शास्त्री,सत्यवत :  ( २९ सप्टेंबर १९३० – १४ नोव्हेंबर २०११ ).  भारतीय साहित्यातील संस्कृत भाषेचे विद्वान, लेखक, प्रतिभासंपन्न कवी, संस्कृत व्याकरणाचार्य आणि समीक्षक. त्यांचा जन्म लाहोर इथे  झाला. त्यांचे वडील चारुदेव शास्त्री हे संस्कृत विद्वान होते. त्यांच्या छत्रछायेतच त्यांना संस्कृत भाषेची गोडी लागली. त्यांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण आपल्या वडिलांकडूनच घेतले. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी ‘षडॠतुवर्णनम्’ ही कविता लिहून संस्कृत साहित्याच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. ती कविता जयपूरवरून प्रकाशित होणाऱ्या संस्कृत रत्नाकर या नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. त्या कवितेत एकंदर १५ श्लोक होते. त्यांनी त्यातील १४ श्लोक वेगवेगळ्या छंदात लिहिले होते. पंडित रघुनाथ शर्मा, पंडित ढुंढिराज शास्त्री, गोपिनाथ कविराज या सारख्या संस्कृत अभ्यासकांचे त्यांना प्रारंभीच्या काळात मार्गदर्शन लाभले, त्यातून त्यांची काव्यप्रतिभा फुलत गेली.

सत्यव्रत शास्त्री

सत्यवत शास्त्री यांनी पंजाब विश्वविद्यालयातून संस्कृतमध्ये एम.ए. केले आणि बनारस हिंदू विद्यापीठातून भर्तृहरी लिखित वाक्यपदीय  या ग्रंथावर वाक्यपदातील दिक्काल मीमांसा या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५५ मध्ये दिल्ली विद्यापीठातून अध्यापन सुरू केले होते. आपल्या ४० वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी विभागप्रमुख आणि कलाशाखेचे अधिष्ठाता ही पदे भूषवली. ते पुरी येथील जगन्नाथ विद्यापीठाचे कुलगुरूही होते. त्यांनी देशातच नव्हे तर परदेशातही संस्कृत प्रचाराचे कार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे थायलंडच्या शिल्पाकोर्न विद्यापीठात संस्कृत अभ्यास केंद्राची स्थापना झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा संस्कृत आयोग स्थापन करण्यात आला होता.

सत्यवत शास्त्री यांची साहित्य संपदा :  चिंतन, लेखन व वाचन या तीनही क्षेत्रात सत्यवत शास्त्री हे कौशल्यप्राप्त होते. कोणत्याही  विषयावर नवीन पद्धतीने प्रस्तुतीकरण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. संस्कृतबरोबर हिंदी आणि इंग्रजी भाषेवर देखील त्यांचे प्रभुत्व होते. संस्कृतबरोबर हिंदी आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी ग्रंथलेखन आणि अनुवाद केले आहे.  संस्कृत : बृहत्तरं भारतम्  (१९५९), श्रीबोधिसत्वचरितम् (१९५९), श्रीगुरुगोविंदसिंहचरितम्  (१९६७), शर्मण्यदेश: सुतरां विभूति  (१९७६), इंदिरागांधीचरितम् (१९७६) ,  थायदेशविलासम् (१९७९), श्रीराम कीर्ति महाकाव्यम् (१९९०), पत्रकाव्यम्, षडॠतूवर्णनम्, जय देवि स्वतंत्रते !, कोsहम्, महाकविकालिदासाष्टकम्, इत्यादी. हिंदी : वैदिक व्याकरण (१९७१); अनुवादित इंग्रजी : एसेस ऑन इंडोलॉजी (१९६३), रामायणा ए लिंग्विस्टिक स्टडी (१९६४). इत्यादी ग्रंथांसमवेत त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे.

सत्यवत शास्त्री यांचा दि मेकिंग ऑफ ए पोएट  हा अत्यंत गाजलेला निबंध आहे. त्यात त्यांनी कवी कसा बनतो या विषयी आपले विचार प्रकट केले आहेत. कवीची कोणत्याही घटक तत्वापासून संरचना होत नाही. तो स्वरचित असतो. तो आपलं विश्व आपणच निर्माण करतो. श्रुतिमध्ये त्याला ‘स्वयंभू’ असं म्हटलं आहे. तो आपल्या सृष्टीची रचना करतो. ही त्यांची मांडणी होती. व्याकरणाचे जाणकार आणि भाषातज्ञ असल्याने भाषेमध्ये विकृत काही करणे, तिच्या स्वरूपाशी छेडछाड करणे, सरळीकरणाच्या नावाखाली त्यात नवेनवे प्रयोग करणे त्यांना कधीही आवडले नाही. प्रत्येक भाषेची स्वतःची एक ओळख असते. तिचे एक स्वरूप असते. तिचे स्वरूपच अस्पष्ट होईल अशी तोडफोड भाषेत करू नये,संस्कृत भाषा ही संस्कृतच वाटायला हवी, ती प्राकृत किंवा हिंदी वाटायला नको अशी त्यांची भूमिका होती .

