जेव्हा आर्थिक व्यवहरातील काही व्यक्तींकडे इतर व्यक्तिंपेक्षा अधिक अथवा जास्त सुसंगत माहिती किंवा ज्ञान असते, तेव्हा असममित माहिती या संकल्पनेचा वापर केला जातो. उदा., जुन्या वापरलेल्या मोटारगाड्यांच्या बाजारामधील विक्रेत्याकडे गाडीच्या दर्ज्याबद्दल खरेदीदारापेक्षा अधिक माहिती असते. विक्रेता ही माहिती हेतुपुरस्सर खरेदीदारापासून लपवून त्याला सदोष गाडी अनाठायी किमतीला विकण्याची शक्यता जास्त असते.

नव-अभिजात अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार आर्थिक व्यवहरातील सर्व व्यक्तींकडे जरी संपूर्ण माहिती नसली, तरी त्यांना आर्थिक जगाच्या स्थितीबद्दल आणि एकमेकांच्या हेतूंबद्दल एकसारखी आणि समप्रमाणात माहिती असते. ही माहिती कोणत्याही अतिरिक्त मूल्यांशिवाय उपलब्ध असते; परंतु ही वस्तुस्थिती सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये लागू होत नाही. ज्यांच्याकडे अधिक व उत्तम माहिती उपलब्ध आहे, अशा व्यक्ती किंवा संस्था त्या माहितीद्वारे त्यांना फायदेशीर असणारे करार करतात. असे करार व्यवहारातील दुसऱ्या व्यक्तिंसाठी किंवा संस्थेसाठी तोट्याचे ठरतात. अधिक असममित माहितीमुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त सौदाशक्तीमुळे बाजारपेठेतील स्पर्धा निकोप राहत नाही. अशा परिस्थितीत एक तर व्यवहार होत नाही किंवा संसाधनांचे अकार्यक्षम वाटप आणि उपइष्टतम आर्थिक व्यवहार होतात. यालाच बाजारपेठीय अपयश असे म्हणतात.

नव-संस्थात्मक अर्थशास्त्राच्या अतंर्गत लिहिल्या गेलेल्या सिद्धांतांमध्ये माहिती शोधण्यासाठी आणि मिळवण्यासाठीही किंमत मोजावी लागते, असे गृहीत धरले आहे. या सिद्धांतानुसार असममित माहितीचे प्रामुख्याने तीन प्रकार पडत असून त्यांमध्ये एक, वस्तूंच्या वैशिष्ट्यांबद्दल करारापूर्वी असलेली अनभिज्ञता; दोन, करारानंतर व्यक्तींच्या कृतीचे निरीक्षण करता न आल्याने किंवा त्याचा गुणात्मक दर्जा तपासता न आल्याने येणारी अनभिज्ञता आणि तीन, व्यवहारातील सर्व व्यक्तींच्या हेतूबद्दल असलेली अनभिज्ञता यांचा समावेश होतो.

असममित माहिती ही ‘प्रतिकूल निवड’ (ॲडव्हर्स सिलेक्शन) आणि नैतिक धोका (मॉरल हॅझर्ड) अशा तऱ्हेने बाजारपेठीय अपयशाला जन्म देते. प्रतिकूल निवडी अंतर्गत खाजगी माहितीच्या अनुपलब्धतेमुळे नुकसानकारक सौदा निवडला जाण्याची शक्यता अधिक असते. करार झाल्यानंतर मान्य अटीची पूर्तता करण्याचे प्रोत्साहन कमी होणे आणि त्या पूर्ण न करण्याकडे वाढता कल असणे, याला नैतिक धोका असे म्हटले आहे.

विमा, वापरलेल्या वस्तू यांचे बाजार, मालक-कामगार आणि संस्थाप्रमुख-कामगार किंवा प्रतिनिधी यांच्यामधील करारांचे व आर्थिक व्यवहारांचे विषलेष्ण करण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला गेलेला आहे. प्रिसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉर्ज ऑर्थर अकेरलॉफ; ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स आणि जोसेफ स्टिग्लिट्झ यांनी ‘असममित माहितीयुक्त बाजारपेठे’चे विष्लेषण केल्याबद्दल त्यांना २००१ मध्ये नोबेल सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे.

संदर्भ : The Quarterly Journal of Economics, Vol. 84, 1970.

समीक्षण : अविनाश कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.