वर्गामध्ये अध्यापन पद्धतीचे अभिरूप वातावरण तयार करून अध्यापन करणे म्हणजे अभिरूप अध्यापन होय. त्यात एका वस्तुस्थितीसारखी दुसरी, परंतु भासमय स्थिती तयार करून किंवा एखाद्या घटनेची, परिस्थितीची किंवा वस्तुची हुबेहूब दिसणारी प्रतिकृती तयार करून अध्यापन केले जाते. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षक तयार करण्याच्या प्रक्रियेला योग्य दिशा मिळावी म्हणून सतत नित्य नवीन प्रशिक्षण तंत्रांचा वापर केला जातो. उदा., सूक्ष्म अध्यापन, उद्दीपित प्रत्यावाहन इत्यादी. यांसारखी अनेक तंत्रे विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उदयास आली. प्रशिक्षण कालावधीतील प्रात्यक्षिक कार्याची आखणी करताना या तंत्रांचा प्रशिक्षण, तसेच अभिरूपतेचा विचार केला जातो. तसा तो शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही केला जाऊ लागला. अभिरूपता म्हणजे एखाद्या कृतीचा, घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी हुबेहूब दिसणारी प्रतिकृती तयार करणे होय. अभिरूपता या शब्दाला ‘प्रतिभास’ असेही म्हटले जाते. फिंक यांच्या मते, ‘अभिरूपतेमध्ये नियंत्रित वास्तवाचे दर्शन घडविले जाते’.
कोणताही अनुभव घेताना तो अनुभव किती ज्ञानेंद्रियांमार्फत पोहोचतो, त्यावरून त्याची परिणामकारकता आजमावता येते. एडगर डेल यांनी याच निकषावर आधारित अनुभवांचा शंकू तयार केला. त्यात त्यांनी अध्ययनासाठी अनुभव देताना चिन्हांपासून सुरुवात करून जास्तीत जास्त खात्रीशीर अध्ययनासाठी अभिरूपता व प्रत्यक्ष अर्थवाही अनुभवांना स्थान दिले आहे. म्हणजेच अभिरूपता आणि प्रत्यक्ष अनुभव यांत फारच थोडे अंतर आहे. हे अंतर का आणि कसे आहे, हे अभिरूपतेच्या उदाहरणाद्वारे समजून घेता येईल. उदा., पायलटला जेव्हा प्रशिक्षण दिले जाते, तेव्हा खऱ्याखुऱ्या विमानात एकदम सराव दिला जात नाही, तर अभिरूप परिस्थितीचा उपयोग करून विविध नियंत्रणे, मिळालेल्या माहितीचा अर्थ लावणे, योग्य निर्णय व कौशल्यांचा उपयोग यांचा सराव दिला जातो. तसेच मोठी धरणे बांधताना अथवा पूल बांधतानाही प्रतिकृतींचा उपयोग करून विविध गोष्टींचा अंदाज घेतला जातो. गाड्यांची नवीन मॉडेल्स तयार करताना विविध धक्के, रस्ते वगैरेंचा त्यावर होणारा परिणाम प्रतिकृतीवर आधी अभिरूपतेने पडताळला जातो. म्हणजेच अभिरूपता हे तंत्र अध्यापनात, प्रशिक्षणात आणि दैनंदिन जीवनात मोठे निर्णय घेताना वापरले जाते. त्यात वस्तुस्थितीप्रमाणेच, पण सुरक्षित स्थिती निर्माण केलेली असते.
इतिहास ꞉ अभिरूपता या तंत्राचा विकास पहिल्या महायुद्धानंतर झाला. अमेरिकेच्या हवाई दलामध्ये भरती केलेल्या प्रशिक्षणार्थींना हवाई प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण देण्यासाठी एक कृत्रिम परिस्थिती तयार करण्यात आली. अवकाशामध्ये येणारे अडथळे, समस्या सोडविण्यासाठी कशाप्रकारे कृती करायची इत्यादींचे प्रशिक्षण तशी परिस्थिती निर्माण करून देण्यात आली. यानंतर हे तंत्र जगभर प्रसिद्ध झाले. पुढे संगणक तंत्रज्ञानाचा विकास झाल्यावर ‘अभिरूपता’ संगणक तंत्रज्ञानाच्या साह्याने शक्य झाले. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या तंत्राचा वापर करण्यावर भर देण्यात आला. त्याचा शैक्षणिक क्षेत्रातही उपयोग होऊन अभिरूप अध्यापन हे संगणकाद्वारे एक विशिष्ट अध्ययनाचे तंत्र म्हणून विकसित झाले आहे.
