हजार ऐवजी ३० हजार रूपये द्यावेत, अशी सूचना केली होती. त्यांच्या मते, ‘मदतींचा आकडा वाढविल्यास ही योजना अव्यवहार्य ठरू शकते’. २०१६ मधील भारतातील नोटाबंदीला त्यांनी विरोध दर्शविला होता. ‘नोटाबंदीमुळे देशातील गरीब व सर्वसामान्य जनतेला त्रास सोसावा लागेल आणि तो अपेक्षेपेक्षा जास्त असेल’, अशी त्यांची भूमिका होती.
गरिबी दूर करण्यासाठी सूक्ष्म वित्तपुरवठा तसेच आरोग्य सेवा, शिक्षण, साक्षरता, पोषणसेवा, लसीकरण या कार्यक्रमांचा सर्वत्र आधार घेतला जातो. या कार्यक्रमांची परिणामकारकता तपासण्यासाठी अभिजित यांनी यादृच्छित (सर्वसाधारण) नियंत्रण चाचणी (रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल – आरसीटी) या सर्वेक्षण पद्धतीचा प्रथमच अवलंब केला. आतापर्यंत ८३ देशांमध्ये मिळून सुमारे १,००० सर्वेक्षण या पद्धतीने घेण्यात आली असून त्यांपैकी सुमारे २५ कक्के सर्वेक्षण भारतात घेण्यात आली होती; मात्र विविध क्षेत्रांमधून अशा पद्धतीने प्राथमिक सांख्यिकी माहिती संकलित करीत असताना अनेक प्रमाद होऊ शकतात व त्यामुळे या आरसीटी सर्वेक्षण पद्धतीला अनेक मर्यादा आहेत, असे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सर अँगस एस. डेटन व प्रसिद्ध तत्त्वज्ञ नॅन्सी कार्टराइट यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये दाखवून दिले आहे.
अभिजित यांनी गरिबांची आर्थिक स्थिती व गरिबीचे उच्चाटन इत्यादी संदर्भात लेखन केलेले पुअर इकॉनॉमिक्स हे पुस्तक जगातील १७ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांच्या या ग्रंथास गोल्डमन सॅश बिझनेस बुक ऑफ दि इयर’ हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या अनन्यसाधारण कामगिरीमुळे २००९ मध्ये त्यांना इन्फोसिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस बान की-मून यांनी २०१५ नंतरच्या विकासासंबंधीची उद्दिष्टे अद्ययावत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने जी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती, त्या समितीच्या सचिवपदी अभिजित यांची निवड करण्यात आली होती. ‘अमेरिकी अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस’ आणि ‘दि इकॉनॉमिक सोसायटी’ या दोन संस्थेत रीसर्च असोसिएट म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच ते काईल इन्स्टिट्यूट, गुगेनहॅम आणि आल्फ्रेड पी. स्लोन या संस्थांचे अधिछात्र (फेलो) होते. ‘बॅनर्जी ब्युरो फॉर दि रीसर्च इन दि इकॉनॉमिकल ॲनॅलिसिस ऑफ डेव्हलपमेन्ट’ या संस्थेचे ते अध्यक्ष होते.
अभिजित यांनी पुढील ग्रंथांचे लेखन केले आहे : कॅन इम्फॉर्मेशन कॅम्पेन्स स्पार्क लोकल पार्टीसिपेशन अँड इम्प्रुव्ह आऊटकम्स (२००६); मेकिंग एड वर्क (२००७); पिटफॉल्स ऑफ पार्टिसिपेटरी प्रोग्राम्स (२००८); पुअर इकॉनॉमिक्स (२०११); गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाईम्स (२०१९); व्हाट दि इकॉनॉमी नीड्स नाऊ (२०१९).
अभिजित हे सध्या एमआयटी या प्रसिद्ध संस्थेत फोर्ड फाऊंडेशन इंटरनॅशनल प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
समीक्षक : संतोष दास्ताने