बेरिंग सामुद्रधुनीतील दोन छोटी बेटे. सायबीरिया (रशिया) व अलास्का (संयुक्त संस्थाने) या दोन भूखंडांदरम्यान असणारा चिंचोळा सागरी भाग म्हणजे बेरिंग सामुद्रधुनी होय. या सामुद्रधुनीने दक्षिणेकडील बेरिंग समुद्र (पॅसिफिक महासागराचा भाग) उत्तरेकडील चुक्ची समुद्राशी (आर्क्टिक महासागराचा भाग) जोडला गेला आहे. या सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय वाररेषा जाते. ही वाररेषा म्हणजे १८०° रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा आहे. जहाजातून किंवा विमानातून एका बाजूच्या देशाकडून दुसऱ्या बाजूच्या देशाकडे जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना वाराचा बदल करण्याचा संकेत आहे. पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून (पूर्व गोलार्धातून) अमेरिकेकडे (पश्चिम गोलार्धात) जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे म्हणजे अमेरिकेकडून आशियाकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर पुढचा वार धरतात. त्यामुळे या रेषेला ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ असे म्हणतात.
बेरिंग सामुद्रधुनीत मोठे डायोमीड (रशियन – रत्मानॉफ) व छोटे डायोमीड (इओनालिक) ही दोन बेटे असून ती एकमेकांपासून केवळ ४ किमी. अंतरावर आहेत. त्यांपैकी पश्चिमेकडील मोठे डायोमीड बेट (क्षेत्रफळ सुमारे १० चौ. किमी.) रशियाचे, तर पूर्वेकडील छोटे डायोमीड बेट (सुमारे ६ चौ. किमी.) संयुक्त संस्थानांचे आहे. मोठे डायोमीड बेट हे रशियाच्या चकॉट्स्की (चकॉट) या स्वायत्त जिल्ह्याचा भाग असून ते चकॉट्स्की द्वीपकल्पापासून आग्न्येयीस सुमारे ४५ किमी. अंतरावर. आहे. हे बेट इमाक्लिक, इनालिक, नुनारबुक, रत्मानॉफ या नावांनीही ओळखले जाते. छोटे डायोमीड बेट अलास्काच्या (संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य) मुख्य भूमीपासून पश्चिमेस सुमारे २५ किमी. वर अंतरावर आहे. याला क्रुसेनस्टर्न या नावानेही ओळखले जाते. मोठे डायोमीड बेट हा रशियाचा सर्वांत पूर्वेकडील बिंदू आहे. अमेरिका व रशिया या दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीने ही दोन बेटे अलग झाली आहेत. ती सरहद्द त्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय वाररेषादेखील परिभाषित करते. ही दोन्ही बेटे खडकाळ असून मेसासारख्या भूमिस्वरूपावर स्थित आहेत. येथे उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील सरासरी तापमान अनुक्रमे १०° सेल्सि. व -१४° सेल्सि. असते. डिसेंबर ते जून या कालावधीत येथील भूभाग हिमाच्छादित असतो.
काही पुरातत्त्वविद्या शास्त्रज्ञांच्या मते, डायोमीड बेटांवर किमान ३,००० वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असावी. ही बेटे मुख्यत: वसंत ऋतूतील शिकार छावणीचे ठिकाण होते. इ. स. १६४८ मध्ये डायोमीड बेटांवर पोहोचणारा पहिला रशियन समन्वेषक सायमन इव्हानव्हिच डेझनेव्ह हा होता. व्हीटुस बेरिंग या डॅनिश दर्यावर्दी व समन्वेषकाने १६ ऑगस्ट १७२८ रोजी या बेटांचा पुन्हा शोध लावला. त्या दिवशी रशियन ऑर्थडॉक्स चर्चमध्ये ग्रीक संत डायोमीड यांचा स्मृतिदिन साजरा केला जात होता, म्हणून त्यांच्या नावावरून या बेटांना हे नाव देण्यात आले आहे. सामुद्रधुनीच्या रूपाने अमेरिका आणि आशिया खंडातील अंतर फक्त ८६ किमी. आहे. शीत युद्धादरम्यान, बेरिंग सामुद्रधुनी अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमधील सीमा होती. त्यावेळी तिला ‘बर्फाचा पडदा’ म्हणून ओळखले जाई. इ. स. १८६७ मध्ये अमेरिकेने रशियाकडून अलास्का विकत घेतला, ज्यामध्ये छोट्या डायोमीडचाही समावेश होता. दोन बेटांदरम्यान एक नवीन सीमा आखण्यात आली आणि मोठे डायोमीड बेट रशियाला देण्यात आले. इ. स. १९४८ मध्ये तेथे लष्करी तळ स्थापन केल्यानंतर सोव्हिएट सरकारने मोठ्या डायोमीड बेटावरील स्थानिक लोकांना रशियाच्या मुख्य भूमीवर स्थलांतरित केले. त्यामुळे रशियाच्या मोठ्या डायोमीड बेटावर कायमस्वरूपी लोकवस्ती नाही. तेथे फक्त रशियन लष्करी तळ व हवामान खात्याचे महत्त्वाचे केंद्र आहे.