लोक त्यांना विचारीत असत की, त्यांना कवी म्हणून ओळखले तर आवडेल की, समीक्षक म्हणून ओळखले तर आवडेल? तर ते म्हणत असत की, ‘मला दोन्हीही रूपात ओळखले तरी आवडेल.’ त्यांचे म्हणणे होते की, ‘संस्कृत मध्ये समीक्षकासाठी खूप सुंदर शब्द आहे. सहृदय. तुम्ही सहृदय असल्याशिवाय समीक्षा करूच शकत नाही. सहृदय तोच असतो ज्याचे हृदय मुळ  लेखकासारखे असते. समानं हृदय-यस्य- तो लेखकाचा समानधर्मी बनतो. त्याच्या पातळीवर जाऊन त्याच्या चिंतनाला आत्मसात करून त्यावर तो स्वतः चिंतन करतो. त्याच्या हृदयाचा तळ गाठल्याशिवाय तो त्या लेखकाला न्याय देवू शकत नाही. लेखक काय विचार करतोय; कोणत्या परिस्थितीत करतोय; कोणत्या भावनेनं करतोय, हे जाणून घेणं हे त्याच्यासाठी आवश्यक असतं.  कवी मनोभावनेच्या उद्वेगामध्ये लिहितो. कोणत्या शब्दाचा कुठे आणि कसा वापर करायचा ही त्याची रचना करतानाची प्रक्रिया नसते. त्याला तर फक्त लिहायचे असते.  एखाद्या नैसर्गिक झऱ्या प्रमाणे शब्द त्याच्या प्रक्रियेचे सहचर बनून स्वतः येतात. त्यांचे औचित्य-अनौचित्य हा त्याचा विषय नसतो. जिथे रचनाकाराची भूमिका संपते तिथे सहृदय समीक्षकाची भूमिका सुरु होते.’

सत्यवत शास्त्री यांचा  विश्वास  होता की, संस्कृत भाषा ही देशाच्या जनजीवनात लोकप्रिय होऊ शकेल. कारण ही भाषा भारतीय भाषांना आणि साहित्याला पोषक आहार देते. संस्कृत भाषा ही  भारताचा  भूतकाळ आणि वर्तमानकाळ समजून घेण्यासाठी उपयोगी ठरू शकते. कारण त्या भाषेने आपल्या कवेत  धर्म, तत्वज्ञान,भाषा विज्ञान आणि साहित्य तसेच तांत्रिक विज्ञान यांना घेतलेले आहे. त्यांची दृढ धारणा होती की, संस्कृत भाषा ही जिवंत भाषा आहे. अन्यथा त्या भाषेच्या माध्यमातून इतके विपुल साहित्य कसे लिहिले गेले असते. काव्यधारा कशी अविरल वाहत राहिली असती?  ते कालिदासाच्या साहित्याचे गाढे अभ्यासक होते. त्यांना कालिदासाच्या रचना कंठस्थ होत्या. त्यांनी देशविदेशात शेकडो भाषणे दिली होती. दक्षिण-पूर्वी एशियातील संस्कृत व पाली शिलालेखांना ते अनुपम काव्यसौंदर्याच्या  खजिन्याचा शोध घेण्याचे द्वार मानत होते. त्यांनी वाल्मिकी रामायणाचे भाषाशास्त्रीय अध्ययन केले होते.

सत्यवत शास्त्री यांना देशविदेशात पर्यटनासाठी जाण्यात रस होता. तेथील प्रेक्षणीय स्थळं पाहणे, तेथील लोकांना भेटणे, त्याचं जीवन जवळून पाहणे  या गोष्टी त्यांना आवडत असत. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी अनेक यात्रावृतांत  संस्कृतमध्ये  लिहिले आहेत. या दिशेने संस्कृत वाड;मय  समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वाल्मिकी रामायणाचे भाषाशास्त्रीय अध्ययन, संस्कृतातील पर्यायवाची शब्दातील सूक्ष्म अर्थभेद, संस्कृत शब्दावलीच्या आधारावर भारतीय सांस्कृतिक चिंतनाचे चित्रण, दक्षिण-पूर्व आशियाची संस्कृत शब्दावली अशी अनेक  भाषा आणि भाषाशास्त्रीय  कार्ये त्यांनी  केली आहेत.

सत्यवत शास्त्री यांना पद्मश्री (१९९९), साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार ( विभागून २००६),  वाचस्पती पुरस्कार, दयावती मोदी विश्व संस्कृती सन्मान, डालमिया श्रीवाणी अलंकरण, राष्ट्रपती सन्मान, थाई राजकीय सन्मान, इटली शासकीय सन्मान इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशविदेशातील सहा विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट ही उपाधी दिलेली आहे.

१४ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांचे निधन झाले.

संदर्भ : https://sahitya-akademi.gov.in/library/fellowship_pdf/Satya-Vrat-Shastri.pdf


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.