उत्तर अमेरिकेच्या वायव्येस असलेल्या संयुक्त संस्थानांच्या अलास्का राज्यात अलास्का पर्वतरांगा आढळतात. या पर्वतश्रेण्यात ब्रूक्स पर्वतरांग, अलास्का पर्वतरांग व अल्यूशन पर्वतरांग असे तीन मुख्य पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांमुळे अलास्का राज्याची भूपृष्ठरचना खडबडीत व उंचसखल बनली आहे. उत्तर अमेरिकेतील सर्वांत उंच शिखर याच पर्वतरांगात असून त्यातून अनेक हिमनद्या वाहतात. हा संपूर्ण प्रदेश भूकंप आणि ज्वालामुखी प्रक्रियांनी युक्त आहे. प्राकृतिक दृष्ट्या या पर्वतरांगा रॉकी पर्वतरांग व पॅसिफिक पर्वत प्रणालीचा वायव्येकडील विस्तार आहे. अलास्का पर्वतरांगांच्या प्रदेशात समृद्ध खनिज संपत्तीचे नैसर्गिक साठे असून ते आजतागायत आबाधित आहेत.

ब्रुक्स पर्वतरांग ही अलास्का पर्वतरांगांतील सर्वांत उत्तरेकडील पर्वतरांग असून तिच्या उत्तरेकडील पायथ्यालगत आर्क्टिक टेकड्या पसरल्या आहेत. हा संपूर्ण पर्वतीय प्रदेश रॉकी पर्वतरांगांचा विस्तार असून तो अलास्काच्या उत्तर भागात पूर्वेकडील कॅनडा सीमेपासून पश्चिमेकडे धनुष्याकृती पद्धतीने पसरला आहे. उत्तरेकडील आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यालगत व ब्रुक्स पर्वतरांगेच्या पायथ्यालगत पूर्व-पश्चिम दिशेने अनेक अनियमित लहान – मोठ्या टेकड्या आणि पठार पसरले आहेत. या टेकड्यांची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत गेली आहे. त्यामुळे या प्रदेशातील नद्या मुख्यत्वे उत्तरवाहिनी असून त्या आर्क्टिक महासागराला मिळतात. या टेकड्यांच्या उत्तरेकडील उतारावर बर्फाच्छादित टंड्रा प्रदेश पसरला आहे.

आर्क्टिक टेकड्यांच्या दक्षिणेकडे ब्रुक्स पर्वतरांग पसरली असून आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेकडील भागातील ही पर्वतरांग सर्वांत उंच आहे. अमेरिकन भूगर्भशास्रज्ञ अल्फ्रेड हुल्स ब्रुक्स यांनी पहिल्यांदा या पर्वतरांगेची भूस्तररचना स्पष्ट केली. त्यामुळे त्यांच्या नावाने हा पर्वत ओळखला जातो. या रांगेत अनेक पर्वतरांगांच्या उपशाखा असून त्या कॅनडा सीमेपासून पश्चिमेकडे चुक्ची समुद्रापर्यंत सुमारे १,००० किमी.पर्यंत पसरल्या आहेत. ब्रुक्स पर्वत उत्तर व दक्षिण वाहिनी नद्यांमधील जलविभाजक आहे.

अलास्काच्या मध्यवर्ती भाग उच्चभूमी व खोल दऱ्यांनी युक्त आहे. या भागातून युकोन व कुस्कोक्विम या नद्या वाहतात. मध्यवर्ती अलास्कामधील पर्वतरांगा उत्तर व दक्षिण पर्वतरांगांच्या तुलनेने कमी उंचीच्या आहेत. मध्यवर्ती भागात पसरलेले हे उच्चभूमी प्रदेश विखंडित असून ते तीन विभागात विभागले आहेत; तर युकोन नदीच्या दक्षिणेला कॅनडाच्या सीमेपासून ते बेरिंग समुद्रापर्यंत पसरलेल्या पर्वतरांगा सलग पसरल्या आहेत. मध्यवर्ती अलास्काचा प्रदेश अमेरिकेतील ग्रेट बेसिन प्रदेशासारखा शुष्क हवामानाचा आहे.

अलास्काच्या दक्षिणेकडील किनाऱ्यालगतचा भाग धनुष्याकृती पर्वतरांगांनी युक्त आहे. या पर्वतरांगा अलास्का उपसागराच्या किनाऱ्यालगत पसरल्या असून राज्यातील हा पॅसिफिक
महासागराचा किनारा जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. हा पॅसिफिक पर्वतीय प्रदेश अनेक पर्वतीय गटांनी विभागला गेला आहे. मध्यवर्ती अलास्का पर्वतरांग नैर्ऋत्येला अल्यूशन पर्वतरांगेत विलीन होऊन अल्यूशन बेटांना जोडली गेली आहे. महासागरीय अल्यूशन पर्वताची शिखरे समुद्रात बुडालेल्या ज्वालामुखी शिखरांची सलग रांग आहे. ही शिखरे सतत धुक्याने वेढलेली असतात व त्यांच्यावर सातत्याने वादळांचा मारा होत असतो. या पट्ट्यात एकूण ८० ज्वालामुखींची नोंद झाली असून त्यातील निम्मे ज्वालामुखी गेल्या ३ ते ४ शतकांपासून जागृत आहे. इ. स. १९१२ मध्ये अल्यूशन पर्वतरांगेतील एका ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ‘व्हॅली ऑफ टेन थाउझंड स्मोक्स’ची निर्मिती झाली. आज हा भाग कटमाई राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखला जातो.

अतिदक्षिणेकडील किनाऱ्यावर पसरलेले केनाई आणि चुगाच या पर्वतरांगा अलास्का पर्वतरांगेपासून तालकिटना पर्वतामुळे वेगळ्या झाल्या आहेत. या पर्वतरांगा व रँगल पर्वतरांगा आणि पूर्वेकडील सेंट इलियास पर्वतरांगांचा संपूर्ण प्रदेश हिमाच्छादित आहे. उत्तर अमेरिकेतील या भागातील पर्वतप्रणालीतून मोठ्या हिमनद्या उगम पावतात.

सेंट एलीअस पर्वताच्या दक्षिणेला असलेला फेअरवेदर पर्वत (४,६६३ मी.) प्रस्तरभंग होऊन तयार झालेला एक वैशिष्ट्यपूर्ण असा गट पर्वत आहे. सदर पर्वतरांग आग्नेयेकडे अलेक्झांडर द्वीपसमूहात विलीन होते. फेअरवेदर रांग ही कॅलिफोर्निया राज्यातील सॅन अँड्र्युज प्रस्तरभंगाचा उतरेकडील विस्तार आहे. ही पर्वतरांग आजही भूभ्रंश क्रियेने सक्रीय आहे.

समीक्षक : वसंत चौधरी