आखाताप्रमाणे समुद्र किनाऱ्यावर निर्माण झालेल्या अंतर्वक्र खोलगट भागाला कोव्ह म्हणतात. कोव्ह हे सागर किनाऱ्यावरील झीज क्रियेने निर्माण झालेले अर्ध गोलाकार भूस्वरूप असते. अशा किनाऱ्याच्या प्रदेशात मृदू व कठिण खडक एकानंतर एक विक्षेपित झालेले असल्यास समुद्रातील लाटांमुळे मृदू खडक कठिण खडकांच्या मानाने लवकर झिजतात. त्यामुळे किनारपट्टीच्या भागाला अंतर्वक्र अर्ध गोलाकार आकार प्राप्त होतो, तेच कोव्ह असतात. कोव्ह हे आकारने ३०० मी. पेक्षा लहान वा त्यांचा व्यास ३० मी. पेक्षा कमी असतो. कोव्हमुळे तेथील किनाऱ्याला निसर्गत: दंतुर आकार प्राप्त होतो.
कोव्हमध्ये सामान्यत: अरुंद प्रवेशद्वार असतात. यामुळे कोव्हच्या पाण्याचे मोठ्या लाटांपासून आणि अशांत प्रवाहापासून संरक्षण होते. वस्तुतः कोव्ह हा शब्द इंग्रजीतील ‘कोफा’ या जुन्या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ निवारा किंवा झोपडी आहे. कोव्ह ही समुद्र किंवा तलावाच्या किनाऱ्यावरील एक लहान आश्रयस्थान खाडी असते. काही ठिकाणी कोव्ह हे मोठ्या खाडी किंवा खाजणचे लहान प्रवेशद्वार असते. अंटार्क्टिक द्वीपकल्पातला भाग असलेल्या कँगरेजो कोव्हला कधीकधी ‘बाहिया कँगरेजो’ म्हटले जाते. वरून पाहिले असता, भूपृष्ठावर संलग्न दंडने (स्पिट) तयार झालेले कोव्ह हे क्रेफिश माशाच्या – कँगरेजोच्या पंजासारखे दिसतात. सागरी परिसंस्थांच्या दृष्टीने कोव्ह विशेष महत्त्वाचे असतात.
कोव्हच्या भोवतालचे खडक बहुधा मऊ असतात आणि झिजेसाठी पूरक असतात. अशा खडकांमध्ये वालुकाश्म, चिकणमाती आणि चुनखडकचा समावेश असतो. उदा., संयुक्त संस्थानांच्या टेनेसी राज्यातील ‘चेरकी नॅशनल फॉरेस्ट’ चा एक भाग असलेला, चुनखडीचा कोव्ह हे ‘नॉर्थ इंडियन क्रीक’ वरील एक आश्रय (शेल्टर्ड) कोव्ह आहे. कठिण खडकदेखील झिजेसाठी काही प्रमाणात पूरक असतात आणि हे अरुंद प्रवेशद्वार बनू शकतात. कठिण खडकामध्ये क्वार्टझाइट किंवा कणाश्म (ग्रॅनाइट) समाविष्ट असतात. उदा., फ्रान्सच्या ब्रिटनीमधील ‘पिंक ग्रॅनाइट कोस्ट’ मध्ये असलेले अनेक कोव्ह प्रसिद्ध आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर मॅक्वे कोव्हजवळ असलेला सुमारे २८ मी. उंचीचा सुंदर धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. न्यूझीलंडच्या नॉर्थ बेटावर कॅथीड्रल नावाचे असेच सुंदर कोव्ह आहेत, ज्या ठिकाणी सुबक नैसर्गिक कमान असून तेथील गुफांमुळे हे क्षेत्र पर्यटकांसाठी नंदनवन बनले आहे.
जगातील पुरातत्त्व विभागाच्या नोंदीनुसार बऱ्याच सागर किनाऱ्यांवरील कोव्हजवळ मानवी वस्ती अस्तित्वात असावी. अशा भागात प्राचीन काळी इ. स. पू. सुमारे ७००० वर्षे जुनी अवजारे सापडली आहेत.
संयुक्त संस्थानातील मॅक्वे कोव्ह (कॅलिफोर्निया), गनस्टोन कोव्ह (उत्तर व्हर्जिनिया), मर्डर कोव्ह, (ॲडमिरॅल्टी बेट, अलास्का); इंग्लंडच्या कॉर्नवॉल भागातील मावगान पोर्थ कोव्ह; कॅनडातील उत्तर व्हँकुव्हर बेटाजवळील बिव्हर कोव्ह ही जगातील कोव्हची प्रमुख उदाहरणे आहेत. चेन्नईजवळील कोव्हलाँग पुळण (फिशरमन्स कोव्ह), अंदमान व निकोबार मधील हॅवलॉक बेटावर असलेली राधानगर पुळण ही भारतातील कोव्हची प्रमुख उदाहरणे आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.