उद्दिष्ट ꞉ प्रत्यक्ष अध्यापन करताना काही उद्दिष्ट्ये ठरवून अध्यापन केले जातात, त्याच प्रमाणे अभिरूप अध्यापनाच्या वेळीसुद्धा काही उद्दिष्ट्ये ठरविलेली असतात.
- निवडलेल्या अध्यापन पद्धतीचा अभिरूप परिस्थितीत सराव करणे.
- नियोजित पाठ टाचणाची अधिकाधिक तंतोतंत कार्यवाही, कौशल्य किंवा क्षमता विकसित करणे.
- क्षमता आणि ज्ञानाचे उपयोजन करण्याची कौशल्य विकसित करणे.
- अध्यापन पद्धतीचा पदबंध आणि अध्यापन कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे.
- सहाध्यायांशी झालेल्या आंतरक्रियेतून व्यावसायिक विकास घडविण्यास मदत करणे इत्यादी.
अभिरूप अध्यापनाच्या कार्यवाहीत आपल्याच सहायक प्रशिक्षणार्थींचा गट करून त्यांमध्ये वीस मिनिटांची तासिका घेतली जाते. अभिरूप अध्यापन हे छात्राध्यापकांना अध्यापन करण्यासाठी, सक्षम बनविण्याशी, अध्यापन कौशल्य आत्मसात करण्यास मदत करते. अभिरूप अध्यापनात विशिष्ट विषयासाठी विशिष्ट पद्धत यानुसार विविध अध्यापन पद्धतींचा वापर करून पाठ घेतला जातो. उदा., (१) मराठी व हिंदी भाषांसाठी नाट्यीकरण, चर्चा, उद्गामी, अवगामी. (२) इंग्रजीसाठी कम्युनिटी ॲप्रोच, उद्गामी, अवगामी. (३) इतिहासासाठी आधार पद्धती, कथन, कथाकथन. (४) भूगोलासाठी प्रवास पद्धती, दिग्दर्शन, चर्चा. (५) गणितासाठी उद्गामी, अवगामी, संयोजन पद्धती. (६) विज्ञानासाठी किमान अध्ययन क्षमता, प्रयोग, दिग्दर्शन इत्यादी.
वैशिष्ट्ये ꞉ अभिरूप अध्यापनाची पुढील वैशिष्ट्ये आहेत :
- या पद्धतीचा वापर वर्गातील प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्यापूर्वी सरावासाठी करण्यात येतो.
- अभिरूप अध्यापन ही पद्धत सोपी पद्धत असल्याचे समजण्यात येते.
- या अध्यापन पद्धतीमुळे प्रत्याभरण परिणामकारक करता येते.
- ही अध्यापन पद्धत शिक्षकांकरिता अध्यापन कौशल्य म्हणून अध्यापनात प्रभावीपणे वापरता येते.
- या अध्यापन पद्धतीमुळे प्रशिक्षणार्थीतील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
अभिरूपता ही संकल्पना व्यापक असून भूमिका पालन, खेळ हे त्याचेच प्रकार आहेत. त्यामुळे प्रशिक्षक कार्य, तसेच दैनंदिन जीवनात अभिरूपता या तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शालेय स्तरावर अभिरूपतेचा उपयोग करून विद्यार्थ्यांत विविध प्रकारचे ज्ञान, कौशल्य, अभिरुची, मूल्ये विकसित करता येऊ शकतात.
नियोजन ꞉ अभिरूप अध्यापनातील नियोजन पुढील प्रमाणे :
- पाठ घेणारा छात्राध्यापक आपल्या सहाध्यायी समवेत एका टेबलभोवती बसून पाठ घेतो.
- छात्राध्यापकासमोरील कागद हा फळा असतो.
- पाठनिरीक्षक म्हणून एक सहाध्यायी काम करतो. तोच वेळेचेही नियोजन पाहतो.
- पाठ घेताना प्रशिक्षणार्थी शैक्षणिक साहित्याची छोटी प्रतिकृती वापरतो.
- या पाठात प्रस्तावना पाच मिनिटे, विषयविवेचन दहा मिनिटे आणि मूल्यमापन व समारोप पाच मिनिटे अशा प्रकारे साधारणतः वीस मिनिटे कालावधीचा पाठ घेतला जातो.
- पाठनिरीक्षकाकडे पदनिश्चयन श्रेणी असते. त्या आधारे तो पाठ घेणाऱ्या छात्राध्यापकाच्या पाठाचे निरीक्षण करतो आणि पाठ कसा झाला याविषयी अभिप्राय देतो. पुढील चर्चेमध्ये छात्राध्यापकांच्या चुका, उल्लेखनीय मुद्दे यांविषयी त्याला माहिती देण्यात येते.
