एका सामान्य, साक्षर अशा व्यवहारी माणसाला अर्थशास्त्राचा प्राथमिक परिचय करून देण्यासाठी लिहिण्यात आलेला एक अर्थशास्त्रीय ग्रंथ. रोजच्या जीवनातील ग्यानबाची (सर्वसामान्य माणूस) जी आर्थिक वागणूक आहे, तिचा परिचय, तिचे स्पष्टीकरण, तिचे समर्थन, त्यातील समस्यांची उकल, स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक वागणुकीबरोबर देशाच्या आर्थिक व्यवहारांची थोडीशी तोंडओळख व्हावी, असा या पुस्तकाचा प्रमुख विषय आहे.
ग्यानबाचे अर्थशास्त्र हा ग्रंथ थोर स्वातंत्र्यसैनिक व देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळातील एक ज्येष्ठ सदस्य न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांनी इ. स. १९४१ साली तुरुंगात असताना लिहिले असून प्रत्यक्षात ते जानेवारी १९४३ मध्ये प्रसिद्ध झाले. जगातील दुःख व दारिद्र्य यांमागे नशीब किंवा दैव नसून माणूस, मानवी कायदे, मानवी संस्था हे आहेत; तर सुखाच्या मुळाशी ‘धर्म’ नसून ‘अर्थ’ असल्याचे या ग्रंथात नमूद केले आहे. अज्ञान, दारिद्र्य यांचा संहार ज्ञानाने होऊ शकतो, अशी लेखकांची भूमिका आहे. ग्रंथात मांडलेल्या दुःख, दारिद्र्य, नशीब, दैव, कायदे, संस्था, धर्म, अर्थ, आर्थिक वागणूक इत्यादी विषयांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी व मराठी जनतेत त्याविषयी अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, हा ग्रथनिर्मितीमागचा उद्देश होता. ग्रंथनिर्मिती वेळी बेनहॅम, केन्स, मार्शल, टॉसिग, रॉबिन्स, धनंजयराव गाडगीळ इत्यादी लेखकांच्या त्या काळी प्रसिद्ध असलेल्या इंग्रजीतील लिखाणाचा आधार त्यांनी घेतला.
अर्थशास्त्राची पारंपरिक पुस्तके व्याख्या, सिद्धांत-नियम यांच्याशी जखडून राहातात. त्यामुळे ती काहीशी दुर्बोध होतात; मात्र ग्यानबाचे अर्थशास्त्र या ग्रंथात रोजच्या व्यवहारातील गोष्टी, अनुभव, निरीक्षणे, समस्या, उकल यांच्या मार्फत टप्प्याटप्प्याने नियम-सिद्धांत यांची ओळख करून दिली असून ‘ज्ञात गोष्टींकडून अज्ञात गोष्टींकडे’ अशा तत्त्वानुसार हे लिखाण झालेले आढळते. त्या काळच्या शैलीनुसार पुस्तकात आकृत्या, तक्ते, सूत्रे, समीकरणे, सांख्यिकी माहिती यांचा अत्यंत मर्यादित वापर आहे; परंतु स्पष्टीकरणात सर्वत्र विस्तारित मुबलक उदाहरणे आहेत. लेखन दुसऱ्या महायुद्ध काळात झाल्याने अनेक उदाहरणे युद्धकालीन परिस्थितीस अनुसरून आहेत. तुलनेसाठी त्यांनी जागोजागी साम्यवादी अर्थव्यवस्थेतील परिस्थितीचे विश्लेषणही केले आहे. अर्थशास्त्र म्हणजे व्यवहारशास्त्र, अशी नेमकी अर्थवाही व्याख्याही केल्याने लेखकांच्या लेखनाची पूर्वपीठिका ध्यानात येते.
ग्यानबाचे अर्शास्त्र या ग्रंथामध्ये बाजारपेठ, मागणी, पुरवठा, उत्पादन, उत्पादन घटक, भांडवल, उत्पादन प्रक्रिया, वितरण, पैसा, बँका, जागतिक आर्थिक व्यवहार, विदेशी व्यापार, विदेशी चलन व्यवहार अशा अनेक उपविषयांच्या व्याप्तीचा समावेश आहे. उत्पादन प्रक्रिया समजण्यासाठी भांडवलशाहीतील उत्पादनविषयक निर्णयप्रक्रिया व साम्यवादी (लेखकाचा मूळ शब्द-हुकुमशाही) अर्थरचनेतील निर्णय प्रक्रिया यांचा सोदाहरण मागोवा या ग्रंथात दिसून येतो. सरकारने अर्थकारणात कशा पद्धतीने भाग घ्यावा, तो प्रत्यक्ष किती व अप्रत्यक्ष किती असावा, त्याचे प्रयोजन काय, त्याचे परिणाम काय होऊ शकतात हा सर्व भाग ग्रंथातील राजसत्ता या प्रकरणात विस्ताराने दिला असून देशातील तसेच जगातील आर्थिक व्यवहारांमध्ये अनुभवास येणारे तेजीमंदीचे चक्र लेखकांनी जगाचे पुढचे पाऊल या प्रकरणात सविस्तर मांडले आहे.
अर्थशास्त्र विषयाची ओळख करून देणारे एक सोप्या भाषेतील मौलिक व वाचनीय ग्रंथ म्हणून ग्यानबाचे अर्थशास्त्र याची दखल घ्यावी लागेल. विशेष करून ज्या काळात अर्थशास्त्राचे मराठीतून लेखन नगण्यच होते, त्या काळात लेखकांनी केलेले हे धाडस लक्षणीय आहे.
समीक्षक : मनिषा कर्णे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.