या दोन बेटांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जाते. त्यामुळे एकमेकांपासून केवळ ४ किमी. अंतरावर असणाऱ्या या दोन बेटांवरील वार मात्र वेगवेगळे असतात. संयुक्त संस्थानांच्या छोट्या डायोमीड बेटावर आजचा दिवस चालू असतो, तर रशियाच्या मोठ्या डायोमीड बेटावर आधीच उद्या सुरू झालेला असतो. त्यामुळे छोट्या डायोमीडला ‘काल बेट’ (यस्टरडे आइसलँड) आणि मोठ्या डायोमीडला ‘उद्या बेट’ (टुमॉरो आइसलँड) अशा टोपणनावाने संबोधले जाते. दोन्हींमधील अंतर फक्त चार किलोमीटर असताना वेळेचे अंतर मात्र २१ तासांचे आहे. मोठ्या डायोमीड बेटावर मंगळवार असतो, तेव्हा छोट्या डायोमीड बेटावर सोमवार असतो. मोठे डायोमीड बेट २१ तासांनी पुढे असते. याचा अर्थ असा की, दोन्ही डायोमीड बेटे पूर्णपणे भिन्न काल विभागात आहेत. छोटे डायोमीड बेट अलास्का काल विभागात आहे, तर मोठे डायोमीड बेट रशियाच्या चकॉट या स्वायत्त जिल्ह्याच्या ओक्रॅग काल विभागात आहे. हे दोन्ही काल विभाग आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या विरुद्ध बाजूंना आहेत. म्हणजेच, दोन्ही बेटे प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या दिवशी, २१ तासांच्या अंतरावर आहेत.
ही दोन्ही बेटे एकमेकांना स्पष्ट दिसतात. म्हणजे, अमेरिकेत उभे राहून आपण रशियाकडे बघू शकतो, किंवा उलटही. थोडक्यात, ही बेटे म्हणजे भौगोलिक, राजकीय आणि वेळेचे अद्भूत मिश्रण आहेत. एवढे जवळ असूनही दोन देश, दोन गोलार्ध आणि दोन वेळा असे या दोन बेटांचे वैशिष्ट्य आहे. दोन्ही बेटांवर सूर्योदय किंवा सूर्यास्त बरोबरच घडतात. केवळ जागतिक कालगणनेतील व्यावहारिक सोयीसाठी तारीख व वार वेगवेगळे असतात. हिवाळ्यात जेव्हा बेरिंग समुद्र गोठतो, तेव्हा या दोन बेटांच्या दरम्यान बर्फाचा पूल तयार होतो. हे एकमेव ठिकाण असे आहे की, जेथे तुम्ही पायी चालत एका बेटावरून दुसऱ्या बेटावर, म्हणजेच रशियातून अमेरिकेत किंवा अमेरिकेतून रशियात जाऊ शकता. म्हणजे कालातून उद्यात किंवा उद्यातून कालात जाता येते; परंतु ही सामुद्रधुनी दोन्ही देशांमधील भू-राजकीय तणावामुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळे दोन्ही बेटे वेगवेगळ्या देशांत असल्यामुळे कायदेशीररित्या तशी ये-जा करण्यास मनाई आहे.
अमेरिकेच्या छोट्या डायोमीड बेटावर प्रामुख्याने चुक्ची समाजाचे सुमारे ७७ (२०२३) लोक राहत असून ते कुशल दर्यावर्दी आहेत. पूर्वी हे लोक शिकार आणि हस्तिदंती कोरीव काम करून व त्याचा व्यापार करून आपला उदरनिर्वाह करीत असत. ते बुलहेड्स, टॉमकोड व ब्लू कॉड्सारखे मासे पकडत असत. ते देवमाशाची शिकार (व्हेलिंग) अजूनही एक प्रमुख व्यवसाय म्हणून करतात. या बेटाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या एका छोट्याशा पुळणीवर वसलेल्या डायोमीड या लहानशा नगरात अंदाजे ३० इमारती असून तेथे शाळा, ग्रंथालय, चर्च आणि हेलिपॅड आहे.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.