- अभिरूप अध्यापनामध्ये साधारणतः सहा विद्यार्थ्यांचा एक गट अशी पाठाची बैठक व्यवस्था केले जाते.
- सर्व गटाचे त्या त्या विषयाच्या अधिव्याख्याताद्वारे त्या पाठाचे निरीक्षण केले जाते.
अभिरूप अध्यापनातील पाठाच्या वेळी छात्राध्यापकाने अभिरूप अध्यापनासाठी कोणता आशय घटक ठरवला, कोणती अध्यापन पद्धती वापरली, त्या पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या, आवश्यक साधने कोणती होती, वापरलेली फलक लेखन कृती व साधने पूरक होती का इत्यादी मुद्द्यांचे निरीक्षण अधिव्याख्याताद्वारे करण्यात येते.
फायदे ꞉ अभिरूप अध्यापनाचे फायदे पुढील प्रमाणे :
- अभिरूप अध्यापन पद्धतीमध्ये जटिल समस्यांचे अध्ययन करून त्याचे विश्लेषण करता येते.
- यामध्ये छात्राध्यापकांना प्रत्याभरण करता येते.
- या अध्यापनामध्ये छात्राध्यापकांना विविध भूमिका करण्याची संधी मिळते.
- ही अध्यापन पद्धती सूक्ष्म अध्यापन पद्धतीच्या मदतीने अधिक परिणामकारकरित्या राबविता येते.
- या अध्यापन पद्धतीने अध्ययन करणाऱ्या छात्राध्यापकांना वर्गात शिकण्यास अभिरुची आणि उत्साह निर्माण करता येतो.
- या अध्यापन पद्धतीने वर्गात नवनवीन शिकविण्यासाठी बळकटी आणता येते.
- या पद्धतीने अध्यापन करताना प्रशिक्षणार्थी आपल्या अध्यापनात अधिक सतर्क राहण्याचा प्रयत्न करतो इत्यादी.
मर्यादा ꞉ अभिरूप अध्यापनाच्या पुढील प्रमाणे मर्यादा आहेत :
- या अध्यापनात विद्यार्थी प्रेक्षकाची भूमिका बजावत असल्यामुळे त्यांच्याकडून चुकीच्या नोंदी होऊ शकतात.
- शिकत असताना विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होणे गरजेचे असते. तसे न झाल्यास त्यात विद्यार्थी अधिक रस घेत नाहीत.
- या अध्यापन पद्धतीचा वापर लहान बालकांसाठी उपयुक्त नसतो.
- या अध्यापन पद्धतीचा वापर सर्व विषयांसाठी करता येत नाही.
- सुरुवातीस शैक्षणिक कौशल्यांचे अध्ययन करणे कठीण जाते. उदा., प्रश्न विचारणे.
- या अध्यापन पद्धतीतून दृकश्राव्य साधनांची गरज असते, ती वेळेवर उपलब्ध करणे कठीण जाते.
दक्षता ꞉ अभिरूप अध्यापनासाठी पुढील प्रमाणे दक्षता घेणे आवश्यक असते :
- या अध्यापन पद्धतीमध्ये एकाच विषयांच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसविणे सोयीचे असते.
- प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्ही भूमिका पार पाडण्याची संधी मिळणे गरजेचे असते.
- अध्यापनानंतर वादविवाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक आपापल्या पद्धतीत सुधारणा करू शकतील.
- विद्यार्थ्यांनी अशा अध्यापन पद्धतीचा सराव करण्यापूर्वी सूक्ष्मपाठ योजनेची तयारी करणे आवश्यक असते.
- अभिरूप अध्यापन सुरू असताना प्रेक्षक म्हणून विद्यार्थी व शिक्षकांनी वर्गात उपस्थित राहणे गरजेचे असते. त्यामुळे वर्गात शिस्त राखण्यास मदत होते.
संदर्भ ꞉
- घोरमोडे, के. यु.; घरमोडे, कला, शिक्षकांचे शिक्षण, नागपूर, २००९.
- पाटील, विनोद विश्वासराव, अध्यापन उपागम व कार्यानिती, जळगाव, २०१३.
- मोरे, चंद्रकांत; भिलगावकर, सदानंद, शिक्षक शिक्षण, पुणे, २००८.
- सप्रे, नीलिमा; पाटील, प्रीती, शिक्षणातील विचार प्रवाह, कोल्हापूर, २००६.
- सोहनी, चित्रा, अध्यापनाची प्रतिमाने, पुणे, २००७.
समीक्षक ꞉ कविता साळुंके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.