महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रेक्षणीय धबधबा. सातारा शहरापासून नैर्ऋत्येस सुमारे २६ किमी. अंतरावर, ठोसेघर या छोट्याशा गावाजवळ हा धबधबा आहे. गावाच्या नावावरूनच हा धबधबा ओळखला जातो. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, तारळी (काळगंगा) नदीवर असणारा हा धबधबा विशेष विलोभनीय असल्यामुळे ते एक प्रसिद्ध पर्यटनकेंद्र बनले आहे. त्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान अनुक्रमे १७° ३५′ ४८″ उ. व ७३° ५०′ ४५″ पू. असे आहे. येथे १५ ते २० मी. उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्यांची मालिका असून मुख्य धबधबा ३५० मी. उंचीवरून खाली कोसळतो. मुख्य धबधब्याला लागूनच एक छोटा धबधबा (उंची ११० मी.) आहे. धबधबा परिसरात एक गुफा असून तेथे जाण्यास छोटा रस्ता आहे.
पावसाळ्यात विशेषत: जुलै ते नोव्हेंबर महिन्यांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या विलोभनीय धबधब्याचे दृष्य पाहण्यासाठी हौशी पर्यटक येथे येतात. हा सह्याद्रीच्या घाटमाथ्याचा परिसर असल्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे धबधब्याचे दृश्य विशेष प्रेक्षणीय असते. मुसळधार पावसाच्या वेळी प्रवाहातून प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे त्यावेळचे धबधब्याचे दृश्य तर अगदी विलक्षण असते. धबधब्याचे वरून खाली कोसळणाऱ्या पाण्यामुळे धबधब्याच्या तळाला दिसणाऱ्या फेसाळणाऱ्या पाण्याचे दृष्य पाहण्यासारखे असते. वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची झालेली प्रचंड गर्दी आणि धबधब्याचा खळखळणारा आवाज यांमुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. धबधब्याचे सौंदर्य नीट न्याहळता यावे म्हणून काठावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कठडे व चबुतरे बांधले आहेत. सुरुवातीला अशी व्यवस्था नव्हती, तेव्हा अनेक अपघात झाले आहेत. मुख्य प्रवेशापासून धबधब्यापर्यंत साधारण अर्धा किमी. अंतर पायी चालत यावे लागते. मुसळधार पावसाच्या वेळी ही वाट निसरडी झालेली असते. धबधब्याजवळ विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.
धबधब्याच्या सभोवतालच्या परिसरात दाट वनांनी आच्छादलेल्या डोंगररांगा आणि त्यांतील सुंदर दऱ्या व घळई पाहायला मिळतात. हा परिसर शांत व रमणीय असल्यामुळे सहल व वनभोजनासाठी तो उत्तम आहे. धबधब्याजवळ स्वच्छ पाण्याचे सरोवर आहे. परिसराचे अजून तरी विशेष विद्रूपिकरण झालेले नसल्याने मनोहारी नैसर्गिक सृष्टीसौंदर्य आणि सुंदर भूदृश्ये पाहायला मिळतात. धबधब्याच्या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, पक्षी, सरपटणारे प्राणी, वन्य प्राणी इत्यादी आढळतात. त्यामुळे येथे समृद्ध जैवविविधता व विविध परिसंस्था पाहायला मिळतात. पर्यावरणपूरक किंवा निसर्गरम्य पर्यटनाच्या दृष्टीने (इको टूरिझम) या परिसरात अनेक सौंदर्यस्थळे आहेत. साताऱ्यावरून जाताना रस्त्यातच धबधब्यापासून अलीकडे साधारण १५ किमी. अंतरावर प्रेक्षणीय व प्रसिद्ध असा सज्जनगड (परळी – सज्जनगड) किल्ला आहे. ठोसेघर धबधब्याबरोबरच पर्यटक या किल्ल्यालाही भेट देतात.
ठोसेघर धबधब्याबरोबरच पर्यटकांचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील पवनचक्क्यांसाठी प्रसिद्ध असलेले चाळकेवाडी पठार हे होय. पठारावर जिकडे पाहावे तिकडे सर्वत्र पवनचक्क्या दिसतात. त्यामुळे शाश्वत व अपारंपरिक पवनऊर्जा निर्मितीचे हे प्रमुख केंद्र बनले आहे. थंड व आल्हाददायक हवामान, दाट धुके, जोराने वाहणारा गार वारा, विविध वनस्पती व हिरव्यागार गवतांनी आच्छादलेली भूदृष्ये, सर्वत्र पवनच्चक्क्यांची फिरताना दिसणारी पाती व त्यांचा येणारा विशिष्ट प्रकारचा आवाज, मोहक सृष्टीसौंदर्य इत्यादींमुळे ठोसेघर धबधबा आणि चाळकेवाडी पठार ही पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन व सहलीची केंद्रे बनली आहेत. छायाचित्रण, सौंदर्यस्थळे पाहणे तसेच तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा झालेला सुंदर मिलाफ पाहण्यासाठी फार मोठ्या संख्येने लोक येथे येत असतात. सातारा शहरापासून बसने किंवा खाजगी वाहनांनी जाता येते. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील शेंद्रे फाट्यापासूनही या धबधब्याकडे जाता येते.
ठोसेघर धबधब्याला अधिकाधिक पर्यटक भेट द्यावेत व गावाचा महसूल वाढावा, यांसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत धबधबा परिसर विकसित करणे आणि पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. त्यामध्ये धबधब्याकडे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचे रस्ते तयार करणे, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लाल फरसबंदी आणि सुरक्षा कठड्यांची निर्मिती, विश्रांतीसाठी बाकडी, पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृहाची सुविधा इत्यादींचा समावेश होतो.
समीक्षक ꞉ वसंत चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.